CSR च्या माध्यमातून सामाजिक सेतू ... CSR Social bridge through Campaign medical assistance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSR

CSR च्या माध्यमातून सामाजिक सेतू ...

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ने सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी ऑनलाइन, डिजिटल वेबसाइट स्वरूपात प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी तसेच,

स्वयंसेवी संस्था, देणगीदार आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी अभियान राबविण्यात येते. त्याला देणगीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,

दोन वर्षात राज्यातील १२ स्वयंसेवी संस्था व चार गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदतीसाठीचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, क्राउड फंडींगद्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे.

‘अवनि’ संस्थेच्या बालगृहातील मुले होणार डिजिटल साक्षर ः कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात वीटभट्टी व ऊसतोड कामगार अशा स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अवनि संस्था कार्यरत आहे.

अवनि बालगृह ः अवनि संस्था २८ वर्षांपासून निराधार, वंचित, शाळाबाह्य, एकलपालक, वीटभट्टीवर काम करणारी मुले, भंगार जमा करणारी मुले व कचरावेचक वस्तीमधील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अवनि बालगृह हा प्रकल्प चालवते. यात मुला-मुलींच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व मानसिक आरोग्य या गरजा पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत संस्थेमार्फत ११ हजार ५०० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

संस्थेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील हणबरवाडी येथे वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची इमारत बांधली असून, येथे ४५ मुलींचे संगोपन केले जाते. संस्थेतील मुलांना डिजिटल स्वरूपात शिक्षण उपलब्ध होण्यासाठी डिजिटल ई- लर्निंग सेंटर उभारणीसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ उपक्रमांतर्गत अभियान राबविले होते. त्याला पुण्यातील देसाई ब्रदर्स लिमिटेड या आस्थापनेने कंपनीच्या (सीएसआर) सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. यातून अवनि बालगृह प्रकल्पाअंतर्गत डिजिटल ई-लर्निंग सेंटर उभारले आहे.

उत्कर्ष विद्यालयास स्वच्छतागृह ः सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका या दुष्काळग्रस्त परिसरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. संजीवनी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था व चळवळ सुरु केली. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी उत्कर्ष विद्यालय चालविण्यात येते.

ही शाळा दहावीपर्यंत असून, शाळेतील विद्यार्थी संख्या एक हजारहून अधिक आहे. शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहाची पुरेशी सोय नव्हती, त्यामुळे ‘सोशल फॉर अॅक्शन’च्या माध्यमातून संस्थेने अभियान राबविले. त्यास पुण्यातील देसाई ब्रदर्स लिमिटेड यांनी सीएसआर निधीतून स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी निधी दिला असून, स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

स्वच्छतागृह व ई-लर्निंग सेटअप प्रकल्प ः ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे मुलींची गैरसोय होते. त्यामुळे मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण जास्त आहे. स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधांसाठी ‘सोशल फोर ॲक्शन’

अभियानाच्या माध्यमातून अॅक्ट फॉर एज्युकेशन उपक्रम हाती घेतला आहे. त्याला पुण्यातील पी.एन.जी. ज्वेलर्स प्रा. लिमिटेड यांनी आस्थापनेच्या (सीएसआर) सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून दिला.

त्यातून भोर तालुक्यातील तांभाड येथील जि. प. प्राथमिक शाळेत व वेल्हे तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय, दौंड तालुक्यातील चौफुला येथील जि. प. शाळा, पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील जि. प. शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ई-लर्निंग सेटअप उपलब्ध करून दिला आहे.

शाळांसाठी ॲक्ट फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शाळांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग व माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर अंतर्गत मदतीची आवश्यकता आहे.

गरजू मुलींसाठी सायकल बँक प्रकल्प ः ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. वाहतुकीची सोय नसल्याने मुलींना पाच-पाच किलोमीटर पायी चालावे लागते.

त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. तसेच, पालक आपल्या मुलींना वाहतुकीची सोय नसल्याने शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे सायकल बँक प्रकल्प राबविणे गरजेचे आहे, हे ओळखून ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.

पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेने प्रतिसाद देऊन, सायकल बँक प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत प्राथमिक स्तरावर पुणे, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमधील १२० गरजू मुलींना नवीन सायकली वाटप करण्यात येत आहेत. सायकल बँक उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात सुरू करावयाचा आहे. या उपक्रमास सामूहिक मदतीची गरज आहे.

अशी करा मदत...

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व उपक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या,

औद्योगिक कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येकाला देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६