चांगला संकल्प म्हणजे काय?

आपल्या आयुष्यात नीतीचे काय स्थान आहे, असा प्रश्न वारंवार मनात यावा असे सध्याचे सामाजिक -राजकीय वातावरण आहे. एक बाजूला अनीतीने वागूनही लौकिकदृष्ट्‍या यशस्वी, सुख-साधने गाठीशी असणारे लोक
Deepti Gangavane writes What is good resolution policy in our life
Deepti Gangavane writes What is good resolution policy in our lifesakal
Summary

आपल्या आयुष्यात नीतीचे काय स्थान आहे, असा प्रश्न वारंवार मनात यावा असे सध्याचे सामाजिक -राजकीय वातावरण आहे. एक बाजूला अनीतीने वागूनही लौकिकदृष्ट्‍या यशस्वी, सुख-साधने गाठीशी असणारे लोक

आपल्या आयुष्यात नीतीचे काय स्थान आहे, असा प्रश्न वारंवार मनात यावा असे सध्याचे सामाजिक -राजकीय वातावरण आहे. एक बाजूला अनीतीने वागूनही लौकिकदृष्ट्‍या यशस्वी, सुख-साधने गाठीशी असणारे लोक आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला अतिशय सचोटीने वागणारे लोक हालअपेष्टा सहन करतानाही आढळतात. कधी-कधी त्यांच्या तत्त्वांची, मूल्यांची कुचेष्टाही होताना दिसते. अशा परिस्थितीत ‘मी नीतिमान का असावे’ हा प्रश्न विशेषतः तरुण पिढीला पडणे स्वाभाविकच म्हणायला हवे.

आदर्श, मूल्ये यांचा जमा‍ना आता संपला असे त्यांना वाटते. यशस्वी व्हायचे असेल तर नीतीला बाजूला सारण्याखेरीज पर्याय नाही अशी अनेकांची समजूत असते. खरे तर अशा स्वरुपाचे प्रश्न नवे नाहीत. कारण नीतिमान व्यक्तींना सुख-समाधान, यश लाभेलच अशी परिपूर्ण, आदर्श समाजव्यवस्था कुठल्याच काळात अस्तित्वात नव्हती. या प्रश्नांना कशा प्रकारे सामोरे जावे या समस्येचा सामना नीतिमीमांसा करणाऱ्या तत्त्वज्ञांना नेहमीच करावा लागतो. वेगवेगळ्या काळात त्या-त्या वेळच्या वैचारिक आणि सामाजिक वातावरणाला अनुसरून या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे.

मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे युरोपमध्ये जे संक्रमण झाले, ते श्रद्धेकडून बुद्धीकडे, धार्मिक विचारांकडून वैज्ञानिक विचारांकडे झालेले संक्रमणही होते. त्या काळात सर्व विचारपद्धतींची, विचारधारांची बौद्धिक चिकित्सा होऊ लागली. विशेष म्हणजे बुद्धीने आपली चिकित्सक नजर स्वत:कडेही वळवली. बुद्धीचे सामर्थ्य आणि मर्यादा समजून घेण्यासाठी बुद्धिवंतांनी बुद्धीचीच मदत घेतली. यातील महत्त्वाचे नाव म्हणजे १८ व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ इमान्यूएल कांट. बुद्धीच्या निरनिराळ्या कार्यांचे परीक्षण करणारे ग्रंथ लिहणाऱ्या कांट यांच्या तत्त्वज्ञानाची ओळखच ‘चिकित्सक तत्त्वज्ञान’ अशी आहे. नीतिमीमांसेला त्यांच्या तत्त्वचिंतनात महत्त्वाचे स्थान आहे. माणसाने नीतिमान असावे कारण तो बुद्धिशाली जीव आहे, असे त्यांचे म्हणणे. त्यांचे नीतिविचार बुद्धिप्रधान आणि कर्तव्यवादी आहेत. त्यांमध्ये बुद्धीच्या मर्यादांचे भान आणि श्रद्धेला स्थान आहे. आधुनिक विचारवंतांनी बुद्धीवर भर दिलेला असला तरी त्यांच्या जीवनात, विचारांत श्रद्धेला जागा नव्हती, असे म्हणता येणार नाही.

या ना त्या प्रकारे धर्म-श्रद्धांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर पडलेला आहे. या दोन्हींचा जाणीवपूर्वक मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कांटही याला अपवाद नाहीत. कांट त्यांच्या नीतिविषयक विचारांच्या मांडणीची सुरवात करताना ‘जगात अशी कुठली गोष्ट आहे की जी नेहमीच, पूर्णपणे ‘सत्’ किंवा ‘चांगली’ असते? असा प्रश्न उपस्थित करतात. या प्रश्नाचे त्यांचे उत्तर स्टॉईक विचारवंतांच्या उत्तराजवळ जाणारे आहे. ज्या गोष्टींना सामान्यत: ‘चांगले’ मानले जाते, त्या प्रत्यक्षात कित्येक विशिष्ट प्रसंगात वाईट ठरतात. मोठे-मोठे आर्थिक घोटाळे करणे हे तीक्ष्ण बुद्धिमत्ता असल्याचे लक्षण आहे, पण त्या बुद्धिमत्तेचा वापर चुकीच्या कारणासाठी झाला असल्यामुळे, ती इथे चांगली ठरत नाही. आपल्या जवळ असणाऱ्या संपत्तीचा गैरवापर करून इतरांच्या न्याय्य हक्कांवर जेव्हा गदा आणली जाते, तेव्हा ती संपत्ती चांगली ठरत नाही. अशा सगळ्या गोष्टींचे परिक्षण केल्यावर कांट या निष्कर्षाला पोचतात की ‘सत्-संकल्प’ ही एकच गोष्ट अशी आहे की ती सदैव, कुठल्याही परिस्थितीत, निरपवादपणे चांगलीच असते. सत्-संकल्पाचा चांगुलपणा इतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. किंबहुना ताकद, पैसा, सत्ता, बुद्धिमत्ता यांसारख्या सगळ्या गोष्टी सत्-संकल्पाबरोबर जेव्हा जोडलेल्या असतात, तेव्हाच त्या चांगल्या ठरतात,

संकल्प म्हणजे दृढनिश्चय. पण सत्-संकल्प म्हणजे नक्की काय? शब्दशः त्याचा अर्थ ‘चांगला संकल्प’ असा आहे. नक्की कशा प्रकारच्या संकल्पाला चांगले म्हणता येईल? कांट यांच्या तात्त्विक परिभाषेत सत्-संकल्प म्हणजे कर्तव्य पार पडण्याचा संकल्प. केवळ असा संकल्पच खऱ्या अर्थाने ‘सत्’ असतो. प्रश्न असा आहे की आपले कर्तव्य काय आहे हे कसे ठरवायचे? या प्रश्नाला कांट यांनी दिलेले उत्तर पुढच्या लेखात पाहू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com