अणुवाद नि सुखवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepti Gangavane writes human behaviour knowledge

माणसाने कसे वागावे याचा विचार करताना माणूस प्रत्यक्षात कसा विचार करतो, त्याच्या भाव-भावना काय असतात, काय करायचे याचा निर्णय तो कसा घेतो याचे ज्ञान असायला हवे

अणुवाद नि सुखवाद

एपिक्युरस या मताचे होते की जे-जे अस्तित्वात आहे ते जड द्रव्याच्या अतिशय सूक्ष्म, अविभाज्य अशा कणांपासून, म्हणजे अणूंपासूनच तयार झालेले असते. विश्वाच्या अस्तित्वामागे कोणतेही प्रयोजन नसते. निसर्गात जे काही घडते, ते कुठल्याही उद्दिष्टाशिवाय, यांत्रिकपणे घडत असते. एपिक्युरस यांचे काही समकालीन त्यांना नास्तिक मानत असत. त्यांना हा आक्षेप मान्य नव्हता. ते देवांचे अस्तित्व मान्य करत, पण देवही अणूंपासून बनलेले असतात असे मानत.

त्याचप्रमाणे, देवाच्या स्वरुपाबद्दलची त्यांची कल्पना तेव्हाच्या आणि सध्याच्याही कल्पनेपेक्षा खूपच वेगळी आहे. सुखी, समाधानी असे एका वेगळ्या जगात राहणारे अमर्त्य जीव म्हणजे देव, अशी त्यांची कल्पना होती. आपल्या मानवी जगाशी त्यांना काहीच देणे-घेणे नसते. खरे तर त्यांना त्या जगाच्या अस्तित्वाची, माणसांच्या सुख-दुःखांची जाणीवच नसते. साहजिकच ईश्वरेच्छा हे भूकंपासारख्या नैसर्गिक घटना घडण्यामागचे कारण नसते. त्यामुळे देवांचा कोप होईल, अशी भीती बाळगणे निरर्थक असते. ईश्वर विश्वाची काळजी वाहणारा, दु:ख-दैन्य दूर करणारा असतो हे त्यांना मान्य नव्हते. एवढेच नव्हे, तर ‘दूरितांच्या समस्येचा’ उल्लेख त्यांच्या लिखाणात सापडतो. या समस्येचे स्वरूप थोडक्यात सांगायचे तर असे आहे: जर ईश्वर सर्वशक्तिमान, दयाळू आहे, तर जगात दूरिताचे, वाईटाचे, दु:खाचे अस्तित्व का आहे? सर्वतोपरी चांगले जग त्याने का निर्माण केलेले नाही? जर त्याची तशी इच्छा असूनही तो ते निर्माण करू शकला नसेल, तर तो सर्वशक्तिमान नाही असा त्याचा अर्थ होतो. तो सर्वशक्तिमान असूनही जर त्याने तसे जग निर्माण केले नसेल, तर तो दयाळू आहे असे म्हणता येणार नाही. थोडक्यात, या दुरिताचे अस्तित्व असलेल्या जगाचा निर्माता असा कोणी असेल, तर त्याला सर्वशक्तिमान आणि दयाळू मानता येणार नाही. अनेक वर्षांनंतर ख्रिश्चन धर्मशास्त्राच्या चर्चेत ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या विचारवंतांचा हा एक प्रमुख युक्तिवाद होता. या युक्तिवादाला समाधानकारक उत्तर देणे अतिशय अवघड आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

देवांप्रमाणे आत्माही अणूंचाच बनलेला असतो. तो अमर नसतो. अणू कधीही नष्ट होत नाहीत, पण अणूंपासून तयार होणाऱ्या शरीराप्रमाणे त्यांच्यापासून तयार झालेला आत्माही नश्वर असतो. मृत्यूच्या वेळी हे वेगवेगळे अणू नष्ट झाले नाहीत, तरी विखुरले जातात आणि आत्मा नाश पावतो. सुख मिळवण्याची इच्छा अतिशय नैसर्गिक असते. अगदी तान्ह्या बाळालाही सुख-दु:खाच्या संवेदना कळतात. अग्नि उष्ण असतो हे ज्या सहजपणे आपल्या लक्षात येते, तितक्याच सहजपणे सुख चांगले असते आणि दु:ख वाईट असते हे आपल्याला उमजते.

मृत्यूची आणि मृत्यूपश्चात आपल्याला आपल्या कृत्यांची देव शिक्षा देतील, याची भीती माणसांच्या डोक्यावर जणू टांगत्या तलवारीप्रमाणे लटकत असते. या दबावामुळे माणसे आपले सुख स्वास्थ्य हरवून बसतात. त्यांच्या अस्वस्थतेचे, चिंताग्रस्ततेचे ते मुख्य कारण असते. पण जेव्हा मृत्यू म्हणजे माणसाचे अस्तित्व संपणे हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा मृत्यूनंतर काय हा प्रश्नच शिल्लक राहात नाही. शिवाय मरण येते त्या क्षणी आपण नसतोच, कारण त्या क्षणालाच आपले जीवन नष्ट होते. मग मरणाचे भय बाळगण्याचे कारणच नाही, असा युक्तिवाद एपिक्युरस करतात. एपिक्युरस यांचे तत्त्वज्ञान चार्वाकांची आठवण करून देणारे आहे. चार्वाकांप्रमाणे तेही सुखवाद सांगतात. तो पुढच्या लेखात पाहू.

Web Title: Deepti Gangavane Writes Human Behaviour Knowledge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top