चरक संहितेतील ‘परिभाषे’च्या निवडक सात संकल्पनांपैकी तीन संकल्पनांचे स्वरूप आपण पूर्वार्धात पाहिले आहे; आता उर्वरित चारांचे स्वरूप पाहू : .वाक्यदोषज्या वाक्यात दोष आहे, त्यास वाक्यदोषयुक्त वाक्य म्हटले जाते. असे दोष पाच प्रकारचे आहेत.न्यून : काहीतरी कमी असणे म्हणजे न्यून. जे सिद्ध करायची ती प्रतिज्ञा, उदाहरण, तर्कप्रक्रिया युक्तिवादात नसणे हे न्यूनत्व असते. अधिक : न्यूनत्वाच्या विरुद्ध असते ती अधिकता; अर्थात गरजेपेक्षा जास्त काहीतरी असणे. सतत काहीतरी सांगणे, मांडणे, पुनरुक्ती करणे. याचे दोन प्रकार : अर्थपुनरुक्त (एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरणे) आणि शब्दपुनरुक्त (एकच शब्द सतत वापरत राहाणे.).अनर्थक : ज्यामुळे कोणताही अर्थ स्पष्ट होत नाही, निरर्थक, बिनकामाचे शब्द वापरणे. साहित्य अन काव्यशास्त्रात त्यास ‘निरर्थकतेचा दोष’ म्हटले आहे. (उदाहरणार्थ, ‘जसे, च, चं, अं, वा, बरं, या ठिकाणी, तर असं आहे की, चला तर मग, मग....’ इत्यादी )अपार्थक : ज्यांचा संबंध नाही असे शब्द एकमेकांशी जोडणे : चक्र, तक्र, नर्क, बडबड, गडबड. यांना स्वतंत्ररीत्या अर्थ आहे, पण त्यांचा एकत्र विनाकारण उपयोग करणे म्हणजे अपार्थक. काही वक्त्यांना अशी सवय असते!.विरुद्ध : जे विषय दृष्टान्त, सिद्धान्त किंवा चर्चेच्या वेळेच्या विरुद्ध असतील ते विषय सतत चर्चेत आणत राहाणे. चर्चा विषय ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ असा असेल तर तो सोडून ‘चंद्र, राहू, केतू, इत्यादी’ किंवा ‘नवरा बायकोभोवती फिरतो’, ‘प्राचीन काळी असे होते’ अथवा ‘भविष्यकाळात कसे असेल’ इत्यादी असंगत विषय चर्चेत आणणे..वाक्यप्रशंसाज्या वाक्यात वरील दोष नाहीत आणि जे ज्या अर्थाने वापरले आहे ते त्याच अर्थाने समजले जाते तो ‘वाक्याचा सद्गुण’ असतो, त्यास ‘वाक्यप्रशंसा’ म्हणतात.च्छलजे वाक्य अर्थहीन, निरथर्क आहे; किंबहुना ज्यात अर्थाचा केवळ भास होतो, उलट जे अनर्थक आहे, आणि केवळ दुसऱ्याला फसविण्यासाठी धूर्त रचना केलेले वाक्य असते, त्याला ‘च्छ्ल’ म्हणतात. छलाचा चर्चेत उपयोग नसतोच पण त्रास होतो, म्हणून शहाणी माणसे तो टाळतात. छल दोन प्रकारचा आहे : १. वाक्छल २. सामान्यछल.वाक्छल : शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढणे. ‘नव’ शब्द असेल तर त्याचे नवीन, नऊ असे दोन अर्थ काढून वितंड करणे.सामान्यछल : अशा वरील वाक्छल शब्दांची वाक्ये बनवून समोरच्याला छळणे (वितंडवाद)..निग्रहस्थानचर्चा परिषदेत सहभागी सभासद, परीक्षक अथवा वादी यांच्याकडून प्रतिवादी किंवा प्रतिवादीकडून वादी अशा दोघांना दोन्हीकडून ज्या ‘मुद्द्याच्या ठिकाणी’ पराजित केले जाते, ते ‘चर्चेचे ठिकाण’ म्हणजे ‘निग्रहस्थान’ होय. ‘निगृहीत’ म्हणजे पराजय करणे. (निग्रह्स्थानं नाम पराजय प्राप्ति:, तत्र त्रिरभिहितस्य वाक्यस्या परिज्ञानं .. ) निग्रह = ‘नि: गृह’ = ज्याला आता घरच उरले नाही, आश्रयस्थान उरणार नाही, असे करणे, जणूकाही बेघर करणे, ‘पळता भुई थोडी करणे’, ‘कहीं न छोडना!’. निग्रह म्हणजे ठाम निश्चय. निग्रहाचे तीन प्रकार :.निग्रह : ज्ञानवती परिषदेत सदस्यांना, प्रतिपक्षाला आपला मुद्दा समजावा म्हणून तीनवेळा सांगूनही त्यांना मुद्द्याचा अर्थ कळला नाही तर ‘आता, प्रतिवादीचा पराभव झाला आहे आणि साहजिकच ‘आपला जय झाला’, असे जाहीर करणे म्हणजे निग्रह. (शहाण्या लोकांनादेखील तीन वेळा सांगूनही कळत नसेल तर त्यांनाही मूर्खच समजावे, असे चरकाचार्य बजावतात)अननुयोज्याचा अनुयोग : अनुयोज्य म्हणजे प्रश्न विचारण्यास योग्य मुद्दा. अननुयोज्य म्हणजे प्रश्न विचारण्यास अयोग्य मुद्दा. अनुयोग म्हणजे त्यामागे जाणे, पाठपुरावा करणे. एखादे ‘वाक्यदोष’ युक्त वाक्य उर्फ अननुयोज्य मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच्या पूर्ण विरोधी वाक्य करणे म्हणजे ‘अननुयोज्याचा अनुयोग’. मुद्दा मांडल्यानंतर त्यावर आधी निरर्थक प्रश्न, त्या प्रश्नावर पुन्हा तसेच प्रतिप्रश्न, पुन्हा त्या प्रश्नाचेही कारण विचारणे. हा प्रकार वाहिन्यांवरील, समाजमाध्यमांवरील चर्चेत खूप आढळतो..अनुयोज्याचा अननुयोग : अनुयोज्य वाक्याच्या (योग्य मुद्दा मांडणारे वाक्य) जोडीला इतर काही प्रश्न उपस्थित करून चर्चा भरकटत ठेवणे म्हणजे अननुयोग. ‘हा आजार बरा होण्यास वेळ लागेल’ असे डॉक्टरने म्हटल्यानंतर रुग्णाने किंवा नातेवाईकांनी “मग, तुम्ही डॉक्टर कशासाठी आहात?” असा उलट प्रश्न विचारणे. समजा एखाद्या रुग्णाच्या बाबतीत डॉक्टरने ‘आता देवावर विश्वास ठेवा’ असे म्हटल्यावर नातेवाईक, मित्रांनी, गुरुजी लोकांनी ‘आत्मा अमर आहे, पुनर्जन्म असतो, कर्मफल भोगावेच लागते’ असे काहीबाही बोलून मूळ आजाराकडे दुर्लक्ष होत राहील, असे निरर्थक बडबडत राहाणे. वाहिन्यांवर आर्थिक चर्चा असेल तर राजकीय, सामाजिक, तात्त्विक प्रश्न विचारून चर्चा विस्तारणे, भरकटत ठेवणे. मांडलेला प्रत्येक मुद्दा खोडत संदर्भहीन काहीबाही विचारीत राहाणे. (उत्तरार्ध).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.