संयमी सुखवाद

एपिक्युरस आणि त्यांचे अनुयायी यांची भूमिका ‘एपिक्युरिअॅनिझम’ म्हणून ओळखली जाते. ही भूमिका ‘खा, प्या आणि मजा करा’ असे सांगते अशी लोकप्रिय समजूत आहे.
Deepti Gangavane writes about Happiness is ultimate goal of all human activities
Deepti Gangavane writes about Happiness is ultimate goal of all human activities Sakal
Summary

एपिक्युरस आणि त्यांचे अनुयायी यांची भूमिका ‘एपिक्युरिअॅनिझम’ म्हणून ओळखली जाते. ही भूमिका ‘खा, प्या आणि मजा करा’ असे सांगते अशी लोकप्रिय समजूत आहे.

एपिक्युरस आणि त्यांचे अनुयायी यांची भूमिका ‘एपिक्युरिअॅनिझम’ म्हणून ओळखली जाते. ही भूमिका ‘खा, प्या आणि मजा करा’ असे सांगते अशी लोकप्रिय समजूत आहे. पण वास्तव तसे नाही. या भूमिकेला सुखवाद म्हटले जाते. सुख हेच माणसांच्या सगळ्या कृतींचे अंतिम ध्येय असते, असे सुखवाद मानतो. काही सुखवादी सुखांचा मनसोक्त उपभोग घ्यावा अशा मताचे असतात. पण आपला अनुभव असे सांगतो की, सगळी सुखे सारख्याच योग्यतेची नसतात. एपिक्युरस यांचा सुखवाद या सत्याची दखल घेणारा आहे. एपिक्युरस यांनी ‘सुख’ या संकल्पनेचे सखोल आणि रोचक विवेचन केले आहे. हे विवेचन एकाच वेळी मानसशास्त्र आणि नीतिशास्त्र या दोन्हींची दखल घेणारे आहे. ते सुखाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करतात. काही सुखे स्थिर असतात आणि काही सुखे अस्थिर. बहुतेक जण आपल्या इंद्रियांना सुखवणाऱ्या संवेदनांना सुख असे समजतात. ही सुखे अस्थिर असतात, कारण ती विशिष्ट गरजांवर अवलंबून असतात.

त्या गरजा पूर्ण झाल्या की ती सुखे संपुष्टात येतात. तहान लागल्यावर पाणी पिणे आपल्याला सुखवते, पण तहान भागली, की पाणी पिणे सुख देत नाही. या उलट तहान भागल्याची जी सुखकारक संवेदना असते, ती टिकून राहणारी आणि म्हणून स्थिर असते. सुखांचे शारीरिक आणि मानसिक असेही दोन प्रकार असतात. मानसिक सुखे शारीरिक सुखांपेक्षा श्रेष्ठ असतात. देहाची सुखे ही वर्तमानाशी जोडलेली असतात. सुवासिक फुलांचा सुगंध घेणे ही शारीरिक क्रिया आणि त्यातले सुख हे त्या कालावधीपुरते असते. मानसिक सुख-दु:खे मात्र वर्तमानाबरोबरच भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशीही निगडित असतात. अनेक मानसिक सुख-दुःखांना सुखद किंवा दुःखद आठवणी, भविष्याबद्दल वाटणारी आशा किंवा भीती कारणीभूत असतात. भविष्याची चिंता, मृत्यूची, देवाची भीती हे सुखी होण्यातील सगळ्यात मोठे अडथळे आहेत असे एपिक्युरस मानत. भयावर, चिंतेवर मात करून आपण जर आत्मविश्वासाने भविष्याला सामोरे गेलो तर आपल्या वृत्तींमध्ये एक प्रकारचा शांतपणा येतो.

सुख-दु:खे इच्छांशी निगडित असतात. इच्छा पूर्ण झाल्या की सुख होते, अपुऱ्या राहिल्या तर दुःख होते. म्हणजे सुखी होण्यासाठी इच्छा पारखून घ्यायला हव्यात. एपिक्युरस इच्छांचे तीन प्रकार सांगतात. ‘रोटी, कपडा, मकान’ अशा इच्छा नैसर्गिक असतात. त्या पुऱ्या होणे जगण्यासाठी जरुरीचे असते. निसर्गतः या इच्छा मर्यादित असतात. पण कधी कधी त्या अनैसर्गिक रूप धारण करतात. वैविध्यपूर्ण, महागडे अन्न किंवा वस्त्र ही नैसर्गिक गरज न उरता अनैसर्गिक स्वरुपाची लालसा ठरते. आज आपण ज्याला चंगळवादी जीवनशैली म्हणतो, ती एपिक्युरस यांच्या दृष्टीने नैसर्गिक पण अनावश्यक इच्छांना महत्त्व देणारी असते. पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांची हाव इच्छांच्या तिसऱ्या प्रकारात मोडते. या इच्छा अनैसर्गिक, अनावश्यक आणि कुठलीही नैसर्गिक मर्यादा नसणाऱ्या असतात. संपत्ती, कीर्ति, सत्ता या गोष्टी कितीही मिळवल्या, तरी आणखी मिळवण्याचा लोभ असतोच. त्यामुळे या इच्छांची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. म्हणून एपिक्युरस या इच्छांना रित्या, पोकळ इच्छा मानतात. इच्छा आणि सुख यांचे असे नाते असल्यामुळे सुख मिळवण्याचे मार्ग दोन असतात : इच्छांची पूर्तता करत राहणे किंवा इच्छा कमी करत जाणे. अतृप्त इच्छांची संख्या जेवढी जास्त, तेवढे सुख कमी आणि दुःख जास्त हे साधे गणित आहे. म्हणूनच एपिक्युरस बहुतांश वेळा दुसरा मार्ग स्वीकारायला सांगतात. तात्कालिक सुखांचा बेबंदपणे उपभोग घेतला तर तो शेवटी दुःखालाच जन्म देतो. त्यामुळे संयमपूर्वक सुखोपभोग घ्यावा असेही ते सांगतात. सुखी समाधानी जीवनासाठी विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या मदतीने जगाचे स्वरूप समजून घ्यावे आणि इच्छा मर्यादित ठेवाव्यात असे त्यांचे प्रतिपादन आहे. एपिक्युरस यांचा हा सुखवाद ‘जब आवे संतोष धन, सब धन धूलिसमान’ या उक्तीची आठवण करून देणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com