esakal | भाष्य : डावी ‘हात’मिळवणी
sakal

बोलून बातमी शोधा

भाष्य : डावी ‘हात’मिळवणी

भाष्य : डावी ‘हात’मिळवणी

sakal_logo
By
अविनाश कोल्हे

राजकीय जीवनात महत्त्वाकांक्षा असण्यात काहीही गैर नाही. त्यासाठी पक्षांतराचा मार्ग वापरणे, हा तर आपल्या देशातल्या राजकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, पक्षांतर केल्याने कितीसा फायदा होतो आणि होत असल्यास कोणाचा, हा प्रश्‍न उपस्थित केला पाहिजे.

देशाच्या राजकारणात कन्हैया कुमारचा काँग्रेसप्रवेश सध्या गाजत आहे. हे स्वाभाविक आहे. आजही काँग्रेस खरा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचं अस्तित्व गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. देशातला सर्वात जुना पक्ष (स्थापना १८८५) असलेल्या काँग्रेसचा अलीकडे मात्र ऱ्हास होताना दिसतो आहे. मागच्या महिन्यातल्या काही घटनांनी तर ही प्रक्रिया गतिमान होत आहे की काय, असे चित्र निर्माण झाले. यातील एक घटना म्हणजे पंजाबातील सावळागोंधळ आणि दुसरी म्हणजे अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले बिहारचे युवक नेते कन्हैया कुमार आणि गुजरातेतील युवक नेते जिग्नेश मेवानी.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे पक्षातून बाहेर जाणे, ही घटना तशी काँग्रेस पक्षासाठी नवीन नाही. त्याचप्रमाणे जिग्नेश मेवानीसारख्या तरूण आणि अपक्ष दलित नेत्याचा काँग्रेसप्रवेशसुद्धा तशी नवी घटना नाही. चर्चेला घ्यावी अशी घटना म्हणजे कन्हैया कुमारसारखा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवक नेता (जन्म : १९८७) काँग्रेसमध्ये प्रवेश करतो, ही आहे. पक्षांतर करतांना जसं प्रत्येक छोटामोठा नेता कारणं देतो, तशी कन्हैया कुमारनेही दिली आहेत. त्याच्या मते काँग्रेस पक्ष हा मोठा मॉल आहे. मॉलला आग लागलेली असतांना एक छोटी झोपडी वाचवण्यापेक्षा मॉल वाचवला पाहिजे. कन्हैया कुमारच्या अनेक भाषणांत जशी टाळयांच्या वाक्यांची पेरणी असते, तसंच हे एक टाळीचं वाक्य आहे, असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं.

एक ३४ वर्षांचा तसा फारसा अनुभव नसलेला तरुण नेता काँग्रेस पक्षाला लागलेली आग विझवण्याचा विडा उचलतो, ही कल्पना विनोदी आहे. याप्रकारे त्याने स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी लपत नाही. राजकीय जीवनात महत्त्वाकांक्षा असण्यात काहीही गैर नाही. त्यासाठी पक्षांतराचा मार्ग वापरणे, हा तर आपल्या देशातल्या राजकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र पक्षांतर केल्याने कितीसा फायदा होतो आणि होत असल्यास कोणाचा, हा प्रश्‍न उपस्थित केला पाहिजे. २०१९मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षात अनेक नेत्यांचे गाजतगर्जत ‘इन कमिंग’ झाले. याचा नंतर भाजपाला किती फायदा झाला? २०१४ मध्ये १२२ जागा जिंकलेल्या भाजपाला २०१९मध्ये १०५ जागांवर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील सत्तासुद्धा गमवावी लागली.

अर्थात आजची काँग्रेस असा तरतम विचार करण्याच्या अवस्थेत नाही. आजचा काँग्रेस पक्ष देशातल्या अनेक महत्त्वाच्या राज्यांत विकलांग अवस्थेत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ५२ जागा जिंकता जिंकता दमछाक झाली होती. याच लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला बिहारमधून एकूण चाळीसपैकी कशीबशी एक जागा जिंकता आली होती. अशा अवस्थेत काँग्रेसला कन्हैया कुमारच्या प्रवेशामुळे बिहार प्रदेश काँग्रेसमध्ये संजीवनी फुंकता येईल, असं वाटलं असावं. हा अंदाज कितपत बरोबर होता, हे येणाऱ्या काळात दिसेलच. कन्हैया कुमारबद्दल असा अंदाज कॉंग्रेसने कशाच्या बळावर केला, हे मात्र अनाकलनीय आहे. कन्हैया कुमारने २०१९ची लोकसभा निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर बेगुसराय मतदार संघातून लढवली होती. भाजपाचे गिरीराज सिंह यांनी त्याचा पराभव केला. सिंग यांना सव्वाचार लाख तर कन्हैया कुमारला पावणेतीन लाख मतं मिळाली होती. असं असूनही काँग्रेस नेत्यांनी त्याला पक्षात घेतलेले आहे.

