विश्वाचे स्वरूप : स्टॉईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepti Gangavane writes about Epicurean and Stoic philosophies

स्टॉईक विचारवंतांची नीतिविषयक भूमिका एपिक्युरस यांच्या भूमिकेच्या विरोधी समजली जाते. ते सुखवादी नाहीत. रोजच्या भाषेत या नावांचा अर्थ पण परस्परविरुद्ध आहे.

विश्वाचे स्वरूप : स्टॉईक

एकाच काळात, भिन्न तरीही काही साधर्म्य असणाऱ्या विचारधारा कशा तयार होतात आणि येणारी कित्येक वर्षे आपली छाप विचारांवर कशी उमटवत राहतात हे एपिक्यूरियन आणि स्टॉईक या विचारसरणी अभ्यासल्यावर लक्षात येते. स्टॉईक विचारवंतांची नीतिविषयक भूमिका एपिक्युरस यांच्या भूमिकेच्या विरोधी समजली जाते. ते सुखवादी नाहीत. रोजच्या भाषेत या नावांचा अर्थ पण परस्परविरुद्ध आहे. एपिक्यूरियन हे मौजमजेत दंग व्हायला आवडणारे लोक असतात असे समजले जाते, तर जे लोक दुःख, वेदना अतिशय धीराने सोसतात, त्यांना स्टॉईक म्हटले जाते. पण या दोन्हींचे विश्वाच्या स्वरुपाविषयीचे विचार काही प्रमाणात सारखे आहेत. एपिक्यूरियनसप्रमाणे स्टॉईकही असे मानतात की, विश्व मूलतः जड, भौतिक आहे. आपल्या अनुभवाला येणाऱ्या निर्जीव वस्तू तर जड तत्त्वाच्या असतातच; पण सगळे सजीव, एवढेच नव्हे, तर ईश्वरही जड, भौतिकच असतो. मात्र स्टॉईक ईश्वर संकल्पना अमूर्त आहे.

विश्वात दोन शाश्वत तत्त्वे आढळतात. त्यातील एक तत्त्व म्हणजे आकारहीन असे जड किंवा भौतिक तत्त्व आणि दुसरे बुद्धी-तत्त्व. जड तत्त्व निष्क्रिय असते. या तत्त्वावर क्रिया करून त्यातून जग निर्मिण्याचे काम क्रियाशील बुद्धी-तत्त्वाचे असते. हे बुद्धी-तत्त्व म्हणजे स्टॉईक तत्त्वज्ञांचा ईश्वर. या ईश्वराचे रूप एखाद्या व्यक्तीसारखे नसते. विश्वाची मूलभूत बुद्धीशीलता हाच ईश्वर. हे बुद्धी-तत्त्व अग्नि किंवा प्राण या रुपात विश्वात सर्वत्र भरून राहिले आहे. या विश्वात जे काही होते ते ईश्वरी योजनेनुसारच होत असते. जगाकडे बघण्याचा स्टॉईक दृष्टिकोन एपिक्यूरियनससारखा यांत्रिकी नाही तर प्रयोजनवादी आहे. विश्वातील घडामोडी यांत्रिकपणे होत नाहीत तर त्यांच्या मागे ईश्वरी प्रयोजन किंवा हेतू असतो असा त्यांचा विश्वास होता.

हे प्रयोजन हेच जगातील सगळ्या घटनांमागे असणारे मार्गदर्शक तत्त्व असते. बुद्धी-तत्त्वामुळेच विश्व एक सुनियंत्रित व्यवस्था आहे. विश्वाच्या बुद्धीप्रधान स्वरुपामुळे त्यातील घटना ईश्वराने म्हणजेच बुद्धी-तत्त्वाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणेच होतात. या नियमबद्धतेमुळे भविष्यात काय होणार आहे हे निश्चित असते. त्यात बदल होऊ शकत नाही. या भूमिकेला ‘नियतीवाद’ किंवा ‘नियततावाद’ असे म्हणतात. जेव्हा आपण एखादी घटना घडणे “अटळ होते” असे म्हणतो, अशा प्रकारचे उद्गार काढतो तेव्हा आपण कळत-नकळत दैववादी किंवा नियतिवादी भूमिका घेतलेली असते.

माणूस शरीर आणि आत्मा यांनी मिळून झालेला असतो. आत्मासुद्धा भौतिक स्वरूपाचा असतो. संपूर्ण देह त्याने व्यापलेला असतो. बुद्धी हा मानवी आत्म्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्टॉईक विचारवंतांच्या मते बुद्धीप्रवणता हाच मनुष्यत्वाचा गाभा आहे. तरीही एपिक्यूरियन विचारांप्रमाणे स्टॉईक विचारातही माणसाच्या मूळ प्रेरणा, भावना यांचे विवेचन केलेले दिसते. कारण माणूस बुद्धीप्रवण असला तरी मुळात प्राणी आहे. इतर प्राण्यांप्रमाणे त्यालाही शारीरिक गरजा, प्रेरणा असतात. त्यांच्याशी जोडलेली सुख-दुःखे असतात.

सर्वच सजीवांची सगळ्यात मूलभूत प्रेरणा स्व-प्रेमाची असते. आपल्या नैसर्गिक स्वरुपाची त्यांना आतून एक प्रकारची जाणीव असते. त्या स्वरुपाला जे अनुरूप असेल, हितकर असेल त्यानुसार जगण्याची धडपड प्रत्येक जीव निसर्गतःच करत असतो. लहानपणी माणूसही अशाच नैसर्गिक उर्मीने जगत असतो. नंतर मोठे होण्याच्या प्रक्रियेत स्व-प्रेम कायम राहिले तरी माणसाची ‘स्व’ प्रतिमा किंवा आपण माणूस म्हणून नक्की काय आहोत याची समज हळूहळू विकसित होते. ‘मी म्हणजे माझा देह’ अशा भूमिकेपासून, ‘हा देह माझा आहे’ इथपर्यंत त्याचा प्रवास होतो. ‘मी बुद्धिशील जीव आहे’ ही जाणीव अधोरेखित होत जाते. नीतिमान जीवन जगण्यासाठी या वासना आणि प्रेरणांचे बुद्धीकडून नियंत्रण करावे लागते. माणसाचे खरे हित बुद्धीचा मार्ग अनुसरण्यातच आहे. भावनांचे आपल्या आयुष्यात किती आणि कसे स्थान असायला हवे हेही बुद्धीच आपल्याला सांगते. विश्वाच्या आणि माणसाच्या स्वरुपात अंतर्भूत असलेल्या बुद्धीला मध्यवर्ती ठेवून, स्टॉईक आपली नीतिमीमांसा कशी मांडतात ते पुढील लेखात पाहू.

Web Title: Deepti Gangavane Writes About Epicurean And Stoic Philosophies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..