ड्रामेबाजीचा कळसाध्याय!

काँग्रेसचे नेते पवन खेङा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढलेले अत्यंत आक्षेपार्ह उद्‍गार, त्यांना विमानातून उतरवून झालेली अटक
Congress leader Pawan Khenga highly offensive remarks PM Narendra Modi arrested politics
Congress leader Pawan Khenga highly offensive remarks PM Narendra Modi arrested politicssakal
Summary

काँग्रेसचे नेते पवन खेङा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढलेले अत्यंत आक्षेपार्ह उद्‍गार, त्यांना विमानातून उतरवून झालेली अटक

काँग्रेसचे नेते पवन खेङा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढलेले अत्यंत आक्षेपार्ह उद्‍गार, त्यांना विमानातून उतरवून झालेली अटक आणि त्यानंतर दिल्ली विमानतळावर जे काही घडले, ते गेली काही वर्षे राजकीय पक्ष करत असलेल्या ड्रामेबाजीचा क्लायमॅक्स म्हणजेच ‘कळसाध्याय’च म्हणावा लागेल.

खेङा हे केवळ काँग्रेसचे नेतेच नव्हेत, तर यापूर्वी काही काळ त्यांनी शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना, त्यांचे राजकीय सचिव म्हणूनही काम केलेले आहे. शिवाय, विविध वृत्तवाहिन्यांवर काँग्रेसची बाजूही ते हिरिरीने मांडत असतात. त्यामुळे आपण कोणाबद्दल काय बोलतो आहोत, याबाबतचे किमान भान त्यांना आहे, असे गृहीत धरले जात होते.

मात्र, ते गृहीतक चुकीचे आहे, असे त्यांनीच आपल्या बेजबाबदार वक्तव्याने दाखवून दिले आहे. राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे वावरल्यानंतरही त्यांना ते भान आल्याचे दिसत नाही, हे आणखी धक्कादायक आहे. त्यांच्या या उद्‍गारांनंतर विविध राज्यांत त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी गुदरण्यात आल्या.

त्यात अर्थातच प्रामुख्याने भाजपशासित राज्यांचा भरणा असणे, हेही स्वाभाविकच. या तक्रारींनुसार खेङा यांच्यावर कारवाई व्हायला हवी, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, काँग्रेसमधून काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी मोदींवरील आपल्या तथाकथित निष्ठेचे दर्शन घडवण्यासाठी थेट त्यांच्या अटकेचाच घाट घातला.

त्यासाठी त्यांनी निवडलेला मुहूर्तही मोठा नामी होता. खेङा हे गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या अन्य काही नेते-कार्यकर्ते यांच्यासह रायपूर येथे होत असलेल्या पक्षाच्या अधिवेशनासाठी रवाना होणार होते आणि ही मंडळी विमानात जाऊनही बसली होती. त्यावेळी या विमानाचे प्रयाण रोखून दिल्ली पोलिस आत आले आणि त्यांनी खेङा यांना विमानातून उतरवले.

खेङा हे काही कोणी चार्ल्स शोभराजसारखे अट्टल गुन्हेगार नाहीत. त्यांना रायपूर विमानतळावर उतरल्यावरही अटक करता आली असती. त्याऐवजी आसाम तसेच दिल्ली पोलिसांनी संगनमताने ही विमानतळावरची ‘ड्रामेबाजी’ सुरू केली.

खेङा यांनीही या ‘ड्रामेबाजी’त सामील होत, तोंडदेखल्या माफीनाम्याचा अभिनय करून दाखवला! त्यामुळे टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांनाही आयताच मसाला मिळाला! मग या नाट्यात सामील होण्याची संधी खेङा यांच्याबरोबरच्या काँग्रेसजनांनी थेट विमानापुढे बसकण मारून साधली.

मात्र, त्यानंतर सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने अनपेक्षितपणे धावपळ करत थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खेङा यांना तत्काळ जामीन मंजूर केला. त्यामुळे आसाम तसेच दिल्ली पोलिस या दोहोंचेही हसू झाले.

पण त्यामुळे हा खेङा यांचा विजय म्हणता येणार नाही. भाजपच्या प्रवक्त्यांच्या उठपटांग वक्तव्यांना आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी स्वतःही संयम बाळगायला हवा. भाजप प्रवक्त्यांपेक्षा आपण अधिक परिपक्व आहोत, हे त्यांना वर्तनातून दाखवून द्यावे लागेल.

खेङा यांच्या आक्षेपार्ह उद्‍गारांबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार जरूर सरकारकडे आहेत आणि तशी कारवाई ही व्हायलाच हवी. मात्र, तशी कारवाई करण्याऐवजी भाजप नेत्यांना ‘ड्रामेबाजी’मध्येच तर रस नाही ना, असाच प्रश्न दिल्ली विमानतळावर हे जे काही औटघटकेचे नाट्य घडले, त्यामुळे उपस्थित झाला आहे.

भाजप सरकारे नेमके ‘टायमिंग’ साधून जे काही करत आहेत, त्यामुळे यावर शिक्कामोर्तब होत आहे. याच धर्तीवर काँग्रेसच्या छत्तीसगड येथील अधिवेशनाचे ‘टायमिग’ साधताना छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर छापे घालण्याचा ‘फार्स’ही भाजपच्या हातातील तपासयंत्रणांनी गेल्याच आठवड्यात सादर केला होता.

अर्थात, या मंडळींनी काही गैरप्रकार आणि गैरव्यवहार केले असतील, तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, भाजपप्रणीत सरकारांना त्याऐवजी ड्रामेबाजीतच रस असल्याचे असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे दिसत आहे.

देशावर दहा वर्ष राज्य केल्यानंतर आता तरी भाजप नेत्यांकडून काही पोक्तपणाची आशा करायला हरकत नसावी. भाजप नेत्यांनी दिल्ली विमानतळावर जे काही घडले, त्याचे समर्थन केले असून काँग्रेसनेते हे काही कायद्याच्या कक्षेबाहेर नाहीत, अशी टिपणी केली आहे. ते खरेच आहे. कायदा हा सर्वांनाच लागू असतो, हे स्पष्टच आहे.

मात्र, खेङा यांना विमानातून उतरवणे असो, की नंतर त्यांना आसाम पोलिसांच्या ताब्यात देणे असो; हे सारे काही कायद्यानुसारच घडले आहे, असा दावा आता भाजप करत आहे. मात्र, खेङा यांच्यावरील कारवाई त्यांना विमानातून उतरवून करण्याइतपत काही गुन्हा त्यांनी केलेला नव्हता, हे तर उघडच आहे.

त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या मोदींच्या विरोधातील काही घोषणाही औचित्याला सोडून होत्या. तरीही ही अशी तत्परता आणि कार्यक्षमता कोट्यवधींचे गैरव्यवहार करून देशाबाहेर पलायन करणाऱ्या संभावित गुन्हेगारांविरुद्ध याच सरकारने आणि याच पोलिसांनी कधीही का दाखवली नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक म्हणावे लागेल.

पण त्याहीपेक्षा मूलभूत प्रश्न असा की, आपल्याकडील राजकीय संवाद-चर्चेचा, सत्तास्पर्धेचा स्तर आणखी किती घसरणार आहे हा. त्याचे उत्तर राजकीय नेत्यांनी आपल्या वर्तनातून द्यायचे आहे.

शिक्षेच्या भीतीने प्रस्थापित केलेल्या सत्तेपेक्षा प्रेमाने संपादन केलेली सत्ता जास्त टिकाऊ आणि परिणामकारक असते.

— महात्मा गांधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com