‘ताप’दायक कॉलरा

कॉलराच्या साथी हवामानाच्या हेलकाव्यावर अवलंबून नसतात; पण पूर, वादळे, दुष्काळ अशा अरिष्टांत आणखी भर घालणारे जे अनेक साथीचे आजार आहेत त्या पैकी हा प्रमुख. कॉलराची पहिली ज्ञात साथ इसवीसन १८१७ ते १८२५ अशी टिकली. कॉलरा होतो व्हिब्रियो कॉलरा या जंतूंमुळे आणि पसरतो दूषित अन्न-पाण्यातून. याचा उद्‍गम गंगेच्या पठारी प्रदेशात असावा, विशेषत: पूर्वेकडील पठारी भागात. कोलकाता ब्रिटिश प्रदेशाची राजधानी होती.
‘ताप’दायक कॉलरा
‘ताप’दायक कॉलरा sakal

हवामान-अवधान

कॉलराच्या साथी हवामानाच्या हेलकाव्यावर अवलंबून नसतात; पण पूर, वादळे, दुष्काळ अशा अरिष्टांत आणखी भर घालणारे जे अनेक साथीचे आजार आहेत त्या पैकी हा प्रमुख. कॉलराची पहिली ज्ञात साथ इसवीसन १८१७ ते १८२५ अशी टिकली. कॉलरा होतो व्हिब्रियो कॉलरा या जंतूंमुळे आणि पसरतो दूषित अन्न-पाण्यातून. याचा उद्‍गम गंगेच्या पठारी प्रदेशात असावा, विशेषत: पूर्वेकडील पठारी भागात. कोलकाता ब्रिटिश प्रदेशाची राजधानी होती. इथून व्यापाराबरोबर कॉलराही निर्यात झाला. कॅन्टन, कोरिया, जपान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमार्गे मध्यपूर्वेतही हा जंतू पोहोचला. आजवर कॉलराच्या सहा साथी येऊन गेल्या आहेत (सन १८१७, १८२६, १८४५, १८६२, १८८१ आणि १८९९) आणि इंडोनेशियातून १९६१ मध्ये सुरू झालेली साथ अजूनही जारी आहे. बाकीच्या साथी ५ ते २० वर्षांत बऱ्याचशा आपोआपच आटोपल्या तरीही सुरूच आहेत. कॉलराच्या एल टोर या उपजातीचा हा प्रताप.

या साथींचा छडा लावतालावताच एल निनोने दक्षिणेला झोका घेतल्याचे आणि हे नियमित घडत असल्याचे आढळले. कॉलरा आणि हवामानसंशोधन हे असे निगडित आहे. कॉलराचे जंतू खाडीतील तवंगांत, शैवालांत (अल्गी) घर करून असतात. एल निनोच्या प्रभावाने पाणी उबदार होताच हे झपाट्याने वाढतात. तिथल्या अन्नसाखळीत प्रविष्ट होतात, शेवटी माणसाच्या पोटात शिरतात आणि हाहाकार माजतो.

आर. राघवेंद्र राव नावाच्या निजामाच्या सेवेतील सरकारी डॉक्टरने, सन १९४१ मध्ये नाथांच्या पालखीच्या निजाम हद्दीतील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे, ‘पैठण नगरीत मुळातच कॉलरा होता. १८ रुग्ण दगावले होते. पोटॅशियम परमँगनेट, ब्लिचिंग पावडर आणि लस ही आयुधे होती. वाटेत मुंगी गावाने या साऱ्याला असहकार पुकारला, कुंडल पारगावला सारे करूनही कॉलऱ्याची केस झालीच आणि बीड जिल्ह्यातील दहिवंडीची बातमी ऐकून सारेच भांबावले. १२५ लोकवस्तीच्या त्या गावात ३० केसेस होऊन १४ बळी गेले होते. गावातर्फे पालखीला जेवण घालायची प्रथा होती. शिधा द्या; आम्ही रांधून घेतो; पण घरोघरच्या भांड्यांतून अन्न आणू नका; असा निरोप दिला गेला. पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं, मग गावातील अन्न न घेता पालखी गावाबाहेरून नेण्यात आली. लसीची सर्टिफिकिटे वारंवार तपासली जात होती. तरीही लोक लस न घेता वारीत घुसत होते. चुकार लोक सापडतच होते. परिणामी वारकऱ्यांत काही केसेस झाल्याच. एक मुलगाही गेला.’ अडाणी स्थानिकांचा बंदोबस्त करावा, लसीकरणाची सक्तीच असायला हवी आणि अँब्युलन्स म्हणून बैलगाड्या मिळाव्यात अशी विनंती डॉ. राव यांनी केली होती.

जगात आज बहुतेक भागांत कॉलरा नाही, कारण स्वच्छ पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट. सांडपाण्याचे आणि कॉलराचे नाते सर्वप्रथम दाखवून दिले ते डॉ. जॉन स्नो यांनी. लंडनच्या साथीचा अभ्यास करताना त्यांना असे आढळले, की एका विशिष्ट हातपंपातून पाणी वापरणाऱ्या घरांतच मृत्यूने मुक्काम ठोकला होता. नगरपित्यांचा विरोध मोडून काढत आणि लोकक्षोभाची तमा न बाळगता त्यांनी हा पंप बंद करवला. म्हणजे त्याचे हँडलच काढून टाकले. कॉलरा तात्काळ ओसरला. कॉलराच्या जंतूंचा शोध नंतर लागला. त्याच्या संक्रमणाचे मार्ग आधी रोखता आले. जॉन स्नो यांचा हा शोध अनेक कारणांनी क्रांतिकारी ठरला. त्यांनी लंडनच्या नकाशावर मृत्यू घडलेली घरे ठिपक्यांनी दर्शवली. ब्रॉड स्ट्रीटच्या पंपाभोवती सारे ठिपके एकवटले होते. ही पद्धतही नवलाची होती. ब्रिटिशांनी हा हातपंप आजही जपला आहे. आता त्याला पाणी येत नाही; पण आजही दरवर्षी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कुणाला स्नो यांच्या स्मृतिव्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. व्याख्यानाच्या सुरवातीला पंपाचे हँडल काढले जाते आणि या क्षेत्रातील नवीन काही ऐकून झाल्यावर ते पुन्हा बसवण्यात येते.

जिथे कॉलरा आहे तिथेही मृत्युदर कमी आहे कारण ‘जलसंजीवनी’. जलसंजीवनीचा शोध हा भारतातला (आणि बांगलादेशातला). ‘साखर, मीठ, पाणी; जुलाबावर गुणकारी’ हा मंत्र दिला तो डॉ. दिलीप महालनोबीस यांनी. वरवर साधा, अगदी घरगुती वाटणारा हा फॉर्म्युला निश्चित करणे म्हणजे अडथळ्याची शर्यत होती. अगदी अश्रूंइतक्याच खारट असलेल्या या पाण्याने जगभर अनेकांचे जीव वाचवले आहेत, अनेक घरांतील अश्रू रोखलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com