स्थितप्रज्ञतेकडे...

विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते ईश्वराच्या म्हणजेच बुद्धी-तत्त्वाच्या हेतूला धरून होते
स्थितप्रज्ञतेकडे...
स्थितप्रज्ञतेकडे...sakal
Summary

स्टॉईक तत्त्वज्ञांची याबद्दलची कल्पना वेगळी आहे. ते मांडतात की विश्वाच्या आणि स्वतःच्या स्वरूपाला अनुसरून जगण्यातूनच हे उद्दिष्ट साध्य होते. विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते ईश्वराच्या म्हणजेच बुद्धी-तत्त्वाच्या हेतूला धरून होते

अॅ रिस्टॉटलप्रमाणे स्टॉईकही युडेमोनिया हे जीवनाचे उद्दिष्ट आहे असे मानतात. युडेमोनिया म्हणजे माणसामध्ये दडलेल्या क्षमतांचे बहरून येणे; ज्यात कल्याणाची कल्पनाही समाविष्ट आहे असे सुख. सद्गुणांना अनुसरून केलेल्या वर्तनाबरोबरच संपत्ती, चांगले रूप, चांगल्या कुटुंबात जन्म, चांगले मित्र असे अनेक घटक अॅरिस्टॉटल यामध्ये समाविष्ट करतात. स्टॉईक तत्त्वज्ञांची याबद्दलची कल्पना वेगळी आहे. ते मांडतात की विश्वाच्या आणि स्वतःच्या स्वरूपाला अनुसरून जगण्यातूनच हे उद्दिष्ट साध्य होते. विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते ईश्वराच्या म्हणजेच बुद्धी-तत्त्वाच्या हेतूला धरून होते. विश्वातल्या सगळ्या प्रक्रिया बुद्धी-तत्त्वच नियंत्रित करते. म्हणून निसर्गात नियमबद्धता आढळते. यामुळेच निसर्गात किंवा मानवी आयुष्यात जे काही होते ते कसे, कधी होणार आहे हे ठरलेलेच असते. त्यात बदल होऊ शकत नाही.

विश्वाचे हे स्वरूप नीट जाणून घ्यायला हवे. हे जाणण्याची क्षमता माणसामध्ये आहे, कारण याच बुद्धी-तत्त्वाचा अंश माणसात असतो. शारीरिक गरजा, मूलभूत प्रेरणांच्या पातळीवरचे प्रतिसाद इतर प्राण्यांसारखेच असतात. पण विचार करण्याची क्षमता, त्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी हे माणसाचे खरे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे माणसासाठी योग्य जीवन तेच असते जे बुद्धीच्या मार्गदर्शनाप्रमाणेच जगले जाते. अशा जीवनात विश्वाच्या आणि माणसाच्या स्वरुपाचे योग्य ज्ञान आणि सद्गुण यांचे स्थान सर्वोच्च असते. युडेमोनियाची प्राप्ती याच दोन्हींच्या द्वारे होऊ शकते. त्यासाठी इतर बाह्य घटक आवश्यक नसतात. सॉक्रेटिस यांच्याप्रमाणे स्टॉईक नीतिविचार बुद्धिकेंद्री, ज्ञानकेंद्री आहेत. ज्या गोष्टी आपण चांगले जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असे मानतो, त्या खरोखरच तशा आहेत का हे तपासण्याची गरज असते. सुख, सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, धन-संपत्ती, मान-सन्मान या सगळ्या गोष्टी माणसाला हव्याशा वाटतात. या गोष्टींना निश्चितपणेच काही मूल्य असते. ‘चांगल्या’ जीवनात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. पण त्याच वेळी हे ध्यानात घ्यायला पाहिजे की या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे चांगल्याही नसतात किंवा वाईटही. त्यांचा चांगलेपणा किंवा वाईटपणा परिस्थितीवर अवलंबून असतो. उदा. शारीरिक ताकद जर इतरांचा छळ करण्यासाठी वापरली तर ती अर्थातच ‘चांगली’ असू शकत नाही, पण तीच ताकद कुणाला मदत करण्यासाठी वापरली तर मात्र ‘चांगली’ ठरते. एकच गोष्ट परिस्थिती निरपेक्षपणे, निरपवादपणे ‘चांगली’ असते; ती म्हणजे सद्गुण. पण बहुसंख्य लोकांना एखाद्या गोष्टीला काही ‘मूल्य’ असणे आणि ती गोष्ट ‘चांगली’ असणे यातला फरक समजलेला नसतो. त्यामुळे ते कुठली घटना चांगली, कुठली वाईट यांच्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढतात.

बहुतेक वेळा आपण काय करायचे याचा निर्णय आपण बुद्धीच्या आधारे घेण्याऐवजी भावनांच्या भरात घेतो. असे निर्णय घेताना आपल्याला जगाच्या आणि माणसाच्या खऱ्या स्वरुपाचे पुरेसे ज्ञान नसते. परिणामी आपण स्वत:चे अकल्याण करून घेतो. या उलट असे ज्ञान असेल तर जे काही होते ते तटस्थपणे स्वीकारण्याची आपली मानसिक तयारी होते. स्टॉईक भावनिक तटस्थपणा जोपासण्यावर खूप भर देतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांना अनेकदा दगडी हृदयाचे समजले जात असे. वास्तविक त्यांना अभिप्रेत असलेला तटस्थपणा म्हणजे भावनाशून्यता किंवा अनास्था नव्हे. आपल्या कुठल्या प्रेरणा, भावना योग्य आहेत, कुठल्या चुकीच्या आहेत हे आपण समजून घ्यायला हवे. सुखाची अवाजवी हाव, अनावश्यक ताण-तणाव, भय, मत्सर अशा भावना टाळण्यायोग्य असतात. वृत्तीचा शांतपणा, सावधपणा, आनंद या भावना योग्य आणि हितकर असतात. अशा हितकर भावनांची जोपासना करणे आणि अनिष्ट भावनांना थारा न देणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही. एक आदर्श साधू पुरुषाची स्टॉईक कल्पना आपल्या परंपरेतील ‘स्थितप्रज्ञ’ या संकल्पनेच्या जवळ जाणारी आहे. ज्याच्या प्रकाशात वाट शोधावी, अशा एखाद्या दिशादर्शक ताऱ्याप्रमाणे, हा आदर्श चांगले जीवन जगू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com