नाही श्रुतिपरौती माउली जगा

वैदिक धर्माच्या प्रगल्भ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा विचारप्रणालीचा मूळ उद्देश हा समाजाचे संधारण, समाजघटकांचा योग्य विकास आणि सर्वांचे शाश्वत कल्याण असा तीनपेडी आहे.
development of social elements human being religion
development of social elements human being religionsakal
Summary

वैदिक धर्माच्या प्रगल्भ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा विचारप्रणालीचा मूळ उद्देश हा समाजाचे संधारण, समाजघटकांचा योग्य विकास आणि सर्वांचे शाश्वत कल्याण असा तीनपेडी आहे.

रोहन उपळेकर

वैदिक धर्माच्या प्रगल्भ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा विचारप्रणालीचा मूळ उद्देश हा समाजाचे संधारण, समाजघटकांचा योग्य विकास आणि सर्वांचे शाश्वत कल्याण असा तीनपेडी आहे. चांगल्या, नीतिमान व सुखदायक समाजाची निर्मिती, प्रगती, विस्तार हे समाज-संधारणेचे घटक आहेत. प्रामुख्याने मनुष्यप्राणी आणि त्याच्या जीवनासाठी आवश्यक असणारे वृक्ष-वनस्पती, पशू आदी दुय्यम समाजघटकांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक विकासही धर्माला अभिप्रेत आहे.

त्यात पुन्हा वैयक्तिक व सामूहिक विकास हे दोन्ही भागही अनुस्यूत आहेत. संधारण व विकास यांमधून धर्माचे बहिरंग व्यक्त होते आणि शाश्वत कल्याणातून अंतरंग प्रकट होते. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, संधारण व विकास हा धर्माचा लौकिक आणि शाश्वत कल्याण हा पारलौकिक भाग झाला. हे दोन्ही भाग मिळून वेदांनी एकसंध धर्म सुस्पष्टपणे व्यक्त केलेला आहे.

हीच गोष्ट धर्मशास्त्राच्या भाषेत सांगायची झाली तर, ''यतो अभ्युदयनिःश्रेयस सिद्धि स धर्म: ।'' ज्याद्वारे ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस’ या दोन्हींची परिपूर्ण प्राप्ती होते, तोच धर्म होय ! वर सांगितलेला धर्माचा लौकिक भाग म्हणजेच अभ्युदय आणि शाश्वत कल्याणाचा अलौकिक भाग म्हणजे निःश्रेयस होय. सनातन वैदिक धर्माचे मूळ आधार असणारे वेद या दोन्ही गोष्टींची प्रत्येकाला पुरेपूर प्राप्ती करवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

अभ्युदय म्हणजे सर्वांगीण प्रगती. लौकिक दृष्टीने ज्या ज्या गोष्टींची एखाद्याला सुखदायक जीवनासाठी आवश्यकता सांगितली आहे, त्या सर्वांची सुयोग्य प्रमाणात प्राप्ती होणे म्हणजे अभ्युदय. सुख-दुःखांनी भरलेल्या मानवी आयुष्यातील या सांसारिक प्रगतीचाही उत्तम विचार वेदांनी करून ठेवलेला आहे.

ज्याची जशी मनोभावना किंवा वासना म्हणा, तसा तसा त्याला अनुकूल उपदेश वेद करतात. अर्थात् काही विशिष्ट मर्यादांच्या अधीन राहूनच वेद सुखप्राप्ती सांगतात. कोणत्याही विषयातल्या अमर्याद हव्यासाचा वेदांनी निषेधच केलेला आहे.

निःश्रेयस शब्द बहुआयामी आहे. ज्याच्यापेक्षा अधिक काही श्रेयस्कर असू शकत नाही, त्याला निःश्रेयस म्हटले जाते. वैदिक धर्मात ‘मोक्ष’ हीच एकमेव अशी सर्वार्थाने शाश्वत आनंददायक गोष्ट मानलेली आहे. सुख किंवा दुःख हाच या जगातील प्रत्येक कर्माचा शेवट आहे. या सुख-दुःखरूप अनुभूतीच्याही पलीकडे असणारी आणि कोणत्याही कारणाने न भंगणारी, इतर कशावरही अवलंबून नसणारी अखंड आनंदाची स्थिती म्हणजे मोक्ष.

हाच मानवी आयुष्याचा अंतिम पाडाव. भगवान श्री ज्ञानेश्वर माउली वेदांच्या याच दोन्ही वैशिष्ट्यांचा नेमका गौरव करून त्यांना अवघ्या जगाच्या आईची उपमा त्यासाठीच देतात. ते म्हणतात की, "पै अहिता पासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाही श्रुतिपरौती । माउली जगा’’.

आई जशी आपल्या अजाणत्या लेकराला थोडासाच धाक व जास्त बाबापुता करून अहितापासून दूर करते आणि योग्य शिकवण देऊन त्याचे सर्वच बाजूंनी हित साधून देते; त्याप्रमाणेच ज्ञानाचे भांडार असणारे वेददेखील प्रत्येक मानवाला समानतेने वागवतात आणि धर्माचे यथार्थ स्वरूप समोर ठेवून अहितकारक गोष्टींपासून परावृत्त व हिताच्या गोष्टींसाठी प्रवृत्त करतात.

म्हणूनच ज्याला अभ्युदय व निःश्रेयस अशा दोन्ही प्रकारचे परमकल्याण व्हावे अशी प्रामाणिक तळमळ आहे, त्याने श्रुतिमाउलीची म्हणजेच वेदांची कास कधीही सोडू नये, असा उपदेश माउलींनी केलेला आहे. कारण जो श्रुतिमाउलीचे बोट धरून चालेल त्याचे निःसंशय कल्याणच होईल, हाच श्री ज्ञानेश्वर माउलींचा आणि आजवरच्या ज्ञानी ऋषिमुनींचा पक्का विश्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com