किडलेली मने (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची स्त्रियांविषयीची मानसिकता अद्यापही कशी बुरसटलेली आणि किडलेली आहे, याचे घडत असलेले दर्शन अस्वस्थ करणारे आहे.

स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल.

एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची स्त्रियांविषयीची मानसिकता अद्यापही कशी बुरसटलेली आणि किडलेली आहे, याचे घडत असलेले दर्शन अस्वस्थ करणारे आहे. या प्रवृत्तीची वेळीच दखल घेऊन सुधारणा केली नाही, तर लोकशाही म्हणजे केवळ संख्याशाहीचा सांगाडा उरेल. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांचे प्रतिनिधीही स्त्रियांच्या संदर्भात लिंगभाव पक्षपाताच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत, याचा धडधडीत पुरावा देणारे वक्तव्य जयदीप कवाडे यांनी नागपुरात केले. आंबेडकरी चळवळीचे बिनीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे ते चिरंजीव. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भात जाहीर सभेत बोलताना ‘जेवढे जास्त नवरे बदलले जातात, तेवढे कुंकू मोठे होत जाते...’, असे वक्तव्य करून या जयदीप महाशयांनी आपल्या बुद्धीचे दीप पाजळले. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी त्यांची पाठ थोपटली. आपल्या राजकारणाचा स्तर किती खालावला आहे आणि स्वतःला प्रगतिशील विचारांचे पाईक म्हणून मिरवणाऱ्यांच्या कळपातही अशी विकृती नांदते, याचे हे द्योतक. वक्तव्य अंगाशी आल्यानंतर जयदीप यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी समजायचे तो लोकांना समजले. खरे तर महिलांच्या संदर्भात अशाप्रकारचे वक्तव्य करणारे जयदीप कवाडे पहिले नव्हेत आणि स्मृती इराणी या अशा वक्तव्यांच्या पहिल्या लक्ष्य नव्हेत. यापूर्वीही विविध पक्षीय राजकारण्यांनी अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यात सोनिया गांधी यांना ‘काँग्रेस की विधवा’ म्हणणाऱ्या पंतप्रधानांसह मुलायमसिंह यादव आणि दिग्विजयसिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होतो. त्या-त्या वेळी झालेल्या निषेध-विरोधाच्या पलीकडे ही प्रवृत्ती संपण्याच्या दृष्टीने काहीही घडलेले नाही, ही खरे म्हणजे चिंतेची बाब आहे.

जयदीप कवाडेंच्या वक्तव्याला वर्तमान राजकीय स्थितीत आणखी वेगळे आयामही आहेत. एकीकडे ही निवडणूक अस्मितांच्या प्रश्‍नांवर लढवण्याचा प्रयत्न केला जात असताना, लोकहिताचे मुद्दे पुढे आणून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीचे ‘नॅरेटिव्ह’ बदलू पाहत असताना काँग्रेसच्या व्यासपीठावरून सहयोगी पक्षांनी अशी निरर्गल वक्तव्ये करावीत, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना सुहास्य दाद द्यावी आणि उमेदवाराने चक्क शाबासकी द्यावी, हे शोभणारे नाही. देशपातळीवर पक्ष जे काही करू पाहत आहे, त्यावरच घाव घालणारे हे उपद्‌व्याप आहेत. अशा वक्तव्यांमुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे.

जयदीप कवाडे ज्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, तो ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’ नावाचा पक्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी नाते सांगणारा आहे. उन्नत, उदात्त आणि प्रगतिशील विचारसरणीसाठी आंबेडकरी चळवळ ओळखली जाते. ज्या संविधानाचा उल्लेख करून जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केली, त्याच संविधानात महिलांप्रति भेदभाव करता येणार नाही, असे सांगणाऱ्या कित्येक तरतुदी आहेत. महिलांचे माणूसपण आपल्या घटनेने ठळकपणे अधोरेखित केलेले आहे. हे वास्तव लक्षात न घेता संविधानाचे रक्षणकर्ते म्हणविणारे लोक राजकीय विरोध म्हणून एखाद्या महिलेवर अशी शेरेबाजी करीत असतील, तर ते निषेधार्हच म्हटले पाहिजे. एकूण भारतीय पुरुषांच्या मानसिकतेच्या हिणकस बाजूचे दर्शनही या वक्तव्यातून घडणारे आहे. एकीकडे कुंकू हे सौभाग्याचे चिन्ह असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे त्यातच स्त्रीच्या दास्यत्वाचे आणि न्यूनाचे कंगोरे शोधून त्यांचेही चव्हाट्यावर प्रदर्शन मांडायचे, याला पुरोगामित्व म्हणता येत नाही. निवडणूक हा राजकीय विरोधाचा विषय असला, तरी ती लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे. तिचे पावित्र्य जपायचे असेल, तर ती केवळ मतदारांची जबाबदारी नाही. राजकीय नेत्यांची जबाबदारी यात अधिक आहे. त्यामुळे स्मृती इराणीच नव्हे, तर कोणत्याच महिलेच्या संदर्भात अशाप्रकारचे अश्‍लाघ्य उच्चार कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याकडून केले जात असतील, तर अशांना त्यांची जागा दाखवायला हवी. संतापाची लाट उसळल्यावर कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या प्रक्रियेतून जे काही निष्पन्न व्हायचे ते होईल. पण, स्त्रीचे चारित्र्य, कपडे, दागिने, कुंकू, चालणे यावर जाहीर व्यासपीठावरून शेरेबाजी करण्याची प्रवृत्ती फक्त कायदेशीर मार्गांनी थांबणारी नाही. स्त्रियांविषयी अनादराची भावना आणि त्या दुय्यम असल्याचा समज या विकारांपासून राजकारणातील अनेक जण मुक्त नाहीत, याचाच कटू प्रत्यय पुन्हापुन्हा येत आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर ही स्त्रीचे माणूसपण नाकारणारी प्रवृत्ती आहे. या विकृतीवरचे इलाज समाजाला आणि त्यातही महिलांनाच शोधावे लागतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Jaydeep Kawade satement about smriti irani and women in editorial