तंत्रज्ञान हाती घेईल युद्धाची सूत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 युद्धाची सूत्रे

तंत्रज्ञान हाती घेईल युद्धाची सूत्रे

संरक्षणविषयक तंत्रज्ञान २१व्या शतकाच्या मध्यावधीपर्यंत अनेक मोठ्या बदलांना सामोरे जाणार आहे. तसं पाहता तंत्रज्ञानाचा विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून विविध क्षेत्रांमध्ये होऊ घातलेल्या बदलांच्या पाठीमागे तंत्रज्ञानातील सुधारणाच असतात. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा असतो. सध्याच्या आधुनिक जगाची गती ठरविण्याची सूत्रंत्रे तंत्रज्ञानाच्याच हातामध्ये आहेत, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या सगळ्या बाबींचा थोड्या अधिक फरकाने सगळ्याच घटकांवर परिणाम संभवतो. संरक्षण क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. आगामी दोन ते तीन दशकांमध्ये या तंत्रज्ञान बदलाचा संरक्षण क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल, हे पाहणे आणि अभ्यासणे मनोरंजक ठरेल. हे संरक्षणविषयक तंत्रज्ञानच भविष्यातील युद्धशास्त्राची दिशा ठरवेल.

पहिल्या जागतिक महायुद्धापासून तंत्रज्ञान विकासाच्याबाबतीत संरक्षण क्षेत्र आघाडीवर असल्याचे आपल्याला दिसून येते. बरीच तंत्रज्ञानविषयक संशोधने आधी लष्करी आघाडीवर झाली आणि नंतर त्यांनी नागरी जीवनामध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते.. (उदाः कॉम्प्युटर, इंटरनेट, जीपीएस आदी) शीतयुद्धानंतर जगाच्या अनेक भागांमध्ये मोठे सामाजिक बदल झाल्याचे दिसून येतात. जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेने वैश्विक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम घडवून आणले. आता तांत्रिक विकासाची प्रगती ही लष्करी गरजांवर अवलंबून राहिलेली नाही.

सध्या बाजारपेठांच्या गरजांमधून नवनवी संशोधने समोर येत असल्याचे दिसून येते. आता हेच रोज झपाट्याने विकसित होणारे नवे तंत्रज्ञान व्यावसायिक अर्थकारणामध्येही प्रवेश करताना दिसते. याच बदलाचा संरक्षण क्षेत्रावरदेखील दूरगामी परिणाम होताना दिसतो. सध्या आधुनिक काळामध्ये सत्तेच्या राजकारणात देशाचे तांत्रिक सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व या दोन्ही संकल्पनांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे विद्यमान संरक्षणविषयक रचनेमध्ये मोठे अभिसरण होताना दिसते. यासाठी आपण फक्त डिजिटल फोटोग्राफीचं उदाहरण विचारामध्ये घेऊयात. सध्या हे तंत्रज्ञान स्मार्टफोनमध्येही उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळं फिल्मची(फितीची) गरजच संपुष्टात आली आहे. (कोडॅकच्या फिल्म आता उद्योगातून बाहेर पडल्याचं दिसेल.) ही घटना एक मोठा तांत्रिक बदल मानावी लागेल. येत्या दोन ते तीन दशकांमध्ये मोठे तंत्रज्ञानविषयक बदल याच धर्तीवर होतील. हा संशोधनाचा सर्वोच्च अविष्कार असेल.

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने

सध्या जग हे चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या (उद्योग ४.०) टोकावर उभे ठाकले आहे. सायबर-भौतिक प्रणालीचा व्यापक वापर हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. ‘इंटलिजंट नेटवर्क सिस्टिम’मध्ये नवे युग अवतरले आहे. बिग डेटा अॅनालिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाउड कॉम्प्युटिंग, थ्री डी प्रिंटिंग, स्वनातीत शस्त्रे, ड्रोन आणि रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा तंत्रज्ञान यांचा नागरी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर परिणाम होताना दिसून येतो. इंडस्ट्री ४.० च्या मूलभूत पैलूंमध्ये डिजिटल, भौतिक आणि जैविक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. भविष्यातील युद्धभूमीचं संचलन हे नव्यानं विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलं जाईल.

सैनिकी तुकड्यांच्या दिमतीला हे तंत्रज्ञान असेल. लष्करातील मनुष्यबळाची जागा यंत्रमानव (रोबो) घेतील, असेही मानले जाते. स्मार्ट सेन्सर, स्मार्ट शस्त्रे, गणवेशासारखी अंगावर वागवता येतील, अशी उच्च तांत्रिकक्षमतेची अस्त्रे, हे भविष्यातील युद्धतंत्राचे स्वरूप असेल. भविष्यामध्ये लष्करी यंत्रणांच्या हातामध्ये अशा काही तंत्रप्रणाली असतील, की ज्या माध्यमातून दूर संवेदन, संवाद साधणे, विविध संस्था आणि युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये समन्वय ठेवणे अशी बहुआयामी कामे करता येतील. काही उपकरणांच्या माध्यमांतून तर जागीच निर्णय घेण्याचे कामही केले जाईल. युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी ते निर्णय मार्गदर्शक ठरतील.

