ही वाट दूर जाते...

वास्तवात प्रत्येक संकल्पनेचा सर्वांगीण विचार करायला, प्रत्येक सिद्धांताची चिकित्सक तपासणी करायला शिकवणारा हा विषय महत्त्वाचा
Deepti Gangavane writes about travel of thinking can change human life
Deepti Gangavane writes about travel of thinking can change human lifesakal
Summary

वास्तवात प्रत्येक संकल्पनेचा सर्वांगीण विचार करायला, प्रत्येक सिद्धांताची चिकित्सक तपासणी करायला शिकवणारा हा विषय महत्त्वाचा

ही वाट दूर जाते...

वास्तवात प्रत्येक संकल्पनेचा सर्वांगीण विचार करायला, प्रत्येक सिद्धांताची चिकित्सक तपासणी करायला शिकवणारा हा विषय महत्त्वाचा

Deepti Gangavane writes about travel of thinking can change human life

गेले वर्षभर आपण विचारांच्या प्रदेशात भटकंती करतो आहोत. हा प्रदेश आहे तत्त्वज्ञानाचा. तत्त्वज्ञान हा केवळ बुद्धीला चालना देणारा, क्लिष्ट, आणि व्यवहारात उपयोग नसणारा विषय आहे असे अनेकांना वाटते. वास्तवात प्रत्येक संकल्पनेचा सर्वांगीण विचार करायला, प्रत्येक सिद्धांताची चिकित्सक तपासणी करायला शिकवणारा हा विषय महत्त्वाचा आहे.

जगाकडे व स्वतःकडे बघताना नजरेला कळत-नकळत लागलेली झापडे या विषयाच्या अभ्यासाने दूर होतात. आपल्या भटकंतीचा उद्देश तात्त्विक विचारांच्या क्षेत्रात आपला प्रवेश व्हावा असा होता. प्रत्यक्ष जीवन जगताना कृतींची योग्यायोग्यता ठरवण्यासाठी कशा प्रकारे विचार केला पाहिजे, कुठले घटक विचारात घेतले पाहिजेत हे समजून घेण्यासाठी आपण मुख्यतः तत्त्वज्ञानाच्या नीतिमीमांसा या शाखेवर लक्ष केंद्रित केले.

नीतिसंबंधी जे विचार मांडले जातात, ते विश्वाबद्दल आणि स्वतःबद्दल आपल्या ज्या समजुती असतात, त्यांवर आधारित असतात. म्हणून यासंबंधी भारतीय आणि पाश्चात्य परंपरांमधे रुजलेले महत्त्वाचे दृष्टिकोन आपण सुरवातीला जाणून घेतले. त्यानंतर नीतिविषयक प्रमुख संकल्पना, मूल्ये, सिद्धांत, निकष यांचा कालक्रमानुसार आढावा घेतला. गेल्या काही लेखांमधून उपयोजित नीतिमीमांसेचा प्रदेश धुंडाळायला आपण सुरवात केली.

या सदराद्वारे या क्षेत्रात फक्त धावता फेरफटका मारला आहे. स्थल-काळ-परिस्थितीप्रमाणे नीतिविचारात बदल घडत असतो. काही मूल्ये चिरंतन आहेत असे वाटले तरी वेगवेगळ्या काळात आणि परिस्थितीत त्यांचे अर्थ वेगळ्या प्रकारे लावले जातात. त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन कसे, किती आणि कुठे करायचे यांचे निकष बदलत राहतात. हे होणे स्वाभाविकही आहे आणि इष्टही आहे. याचे एक कारण असे की आपले विचार, आचार हे आपल्या भवतालाला आपण दिलेला प्रतिसाद असतो.

आपल्यासमोर उभी ठाकणारी नैसर्गिक, सामाजिक आणि वैयक्तिक आव्हाने बदलत असताना आपला प्रतिसाद बदलायला हवा. आपल्या ज्ञानात गेली कित्येक शतके अव्याहतपणे जी भर पडते आहे, त्यामुळे आपले जगाचे, स्वतःचे जे आकलन आहे तेही बदलत असते, बदलायला हवे. जर आपल्या चुकीच्या जुन्या समजुतींचा आपल्यावरचा पगडा दूर करता आला नाही, तर आपल्या जगण्याच्या, विचारांच्या, वागण्याच्या पद्धती कालबाह्य होतात आणि काही काळाने निरुपयोगी ठरतात. आजच्या काळाच्या संदर्भात पाहिले तर आज आपल्यासमोर केवळ नैसर्गिक पर्यावरणाबद्दलचेच नव्हेत तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणासंबंधीचेही गंभीर प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांना तोंड देण्यासाठी केवळ जुन्या नैतिक सिद्धांतांचा, मूल्यांचा ऊहापोह पुरेसा नाही.

माणसाने कसे व्हायला हवे हे ठरवण्यासाठी मुळात माणूस काय आहे, तो काय होऊ शकतो आणि काय होऊ शकत नाही, हे माहिती असायला हवे. त्यासाठी आधुनिक विज्ञानाची मदत घ्यायलाच हवी. आज उत्क्रांती-विज्ञान आणि मेंदूविज्ञानासारखी नवी ज्ञान क्षेत्रे माणसाच्या नैतिक वर्तनावर नवा प्रकाश टाकत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघता, माणूस हा मुळात इतर सजीवांपासून नैसर्गिकरीत्या उत्क्रांत झालेला जीव आहे. आपण ज्या नीतीचा, नैतिकतेचा विचार या सदरात केला, तिची निर्मिती कुठल्याही दैवी कारणाने, ईश्वरी योजनेनुसार झालेली नाही. ती माणसाच्या विशिष्ट प्रकारच्या सामाजिकतेमुळे निर्माण झाली आहे. माणूस या जीव-जातीची जैविक जडणघडण एक विशिष्ट प्रकारे झाली आहे आणि ती आपल्याला अजून तरी फारशी बदलता येत नाही. व्यक्तीवरचे सामाजिक संस्कार मात्र काही प्रमाणात बदलता येऊ शकतात. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नीतीचे स्थान आणि कार्य काय आहे, हे उत्क्रांतिविज्ञान सांगते. मानवी मेंदूचे कुठले भाग नैतिक निर्णय घेण्यात कार्यरत असतात, मुळात नैतिक आचरणासाठी आवश्यक इच्छास्वातंत्र्य माणसाला वास्तविक असते की नाही, अशा प्रश्नांची उत्तरे मेंदूविज्ञान शोधते आहे. ज्ञानाचा हा शोध जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत विचारांच्या प्रदेशात दूररदूरपर्यंत भ्रमंती करता यावी, हीच नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com