भारतीय चित्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cheetah

चित्ताकर्षक देखावा!

निसर्गात अव्याहत सुरू असलेल्या झगड्यात मनुष्यप्राण्याने शारीरिकदृष्ट्या दुर्बल असूनही प्रगल्भ मेंदूच्या जोरावर बाजी मारली. त्या सगळ्या वाटचालीत अनेक प्रजाती नष्ट करण्याचे ‘पुण्यकर्म’ही त्याने जमवले. मानवाचा निसर्गचक्रातला हस्तक्षेप अनेक प्रजातींना नेहमीच धोक्यात आणतो. पॅसेंजर पिजन्स, डोडो पक्षी, टास्मानियन वाघ असे कितीतरी प्राणी पृथ्वीतलावरुन माणसानेच नष्ट केले. भारतीय चित्ता हा

त्यापैकीच एक. तूर्त सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेला हा चित्ता पुन्हा एकदा भारतीय भूमीवर नांदू लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करुन आठ जिवंत आफ्रिकन चित्ते नामिबियातून आयात केले गेले आणि मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात समारंभपूर्वक सोडण्यात आले. तब्बल २८ लाख डॉलरची मोठी किंमत देऊन हे चित्ते आणण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी

अभयारण्यातल्या संरक्षित जागेत त्यांची रवानगी झाली. या चित्ताकर्षक सोहळ्यात वन्यजीवसंवर्धन साधले गेले की प्रतिमासंवर्धन, हा आता वादाचा मुद्दा झाला असला तरी हा प्रयत्न मुदलातच चुकीचा ठरविण्याचे कारण नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे, की या उपक्रमामुळे नामशेष झालेला भारतीय चित्ता खरोखर पुन्हा आपल्या भवतालाचा घटक होण्यासाठी आपण सगळे शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करणार का आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवणार का, हाच.

भारतीय चित्ता शेवटचा १९४०च्या आसपास दिसला होता. मध्य प्रदेशातील कोरिया नामक संस्थानाचे राजे रामानुज प्रताप सिंह यांनी एका रात्रीत शेवटचे तीन भारतीय चित्ते मारल्याची नोंद ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या दफ्तरात आढळते. त्यानंतर हा अटकर बांध्याचा शिकारी प्राणी भारतात कुठेही दिसला नाही.

१९५२मध्ये चित्त्याचे पुनरुज्जीवन करण्याची चर्चा झाली होती. सत्तरीच्या दशकाच्या प्रारंभी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही वन्यजीवतज्ज्ञांच्या मदतीने इराणकडून आशियाई चित्ते आणण्याचा घाट घातला होता. त्या बदल्यात इराणला काही भारतीय सिंह देण्याची बोलणी झाली होती. तेवढ्यात इराणमध्ये क्रांतीचा वणवा धुमसू लागल्याने ते प्रयत्न बारगळले. पुढे २००९मध्ये तसेच प्रयत्न केंद्र सरकारकडून झाले. सध्या जे कुनो अभयारण्य गाजते आहे, तेथे आफ्रिकी चित्त्यांसोबत, गीरमध्ये दाटलेले काही सिंह हलवायची योजना होती. गुजरात सरकारने त्याला विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाने गीरचे सिंह हलवण्यास मंजुरी दिली; पण चित्ते इराणमधूनच आणले पाहिजेत, असा निकाल दिला.

दोन वर्षांपूर्वी ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’च्या विनंतीअर्जानुसार सर्वोच्च न्यायालयाने चित्ते आयात करण्याला मान्यता दिली. तेव्हापासून ‘ऑपरेशन चित्ता’ ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. वास्तविक भारतातून गायब झालेला चित्ता हा आशियाई चित्ता होता, आफ्रिकी नव्हे! आशियाई चित्त्याची चण थोडी लहान असते आणि शिकारीच्या शैलीतही थोडाफार फरक असतो. आफ्रिकी चित्ता भारतात आणून त्याचे भारतीय चित्त्यात रुपांतर कसे काय होणार, असा प्रश्न तज्ज्ञमंडळी करतात, तो यामुळेच. आफ्रिकी चित्ते जगभरात सुमारे सात हजाराहून थोडे अधिक आहेत, तर सध्या फक्त इराणमध्येच आढळणारे आशियाई चित्ते अवघे तीसेक उरले आहेत. नजीकच्या काळात त्यांनाही नामशेष व्हावे लागणार,हे उघड आहे. आफ्रिकी चित्ता भारतीय वातावरणात रुळेल का, त्याला खाद्य मिळेल का, असे काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील.

पण ज्या कारणांमुळे भारतीय चित्ता नष्ट झाला, त्या कारणांचे काय? चित्ता आणि माणूस हे भारतात तरी एकमेकांना बऱ्यापैकी धरुन राहिले. उलटपक्षी बिबटे, वाघ-सिंहादी मार्जारकुलातील प्राण्यांमध्ये सर्वात माणसाळू शकणारा प्राणी चित्ताच होता. त्याची चणही लहान असल्याने मोठी जनावरे तो मारत नसे. राजे-महाराजे आणि ब्रिटिश अधिकारी शिकारमोहिमांमध्ये पाळलेले चित्ते घेऊन जात. हे प्रशिक्षित चित्ते हरणे, रानडुकरे वगैरे मारुन धन्याकडे इमानाने आणून देत! पण माणसाशी दोस्ती भारतीय चित्त्याला फळली नाही. ‘असंगाशी संग, आणि प्राणाशी गाठ’ या म्हणीचे प्रत्यंतर घेतच भारतीय चित्त्याचा वंशविच्छेद झाला. आता मोठा गाजावाजा करुन पंतप्रधानांनी चित्ते भारतात आणले, त्याचे स्वागत केले पाहिजे. हा प्रयोग खर्चिक असला तरी तो करुच नये, असे काही नाही.चित्त्यांच्या प्राणप्रतिष्ठेने भारतातील व्याघ्रकुलास अनुकूल असे अधिवास टिकतील आणि पर्यायाने पर्यावरणही अबाधित राहील, हा विचार म्हणून स्तुत्य आहे.

पण एकूणच या उपक्रमाला भावनिक टेकू बळकट असला तरी शास्त्रीय पायाही बळकट हवा, हे नीट समजून घेतले पाहिजे. मोठा गाजावाजा करुन आणलेले हे चित्ते आता निगुतीने सांभाळण्याचे आव्हान समोर उभे आहे. ते शास्त्रशुद्ध पद्धतीनेच पार पाडावे लागेल. चित्तागमनाचा देखावा तर पार पडला आहे. ‘कुणी कबुतरे सोडते, कुणी चित्ते सोडते’ असल्या सवंग राजकीय टीकाटिप्पण्या करुन या उपक्रमाला खालच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न तरी टाळला पाहिजे. चित्ताकर्षक देखाव्यांपेक्षा चित्तवेधक काम अधिक बोलके ठरेल.

माणूस एखाद्या प्राण्यावर प्रेम करीत नाही, तोवर त्याच्या आत्म्याचा काही भाग निद्रिस्तच राहतो.

- ॲनाटोले फ्रान्स, कवी-कादंबरीकार

Web Title: Cheetahs In India A Spotted Histor Interference With Nature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..