भविष्यात युद्धाची रणनीती ठरविण्याचं काम माणूस आणि यंत्र असे दोहोंच्या माध्यमातून होईल. किंबहुना या सगळ्या प्रक्रियेवर यंत्रांचाच वरचष्मा असेल असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. भविष्यातील युद्धशास्त्रामध्ये स्मार्ट सेन्सर, अत्याधुनिक दारूगोळा, शस्त्रांच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक प्रणाली, रोबोटिक प्रणाली, मानवाला धारण करण्याजोगी उपकरणे यांचा समावेश असेल. सध्या ज्या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक गवगवा होतो आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे होय. ‘एआय’मुळे यंत्र अधिक स्मार्टपणे काम करू शकते. हे एकमेव तंत्रज्ञान संवेदन, बुद्धिमत्ता, यांत्रिक स्वयंचलन, स्वायत्त शस्त्रप्रणाली, हायब्रीड प्रणाली आणि बिग तसेच स्मॉल डेटा उत्पादनांना कवेमध्ये घेऊ शकतं. याच ‘एआय’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःहून नव्या गोष्टींचा स्वीकार करत जाते आणि त्यासाठी सुधारित अल्गोरिदमचा वापर करते, यामुळे त्याला ‘सेल्फ प्रोग्रॅमिंग’ सहज शक्य होतं. याच तंत्रज्ञानामुळे लष्कराला आणीबाणीच्या काळात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुविध क्षमतांचा देखील विकास घडवून आणता येऊ शकतो. यामुळे कामाची गती तर वाढतेच; पण त्याचबरोबर निर्णय प्रक्रियाही अधिक वेगवान होताना दिसून येते. हे सगळे ‘रिअल टाइम’च्या आधारावर होते. याच तंत्रज्ञानाचा लष्करी प्रशिक्षण, एकूण मूल्यांकन आणि वाहतूक व आनुषंगिक कार्यांच्या व्यवस्थापनासाठीही वापर होऊ शकतो.

रशियाने युक्रेन युद्धामध्ये स्वनातीत (हायपरसॉनिक) शस्त्रांचा वापर केला आहे. या वापराचा हेतू हा शत्रूपक्षाला आपली ताकद दाखविण्याचा होता. या स्वनातीत शस्त्रांमुळे सध्याच्या आण्विक युद्धतंत्र आणि त्याच्या प्रतिकाराच्या सध्याच्या संकल्पना बदलतील. जेव्हा एखादे क्षेपणास्त्र पाच मॅकपेक्षाही (एक मॅक हा वेग हा ध्वनीच्या वेगाएवढा असतो) अधिक वेगाने जात असेल, तेव्हा ते क्षेपणास्त्र स्वनातीत (हायपरसॉनिक) या गटामध्ये मोडते. या क्षेपणास्त्रांमुळे सध्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली (थाड, एस-४०० आदी) कालबाह्य ठरणार आहेत. हीच हायपरसॉनिक शस्त्रे सध्याच्या आण्विक हल्ला प्रतिबंधाच्या (डिटरंट) संकल्पनेला आव्हान देऊ शकतात. रशियाने आता जरी या क्षेपणास्त्राची ताकद दाखवून दिली असली, तरीसुद्धा हे तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी रशियालादेखील अद्याप काही कालावधी लागेल. चीन, अमेरिकेसारख्या देशांनाही आणखी काही वर्षे लागतील. आता हे देशदेखील भविष्यातील अत्याधुनिक युद्धसामुग्रीच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक करताना दिसतात.

यामध्ये उच्चक्षमतेचे मायक्रोवेव्ह, रेल गन्स, स्वनातीत वेगाने जाणाऱ्या विमानांना रोखणारे ‘पार्टिकल क्लाउड्स’ यांचा समावेश होतो. बड्या देशांच्या भात्यामध्ये ही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली येण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागू शकतो. भविष्यातील युद्धतंत्रावर परिणाम घडवून आणू शकेल, असे आणखी एक तंत्रज्ञान म्हणजे ‘थ्री डी प्रिंटिंग’ हे होय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्लॅस्टिक, धातू, पॉलिमर आणि अन्य घटकांचा वापर करून त्रिमितीय रचना साकारता येतील. या तंत्रज्ञानामुळे निर्मिती, उथ्पादनाच्या पारंपरिक प्रक्रियेलाच आव्हान देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान जेव्हा पूर्णावस्थेत पोचेल तेव्हा विद्यमान लष्करी आराखडा आणि शस्त्रांच्या निर्मितीचा चेहरामोहराच बदलून टाकेल. लष्करासाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक तरतुदीमध्येही मोठी घट होईल. जुन्या तंत्रज्ञानाला मोडीत काढणारे हे नवे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून, लष्करी यंत्रणांना अधिक सक्षम होण्यासाठी आणखी काही दशकांचा अवधी जाऊ द्यावा लागेल. २०४०-५० मध्ये युद्धशास्त्राचा चेहरामोहराच बदलून जाईल आणि हे बदल क्रांतिकारक स्वरुपाचे असतील.

अमेय लेले ( लेखक सामरिक विश्लेषक आहेत.)

(अनुवादः गोपाळ कुलकर्णी )