मराठी चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत राजा परांजपे यांनी भव्य कामगिरी केली आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या सुवर्ण काळाबद्दल बोलायचं, तर तो वासंतिक बहराचाच काळ होता.
Raj paranjape
Raj paranjapeSakal

दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्गज निर्माते, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता राजा परांजपे यांची आज (ता.२४) जयंती. त्यानिमित्त...

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत राजा परांजपे यांनी भव्य कामगिरी केली आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या सुवर्ण काळाबद्दल बोलायचं, तर तो वासंतिक बहराचाच काळ होता. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी व्यक्तित्वाने राजाभाऊ हे गदिमांच्या भाषेत ''भारलेले झाड'' होते. चित्रपटांची निर्मिती करताना त्याच्या संहितेचा गाभा कौटुंबिक राहील, त्यात समाजभानही असेल, याची ते काळजी घेत. त्यांच्या `ऊन पाऊस' 'लाखाची गोष्ट‌' अथवा 'पेडगावचे शहाणे' या चित्रपटातून तुमच्या आमच्या घरातीलच गोष्ट चालू आहे, असंच सतत जाणवत राहतं.

'ऊन पाऊस' तसेच 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटांचे कथानक इतके जबरदस्त होते की, पुढे 'ऊन पाऊस'वरून 'बागबान' आणि 'तू तिथे मी', तसेच 'जगाच्या पाठीवर'वरून काही अंशी 'सदमा', या चित्रपटांच्या निर्मात्यांना, राजाभाऊंच्या चित्रपटांच्या कथांची प्रेरणा घेण्याचा मोह आवरला नाही. ''पाठलाग'' हा सिनेमा राज खोसला यांना इतका आवडला की त्यांनी त्याच्या आधारे हिंदीमध्ये 'मेरा साया' हा चित्रपट बेतला.

'जगाच्या पाठीवर', 'हा माझा मार्ग एकला'सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका परिणामकारक ठरल्या.'जगाच्या पाठीवर'मधील सज्जन, पापभीरू आणि जगात चांगुलपणाच आहे यावर विश्वास ठेवणाऱ्या विनायकाची भूमिका आजही रसिकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटाच्या शेवटी कोर्टसीनमध्ये विनायक हा गुन्हेगार म्हणून उभा असतो, तो सीन तर राजाभाऊंच्या कसदार अभिनयाची उंची गाठणारा आहे. 'चित्रपटाचे कथानक गंभीर असो किंवा विनोदी, राजाभाऊंच्या अभिनयाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. त्यांच्या चित्रपटातील गीते ही बहुतांशी वेळा गदिमांची तर संगीत बाबूजींचे असे. या त्रिमूर्तीने मराठी चित्रसृष्टीला वैभवाचे, मानाचे स्थान बहाल केले. 'जिवाचा सखा' हा चित्रपट या त्रयींचा पहिला चित्रपट होता. राजाभाऊंना संगीताचे उपजतच अंग होते. १९४८ते १९७०या काळात ते मराठी चित्रपटाचे अनभिषिक्त सम्राट होते. ते उत्तम पेटीवादन करीत. उत्तम कॅरम खेळत. ''लपंडाव'' या नाटकात बदलीच्या भूमिकेसाठी राजाभाऊंच्या चेहऱ्याला जो रंग लागला, तो शेवटपर्यंत. ''सावकारी पाश''मध्ये त्यांची नायकाच्या मित्राची भूमिका खूप गाजली. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांना राजाभाऊंनी गुरू मानले होते. पुढे भालजींनी त्यांना 'थोरातांची कमळा', 'सुनबाई' अशा चित्रपटात भूमिका दिल्या. भालजींच्या दिग्दर्शन कौशल्याने राजाभाऊ भारावून गेले व त्यांनी भालजींचा गुरुमंत्र घेतला. ''बलिदान'' हा राजाभाऊंनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्याची सिनेरसिकांनी फारशी दखल घेतली नाही. मात्र दिग्दर्शक म्हणून राजाभाऊंचे नाव पुढे आले. राजाभाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्यातील विद्यार्थी कायम जागा ठेवला.

चित्रपटांची उत्तम केमिस्ट्री

राजाभाऊंच्या चित्रपटांमध्ये प्रसंगोचित गाणी तसेच आशयघन शब्द, भावपूर्ण संवाद, सुरेल गीते, अचूक दिग्दर्शन आणि महत्वाचे म्हणजे उत्तम अभिनेत्यांची मांदियाळी असे यशस्वितेचे गमक असे. दिग्दर्शन करताना त्यातील कथेचा गाभा, हळुवारपणा जपणे हे राजाभाऊंचे खास वैशिष्ट्य. ''हा माझा मार्ग एकला'' या चित्रपटाला राष्ट्रपती पदक व महाराष्ट्र शासनातर्फे नऊ पुरस्कार मिळाले. ''पाठलाग'' हा रहस्यमय मराठी चित्रपट त्यांनी काढला, त्यासाठीही राजाभाऊंना राष्ट्रपती पदक मिळाले. मानवी मनाची अस्वस्थता असा अत्यंत गहन विषय ''पडछाया'' चित्रपटाच्या कथानकाचा अविभाज्य भाग होता. ''लाखाची गोष्ट ''या चित्रपटातील प्रियकराची अवखळ भूमिका, ''संथ वाहते कृष्णामाई'' या चित्रपटातील निराश झालेल्या सरकारी नोकरीतील इंजिनिअरची भूमिका राजाभाऊंनी अत्यंत यशस्वी केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ''बंदिनी'', ''चाचा चौधरी'' यामधील भूमिकांचे राजाभाऊंनी सोने केले. कसदार निर्मिती, संवेदनशील दिग्दर्शन आणि चतुरस्त्र अभिनयामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचा सुवर्णकाळ दीपस्तंभासारखाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com