फटाफट पदोन्नती

ज्याप्रकारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कन्हैया कुमारला पक्षात फटाफट पदोन्नती दिली, तसंच आता काँग्रेस पक्षाने केलं तर आश्‍चर्य वाटायला नको. कम्युनिस्ट पक्षाने एप्रिल २०१८मध्ये त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले आणि पुढच्याच वर्षी लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत कन्हैया कुमार ‘काँग्रेस नावाचा मॉल वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नावाची झोपडी’ सोडून पसार झाला. या प्रक्रियेत काही वेगळे मुद्दे गुंतलेले आहेत. या निमित्ताने त्यांचा विचार करावा लागतो. भारतीय समाजाचे तसेच राजकारणाचे एकंदरीत स्वरूप ‘मध्यममार्गी‘ आहे. असं असलं तरी काँग्रेसवर सुरुवातीची अनेक वर्षे डाव्या विचारांचा प्रभाव होता. पंडित नेहरू तर उघडपणे समाजवादी विचारांचे होते. जेव्हा जेव्हा त्यांच्या नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळेल, असे वातावरण निर्माण व्हायचे, तेव्हा ‘नेहरूंचे हात बळकट करा’ असे म्हणत अनेक डावे नेते नेहरूंच्या मदतीला धावायचे. दुसरे उदाहरण म्हणजे १९६७मध्ये झालेल्या चवथ्या सार्वत्रिक निवडणुकांचे. यात काँग्रेसने जरी केंद्रातली सत्ता राखली तरी पक्षाची खासदारसंख्या ३६१ वरून २८३वर घसरली. तेव्हाच्या लोकसभेत सत्तासंपादनासाठी २६१ खासदारांचा पाठिंबा हवा असायचा. १९६७मध्ये कॉंग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले होते. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये १९६९मध्ये उभी फूट पडली आणि इंदिरा गांधींचे सरकार अल्पमतात गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक वगैरेंनी पाठिंबा देऊन इंदिरा गांधी सरकार टिकवले. त्याच काळात कम्युनिस्ट नेते मोहन कुमारमंगलम यांनी कम्युनिस्टांनी काँग्रेसमध्ये शिरावे आणि आतून पक्षावर ताबा मिळवावा, अशी रणनीती आखली होती. हाच तो ‘ट्रोजन हॉर्स थिसीस’. त्यानुसार काही कम्युनिस्ट नेते काँग्रेसमध्ये गेले होते. इंदिराजींना कोणत्याही परिस्थितीत त्यांचे सरकार वाचवयाचे होते. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि डिसेंबर १९७०मध्ये अचानक लोकसभाच विसर्जित केली. मुदतपूर्व निवडणुका घेतल्या आणि ३५२ जागा जिंकल्या. नंतर त्यांना कोणत्याच पक्षाच्या पाठिंब्याची गरज राहिली नाही आणि बघताबघता ‘ट्रोजन हॉर्स थिसिस’ फसला.

यात मुद्दा असा, की काँग्रेसमध्ये शिरून काँग्रेसला डावे वळण देण्याचे स्वप्न बघण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसची स्वतःची अशी राजकीय संस्कृती आहे, सत्तेचं राजकारण करण्याची पद्धत आहे. काँग्रेस पक्ष एखाद्या अजगरासारखा आहे. त्यात बदल करणे जवळपास अशक्य आहे. असा बदल केवळ काँग्रेसचे वरिष्ठ आणि जुने नेतृत्वच करू शकते. उदाहरणार्थ, १९२१मध्ये जन्मलेल्या नरसिंह रावांनी कॉंग्रेस पक्षात सारी हयात घालवली. त्यांना १९९१मध्ये संधी मिळाल्यावर नवे आर्थिक धोरण जाहीर करून पक्षाच्या आणि देशाच्या आर्थिक धोरणांत आमूलाग्र बदल केला होता. कन्हैया कुमारसारखा नेता काही बदलू शकेल, असं वाटत नाही.

कन्हैया कुमारला प्रवेश दिला, म्हणून जशी काँग्रेसवर टीका करता येते, तसंच त्याला डोक्यावर घेतल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा चार प्रश्‍न विचारता येतात. कन्हैया कुमारच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा होर्इल, असं वाटणं यातच पक्षनेतृत्वाची दिवाळखोरी दिसून येते. नंतर त्याला पक्ष संघटनेत भराभर वर आणणं, पक्षात प्रवेश घेतल्यावर वर्षभराच्या आता लोकसभेची उमेदवारी देणं.. हे सगळं एखाद्या कम्युनिस्टेतर पक्षाला शोभणारं आहे. आजपर्यंत अनेक नेते इतर पक्षांतून काँग्रेसमध्ये गेले, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांत गेले किंवा त्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले. फार क्वचितच एखादा कम्युनिस्ट पक्षाचा नेता काँग्रेससमध्ये गेला. म्हणूनच या घटनेची एवढी चर्चा झाली.

loading image
go to top