भरदिवसा काळोख अन् खगोलप्रेमींची पळापळ!

या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आठ एप्रिल रोजी दिसले. या वेळी १८५ कि.मी. रुंदीच्या आणि १६००० की.मी. लांबीच्या पट्ट्यात सूर्याची खग्रास अवस्था दिसली.
solar eclipse
solar eclipsesakal

- डॉ. प्रकाश तुपे, डलास, अमेरिका

या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आठ एप्रिल रोजी दिसले. या वेळी १८५ कि.मी. रुंदीच्या आणि १६००० की.मी. लांबीच्या पट्ट्यात सूर्याची खग्रास अवस्था दिसली. ती प्रामुख्याने मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये दिसली. या ग्रहणावर ढगांचे व पावसाचे सावट असल्याने हे ग्रहण कुठून पाहावे, या बाबत आकाश निरीक्षकांचा संभ्रम होता. सुदैवाने हवामानाचे साथ दिल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांना ग्रहण दिसले.

अमेरिकेमधील १३ राज्यांमधून हे ग्रहण दिसणार असल्याने ३२ लाख लोकांना ग्रहण दिसेल, असा सरकारचा अंदाज होता व त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेऊन सुरक्षितपणे ग्रहण पाहण्यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली होती. बहुतेक शाळांमध्ये ग्रहण चष्मे वाटून ते कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दिले गेले.

टेक्सास राज्यात ढगांचा त्रास होणार नाही, असे जाहीर केल्याने १०-१५ लाख लोकांची गर्दी होईल, असे वाटल्याने डलास शहरात पोलिसांनी आणीबाणी जाहीर केली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होईल असे वाटून काही विशेष नियम जाहीर केले होते. व चौकाचौकात रस्त्याच्या बाजूला न थांबण्याच्या सूचना आणि वाहतुकीचा खोळंबा होण्याबद्दल सूचना दिल्या होत्या.

ग्रहण पाहण्यासाठी देशोदेशींच्या खगोलप्रेमींनी गर्दी केली होती. पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे २५ सभासद अमेरिकेत विविध राज्यात पोचले होते. जेथे नक्की ग्रहण दिसेल, असे वाटत असलेल्या टेक्सास राज्यात ग्रहण काळात ढग येतील असा हवामानाचा अंदाज जाहीर झाल्याने ग्रहणप्रेमींची धावपळ झाली. काही जणांनी तर एका रात्रीतून ५००-६०० किलोमीटरच्या प्रवासास सुरुवात ही केली होती.

कदाचित याचमुळे गाड्यांचे भाडे दुप्पट, तिप्पट वाढले होते. आणि अनेकांना ऐन वेळेवर वाहनेही मिळाली नाहीत. या ग्रहणात कित्येक अब्ज डॉलरची उलाढाल अपेक्षित असताना ढगांमुळे अनेकांची निराशा केली. क्षितिजाजवळील ढगांमुळे ग्रहणाच्या काही वैशिष्ठ्यांचे निरीक्षण करता आले नाही.

तसेच सूर्याजवळ Pons-Brook धुमकेतू दिसला नाही, मात्र गुरू व शुक्राचे दर्शन घडले. पुढीलवर्षी सूर्य प्रक्षुब्ध अवस्थेत जाणार असल्याने सूर्यबिंबावर चारपाच सौर डाग आणि सौरज्वाळा दिसल्या. नासाने सौर वातावरणाच्या संशोधनासाठी काही अग्निबाण व विमानातून निरीक्षणे घेतल्याचे दिसले.

चार मिनिटे दाटला अंधार

मेक्सिको येथे सोमवारी सकाळी ११ वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास) अचानक काळोख दाटला. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणामुळे मेक्सिकोच्या नागरिकांना दिवसा काही मिनिटे अंधारात काढावी लागली. मेक्सिकोसह अमेरिका आणि कॅनडातही सूर्यग्रहण दिसले. ग्रहणाचा प्रभाव असलेल्या राज्यांत सुमारे ४ मिनिटे २८ सेकंदापर्यंत दिवसा रात्र अनुभवली. त्याचवेळी ५४ देशांत सूर्यग्रहणाची झलक पाहावयास मिळाली.

‘द गार्डियन’च्या मते अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यांत सुमारे ५० लाख नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. अमेरिकेच्या अर्कान्सास येथे या काळात ४०० जोडपे बोहल्यावर चढले. ‘नासा’च्या मते, अमेरिकेत आगामी २१ वर्षांपर्यंत (२०४५) अशा प्रकारचे खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही.

(लेखक हे पुण्यातील हौशी खगोलनिरीक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com