राजधानी दिल्ली : काँग्रेसमधील पोरखेळ

काँग्रेस पक्षाची पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यात सरकारे आहेत.
राजधानी दिल्ली : काँग्रेसमधील पोरखेळ
राजधानी दिल्ली : काँग्रेसमधील पोरखेळsakal

राजकारणात केवळ टाळीबजाव भाषणे देऊन अनुयायी मिळत नसतात. त्यासाठी तळागाळात काम करावे लागते. हे लक्षात न घेता पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांना हाताशी धरून पोरखेळ सुरू करण्यात आला. छत्तीसगडमधील पेच सोडविण्याबाबतही निष्क्रियताच िदसत आहे.

काँग्रेस पक्षाची पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यात सरकारे आहेत. ती सरकारे सांभाळणे पक्षाला दुरापास्त होऊन बसले आहे. याचे कारण पक्षनेतृत्वाची पक्षसंघटनेवरील ढिली पकड हे आहे. मुळात कॉंग्रेस पक्षाचे सूत्रसंचालन कोण करीत आहे, याचाच पत्ता लागेनासा झाला आहे. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत. परंतु पक्षात कोणत्याही पदावर नसलेले राहूल गांधी हे सर्व निर्णय करीत असतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे पक्षाला हाकत असतात. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी पक्षाच्या उत्तर प्रदेशाची जबाबदारी सांभळणाऱ्या सरचिटणीस आहेत. म्हणायला त्या उत्तर प्रदेशाच्या प्रभारी असल्या तरी त्यांचा हस्तक्षेप सर्वत्र असतो. अनेक वर्षे संघटनेचे काम व जबाबदारी सांभाळलेल्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार पक्षाची सूत्रे या "त्रिकुटा''च्याच हाती आहेत आणि ते कधीही ती दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देणार नाहीत. त्याचे हे निरीक्षण वास्तववादी मानावे लागेल. कारण या पक्षात या निरीक्षणानुसारच घडामोडी होताना आढळत आहेत.

पंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखा तालेवार नेता सरकारचे नेतृत्व करीत असताना तरुणांना संधी देण्याच्या नावाखाली त्यांचे आसन डळमळीत करण्याचे प्रकार "बंधू-भगिनीं''नी सुरु केले. अमरिंदरसिंग हे वयोवृद्ध आहेत. परंतु एक आदरणीय नेते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या आसनाला सुरुंग लावायचा असेल तर तो सुरुंग तरी जबरदस्त असला पाहिजे याची जाणीवही बंधू-भगिनीं''ना राहिली नाही. तद्दन उथळ आणि नाटकीपणाने ओतप्रोत असलेल्या नवज्योतसिंग सिध्दू यांना त्यांनी अमरिंदरसिंग यांच्या विरोधात फूस लावली. राजकारणात केवळ टाळीबजाव भाषणे देऊन अनुयायी मिळत नसतात. त्यासाठी तळागाळात काम करावे लागते आणि आपला जनाधार तयार करावा लागतो. अमृतसरबाहेर फारसे राजकीय स्थान नसलेल्या सिद्धू यांना हाताशी धरुन पंजाबमध्ये पोरखेळ सुरु करण्यात आला. आपल्याच पक्षाच्या स्थिर सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रकार आहे. याला काय म्हणायचे?

छत्तीसगडमध्ये असे वाटले होते, की सरकार स्थिर आहे. परंतु तेथेही सरकार डळमळीत होऊ लागल्याचे दिसू लागले आहे. टी.एस.सिंगदेव हे एक मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा कालावधीचा तोडगा काढला होता. त्यामुळे ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने ते फारसा पाठिंबा एकत्रित करु शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बहुसंख्य आमदारांना स्वतःजवळ राखण्यात यश मिळविले आणि तूर्तास तरी सिंगदेव यांचा डाव फसला आहे. मुख्यमंत्री भूपेशसिंग बाघेल हे चतुर आहेत. असे सांगतात, की त्यांनी राहूल व प्रियांका या दोघांना अशा पद्धतीने हाताळले आहे, की छत्तीसगढ कॉंग्रेसमधील इतर कॉंग्रेसनेत्यांची त्यांच्याकडे डाळ शिजेनाशी झाली आहे.

