कॉपी, पेस्टचा निर्माता

संजय जाधव
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

संगणक "यूजर फ्रेंडली' करण्याची कल्पना प्रथम लॅरी टेस्लर यांनीच मांडली. "ब्राऊजर' हा शब्दही त्यांचाच. संगणक केवळ यंत्र न राहता, त्याने "यूजर'च्या आयुष्यात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, या दिशेने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.

सध्याचे जग "कॉपी,' "पेस्ट'चे आहे, असे म्हणतात. इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा धबधबा अक्षरशः कोसळत असताना तो ओंजळीत भरून घ्यायला ज्या गोष्टींचा उपयोग झाला, त्यात "कट', "कॉपी' आणि "पेस्ट' या कमांड अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. संगणकाच्या सुरुवातीच्या काळात या "कमांड' नसत्या, तर काय झाले असते, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. बहुधा अनेकांना संगणक कसा वापरावा, हे कळले नसते.

सुरुवातीच्या काळात म्हणजे 1960च्या दशकात संगणकाचा फार थोड्या लोकांशी संबंध येई. त्यामुळे संगणक सर्वसामान्य जनतेच्या अंगवळणी पडण्याची शक्‍यता नव्हती. त्या काळात ही कळ शोधून काढणाऱ्या लॅरी टेस्लर यांचे नाव त्यामुळे सर्वतोमुखी झाले आणि ते गेल्याच्या बातमीने संगणक वापरणाऱ्या सगळ्यांनाच हळहळ वाटली. याचबरोबर त्यांनी "फाइंड' आणि "रिप्लेस' या कमांडही शोधल्या. संगणक "यूजर फ्रेंडली' करण्याची कल्पना प्रथम टेस्लर यांनीच मांडली. "ब्राऊजर' हा शब्दही त्यांचाच. संगणक केवळ यंत्र न राहता, त्याने "यूजर'च्या आयुष्यात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, या दिशेने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. 

टेस्लर यांनी 1960च्या सुरुवातीला सिलिकॉन व्हॅलीत काम सुरू केले. झेरॉक्‍स कंपनीत त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर "ऍपल'चे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्यातील संशोधक हेरून त्याना कंपनीत घेतले. तेथे त्यांनी 17 वर्षांच्या कालावधीत मुख्य शास्त्रज्ञाच्या पदापर्यंत झेप घेतली. "ऍपल'मधून बाहेर पडल्यानंतर शैक्षणिक स्टार्टअप स्थापन केले. तसेच, "ऍमेझॉन' आणि "याहू'सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसाठी काही काळ काम केले. प्रत्येक कंपनीत काम करताना त्यांनी संगणक सर्वसामान्यांना वापरण्यास सोपे व्हावेत, यावर संशोधनाला प्राधान्य दिले.

ते स्वतः सर्जनशील आणि नावीन्याच्या शोधात असलेले तज्ज्ञ होते. पण, दुर्दैवाने त्यांनी शोधून काढलेल्या "कॉपी-पेस्ट'ला सध्या नकारात्मक छटा आली आहे. त्याचे कारण वापरकर्त्यांची दिसेल ते विचार न करता उचलण्याची वृत्ती. ती शाळेतल्या प्रकल्पांपासून पीएचडीच्या संशोधकांपर्यंत कुठेही आढळून येते आणि अलीकडे तर या वृत्तीचे प्रमाण चिंताजनक वाटावे, एवढे वाढले आहे. टेस्लर यांची स्मृती जागती ठेवायची असेल, तर त्यांनी शोधलेल्या वाटांवरून जाताना आणि त्यांचा वापर करतानाच त्यांच्या सर्जनशीलतेपासूनही प्रेरणा घेतली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: copy, paste creator larry tesler dies at 74