
...मामाचं पत्र हरवलं?
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला जेमतेम एक जागा जिंकता आली असली, तरी जास्त वादंग माजलेले दिसते ते काँग्रेस पक्षात! खरे तर शिवसेनेत मोठी फूट पाडून ‘महाविकास आघाडी’चे सरकार खाली खेचले गेल्यानंतरही आघाडीने परस्पर सामंजस्य दाखवले, ही लक्षणीय बाब होती. तीन जागा जिंकून ‘एकी’चे बळ त्यांनी दाखवूनही दिले.
या तीन जागांपैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे त्या पक्षात आनंदोत्सव साजरा व्हायला हवा होता. प्रत्यक्षात नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवार निवडण्यापासून सुरू झालेल्या वादाचे कवित्व आता निकालांस चार दिवस उलटून गेले तरीही सुरू आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात या पक्षातील अंतर्गत दुफळी तसेच ‘अव्यवस्था’ यांचीच लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत.
या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले आणि तेच आता काँग्रेसचे पितळ उघडे पाडत आहेत. काँग्रेस या मतदारसंघात मावळते आमदार आणि सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊ करत होते. मात्र, त्यांची इच्छा आपल्या चिरंजीवांना आमदार करण्याची होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ते मान्य नव्हते. पण हे कगा मान्य नाही, याची तर्कसंगत कारणे त्यांनी दिलेली नाहीत. या वादातून काँग्रेसने आपली हक्काची जागा गमावली आहे. खरे तर काँग्रेसला सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारण्यामागे कोणतेही सबळ कारण नव्हते. मात्र, सत्यजित तांबे हे राज्य पातळीवरील काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने आता या वादास ‘पटोले विरुद्ध थोरात’ अशी किनार प्राप्त झाली आहे.
त्यातच सत्यजित यांनी विजयानंतर आपल्याला प्रदेश काँग्रेसने चुकीचे ‘एबी फॉर्म’ पाठवल्याचा जाहीर आरोप केल्यामुळे काँग्रेसमधील बेजबाबदार आणि बेमुर्वतखोर व्यवस्थापनाचे धिंडवडेच निघाले आहेत. अर्थात अशा प्रकारचा बेजबाबदारपणा सहसा होत नसतो. त्यामुळेच यामागे थोरात तसेच तांबे कुटुंबियांना बदनाम करण्याचे षड्यंत्र तर नव्हते ना, असाही संशय घ्यायला जागा निर्माण झाली आहे.
त्याचवेळी विधानसभेच्या पुण्यातील दोन पोटनिवडणुकांच्या उमेदवार निवडीवरून भाजपमध्येही वादंग माजले आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्यातील नेते आपापल्या पक्षात केवळ हितसंबंधाचेच राजकारण कसे करू पाहतात, यावर लख्ख प्रकाश पडला आहे.
नाशिक मतदारसंघातील बंडखोर विजयी आमदार सत्यजित तांबे यांनी पक्षश्रेष्ठींवर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. हा मतदारसंघ पदवीधरांचा असतानाही त्यांना बंद लिफाफ्यात दिलेले ‘एबी फॉर्म’ हे शिक्षक मतदारसंघातील होते. हे नंतर निष्पन्न झाले. तेव्हा त्यांनी काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस एच. के. पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर ऐनवेळी बदलून दिलेल्या फॉर्ममध्येही काही तांत्रिक गफलती होत्या.
त्यानंतर कोणीही म्हणजे पाटील वा नाना पटोले यांनी फोन घेतले नाहीत, असे सत्यजित यांचे म्हणणे आहे. अर्थात, पटोले यांच्या वतीने प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यासाठी थोरात यांच्या स्वीय सहाय्यकाचा हवाला दिला आहे. हा सर्व प्रकार ‘मामाचं पत्र हरवलं!’ या खेळाचीच आठवण करून देणारा आहे. एकंदरीत तांबे कुटुंबीयांबरोबर थोरात यांनाही बदनाम करण्याचे काम पटोले आणि त्यांचे पट्टू करत आहेत, असे दिसत आहे. या वादात खरे कोण आणि खोटे कोण याचा पर्दाफाश यथावकाश होईलही.
मात्र, त्यामुळे काँग्रेसची गेलेली अब्रू भरून निघणे कठीण आहे. खरे तर पटोले यांच्या विदर्भातील नागपूर तसेच अमरावती या दोन जागा भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जिंकल्या असल्या तरी या आरोप-प्रत्यारोपांमुळे काँग्रेसची पत भलतीच घसरली आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो!’ यात्रा विदर्भात अनपेक्षितरीत्या चांगलाच प्रतिसाद मिळवून गेली होती.
तेथील दोन जागा जिंकण्यास या यात्रेने निर्माण केलेल्या वातावरणाचा काही परिणाम झाला काय, हा अभ्यासाचा विषय असला, तरी यात्रेने निर्माण केलेल्या अनुकूल वातावरणास या वादंगाचा फटका बसणार, ही बाब लपून राहिलेली नाही. मुळात या वादाची सुरुवात ही पटोले यांनीच, ‘सत्यजित यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला’, असा आरोप करून केली होती.
आता लाखमोलाचा प्रश्न हे ताबे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी पुढे काय करणार, हा आहे. खरे तर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन या वादावर पडदा टाकता आला असता; पण त्यांनी स्वत:च आपण अपक्ष म्हणून काम करणार, असे सांगून काँग्रेसची अधिकच पंचाईत केली आहे. शिवाय, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्रे फडणवीस हे आपले मोठे भाऊ आहेत’, असे सांगत त्यांनी आणखी तर्ककुतर्कांचे पेव फोडले आहे.
या निवडणुकीत भाजपने त्यांच्याच पारड्यात वजन टाकले होते, हे कधीच लपून राहिले नव्हते. त्यामुळे या बेअब्रूतून नाना काय मुत्सद्देगिरी लढवतात ते बघावे लागेल. त्याचवेळी विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये चिंचवड येथे दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देताना भाजपने कसब्यात मात्र मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्यामुळे नाराजीची लाट भाजपसारख्या शिस्तीचे गोडवे गाणाऱ्या पक्षातही उसळली आहे. एकंदरीत या सर्व घटना राजकारणातील मनमानीचेच दर्शन घडवत आहेत.
यशस्वी संघटनेचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे, तिथे अगदी लहानातील लहान तपशालीचाही काटेकोरपणे विचार केला जातो.
— लोऊ होल्टझ्