छत्री रीपेर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali Katre writes tourism ambrella monsoon rain tour travel

श्रावणातल्या सोमवारी मुलांना फिरायला न्यायचं ठरलं. पालकांना सूचना दिलेली होती.शाळेच्या शेजारी दोन इमारती सोडून छोटेसे एक मैदान आहे तिथे आज एक काका येणार होते.

छत्री रीपेर...

दीपाली कात्रे

श्रावणातल्या सोमवारी मुलांना फिरायला न्यायचं ठरलं. पालकांना सूचना दिलेली होती.शाळेच्या शेजारी दोन इमारती सोडून छोटेसे एक मैदान आहे तिथे आज एक काका येणार होते. काकांचे नाव लक्ष्मण होते. आता काकांची ओळख कशी झाली तर एकदा त्यांचा नातू वाचनालयात भेटला मला. त्याचे काका खाली उभे होते पण काकांच्या हातात एक लोखंडी पेटी खांद्याला लटकवलेली होती आणि एक छत्री हातात होती. काकांना मी विचारले,‘ किती वाजता निघता, तुमच्या पेटीत काय काय आहे, आमच्या मुलांना दाखवाल का?’ ते तयार झाले. त्या सोमवारी मुलांना सकाळी लवकरच बोलावलं. लक्ष्मण काकांकडे जायचं आहे म्हणून मुलं खुश होती. काकांनी त्या लोखंडी बॅगेला खांद्यावर लटकवलेलं होतं. बॅगेचा पट्टा जाड रेगझिनचा होता. काकांनी गंमत म्हणून एक फेरी मारली मुलांभोवती. तोंडाने वेगळा आवाज काढत आरोळी दिली. ‘जुना sss छत्री रिपेर जुनाsss चप्पल रिपेर’ असं म्हणत काका आता मध्यभागी बसले. त्यांनी पेटी उघडली. ते खेळकर होते. एक एक साधन काढत ते जणू काही गाणं म्हणत होते,‘ ‘तुटा फुटा छत्री रिपेर करू’, छोटी हातोडी काढून पेटीवर हलके हातोडी ठण ठण अशी त्यांनी वाजवून दाखवली. तोंडाने म्हणतच होते, `छोटी छोटी हातोडी काम करते भारी’.

मुलांसमोर आज काम करायचं म्हणून ते खुशीत होते. साधी वाक्ये न म्हणता गाण्यांमध्येच म्हणत होते. सुई धागा बघा आता छत्री शिवतो. भराभरा छत्रीच्या तारा भरभर जोडतो, चपलेला पॉलिश करतो. चकाचक क्रीम पॉलिश, साधा पॉलिश बुटावरती कपडा कसा मारतो बघा चक चक चक चक चक चक. लाकडी खोकड्या वर हात आपटत एका मुलाला जवळ बोलावले, त्याचा एक पाय ठेवत त्या लाकडी खोकड्यावर आणि फडक्याने त्याचे बूट पुसून दिले. खरी गंमत पुढे झाली. एका मुलाने कपडा हातात घेतला खाली बसून काकांसारखा फडका त्या मुलाच्या बुटावर मारू लागला. सगळी मुलं धावत आली. कोणी पॉलिश करायचा मऊ ब्रश हातात घेतला, दुसऱ्याच्या गालावर फिरवून पाहिला. मुलांची धमाल सुरू झाली. बुटाचं पॉलिश.. तेल मालिश असे काका एकीकडे म्हणत होते. ताई दादांना गंमत वाटत होती .आता काकांनी पेटी रिकामी केली. छोट्या खेळांची डबी वाजवून दाखवली. बुटात घालायचे सोल बाहेर काढले आणि ते प्रदर्शनासारखे लावून ठेवले. मुलांना वाटलं ते पायात घालायचे आहेत; पण ते पायात घालता येत नव्हते. त्याचा उपयोग काकांनी सांगितला. किती वेळ झाला तरी मुलं कंटाळत नव्हती. काकांचं काम करतानाच फक्त चित्र दाखवून उपयोग झाला नसता. प्रत्यक्ष काका आल्यामुळे हे सगळं घडत होतं.

बाल शिक्षणाचा केंद्रबिंदू जर कोठे असेल तर तो हाच. संवाद, मुलांशी गप्पा, त्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांना उलट प्रश्न करून त्यांची संशोधन वृत्ती जागी करणे. सहज शिक्षणाचे हे उदाहरण आहे. मुलांना संवाद साधता आला. मुलांनी वस्तूला हात लावला; पण कोणी ओरडणारे नव्हते. त्या बघितलेल्या साधनांचा दुसरा उपयोग करता येतो का, हे जाणण्याचा त्या सहा वर्षांच्या मुलांनी प्रयत्ने केला. त्यांचे कुतूहल बऱ्याच अंशी भागले. मुलांचे लक्ष केंद्रित झाले होते, ते त्यांच्या कौशल्यावर. मुलांनी उत्स्फूर्तपणे विचारलेले प्रश्नही त्यासंबंधी होते. या सगळ्या वस्तू त्यांना कोठून मिळतात, ही उत्कंठा त्यांना होती. काका आवाज काढत होते, तसे ते त्यांनाही करायचे होते. आवाजाचे आकर्षण असतेच; पण साध्या गोष्टींचा उपयोग आणि त्यातून येणारा आवाज याचेही ते बारीक निरीक्षण करत असतात. मुलांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली तर माहिती काढण्याचे काम ते आपोआप करतात, याचा प्रत्यय या निमित्ताने आला.