सुभेदारी आणि सुंदोपसुंदी

राजस्थानात मात्र पंजाबसारखीच स्थिती आहे. "बंधू-भगिनीं''नी सचिन पायलट यांना मोहरा बनवून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लक्ष्य केले आहे. सचिन पायलट यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करुन गेहलोत सरकार पाडण्याचा प्रकार केला होता. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केले, त्याच धर्तीवर पायलट यांनी बंड करण्याचा हा प्रकार "बंधू-भगिनीं''च्या मदतीने केला होता. परंतु गेहलोत वरुन साधे दिसत असले तरी चलाख व चतुर आहेत. तेथील राजकारणात ते ‘जादूगार'' मानले जातात. त्यांनी पायलट यांना आणि हस्ते परहस्ते "बंधू-भगिनींना''ही दणके दिले आहेत. पायलट सपशेल तोंडावर आपटले. मंत्रीपदही गेले, प्रदेश अध्यक्षपदही गेले आणि हाती फक्त धुपाटणे राहिले, अशी त्यांची अवस्था झाली. राजस्थानात गेहलोत यांची प्रतिमा ही सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता अशी आहे. त्याचा फायदा त्यांना झाला. विशेष म्हणजे राजस्थान भाजपमध्येदेखील जोरदार सुंदोपसुंदी आहे. राजस्थानातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आता तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मोदी-शहा-नड्डा ही मंडळी अस्वस्थ झाली आहेत. त्यांनी वसुंधरा राजे यांना राजस्थानातील राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता व तो अयशस्वी झाला होता. एवढेच नव्हे तर पायलट यांच्या बंडाच्या वेळी गेहलोत सरकारला अंतःस्थ मदत करण्यातही त्यांचा हात होता असे सांगितले जाते. ती बाब गेहलोत यांच्या पथ्यावर पडली आहे. परंतु या तिन्ही राज्यात कॉंग्रेसने मात्र आपल्या राजकीय सुमार बुद्धीचे घडविलेले प्रदर्शन चकित करणारे आहे.

कॉंग्रेसच्या दिवाळखोरीबद्दलचे एक उदाहरण पुरेसे आहे. सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. ११ जणांच्या या समितीत मनमोहनसिंग यांच्याखेरीज ए.के.अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, गुलाम नबी आझाद, भुपिंदरसिंग हुड्डा, प्रमोद तिवारी, मुल्लापल्ली रामचंद्रन, के.आर.रमेशकुमार आणि प्रद्युत बोर्दोलाय यांचा समावेश आहे. मुकुल वासनिक हे संयोजक आहेत. मनमोहनसिंग, अँटनी आणि अंबिका सोनी हे तिघेही प्रकृतीच्या कारणाने जवळपास निष्क्रिय आहेत. मीरा कुमार या जगजीवनराम यांच्या कन्या आहेत. गुलाम नबी आझाद यांचा समावेश त्यांच्या काश्‍मिरी पार्श्‍वभूमीशी संबंधित असावा. अन्यथा त्यांचा व स्वातंत्र्यलढ्याचा सुतराम संबंध नाही. भूपिंदरसिंग हुड्डा हे हरयानातील एक स्वातंत्र्यसेनानी रणबीरसिंग हुड्डा यांचे चिरंजीव आहेत. मुल्लापल्ली रामचंद्रन हे आणखी एक निष्क्रिय नेते आहेत ते केरळचे आहेत. मुकुल वासनिक हे या समितीचे संयोजक आहेत. मुळात त्यांची या क्षेत्रातली काय कामगिरी आहे किंवा योगदान आहे याचा प्रथम शोध घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांना संयोजकपद देऊन काय साध्य केले हे अनाकलनीय आहे. या समितीत काही बुद्धिवादी, स्वातंत्र्यलढ्याचा किमान काही अभ्यास असणारे अशा कॉंग्रेसच्या आणि कॉंग्रेसशी संबंधित व्यक्तींचा समावेश असणे अपेक्षित होते.

समितीचा निव्वळ उपचार

अगदी कॉंग्रेस पक्षात नसलेली परंतु स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांवर विश्‍वास असलेली असंख्य मंडळी असताना कॉंग्रेसला त्यांची आठवण झाली नाही. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद, योजना आयोगाचे सदस्यपद भूषविलेल्या भालचंद्र मुणगेकरांसारख्या व्यक्तीचा समितीत समावेश उचित ठरला असता. जनार्दन द्विवेदी यांच्यासारखे नेते आजही सक्रिय आहेत. परंतु केवळ थातूरमातूरपणा करुन एक समिती नेमायची म्हणून नेमायची, अशा उदासीन पद्धतीने पक्ष चालविणाऱ्या कॉंग्रेसनेतृत्वाकडून कोणती वेगळी अपेक्षा करता येणार? सरकारी पातळीवर स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होईलच; परंतु भारताचे दुर्दैव असे की ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी मंडळी सत्तेत आहेत आणि त्यांच्या हातून हा ऐतिहासिक प्रसंग साजरा केला जाणार आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्यलढा हा कॉंग्रेसचा वारसा आहे. त्यासाठी कॉंग्रेसने विशेष प्रयत्न करणे अपेक्षित होते. परंतु निष्क्रिय लोकांची समिती नेमून कॉंग्रेस नेतृत्वाने आपल्या मर्यादित डबकेबंद बौद्धिकतेचे प्रदर्शन केले. आत्मघातकीपणा करण्याऐवजी कॉंग्रेसला आत्मभान किती लवकर येते, त्यावरच या पक्षाचे भावी अस्तित्व अवलंबून राहील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com