
प्रि य सन्मित्र मा. कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे यांस) शतप्रतिशत प्रणाम. क्याबिनेटनंतर आपण घाईघाईने निघून गेलात, त्यामुळे बोलणे झाले नाही. काही तातडीच्या कामासाठी दिल्लीला आलो आहे. तीन दिवसांनी परत येईन, परत येईन, परत येईन!
मागल्या वेळेला दावोसला जाताना मी कारभाराचा चार्ज कोणाकडे न दिल्याने तुम्ही दरे गावाला आणि मा. दादासाहेब बारामतीला निघून गेले होते. यावेळीही मी चार्ज दिलेला नाही. पण दिल्लीहून मी लक्ष ठेवून असेन. ‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी’ अशी माझी अवस्था आहे. आपली क्याबिनेट चालू होती, तेव्हाच मला वंदनीय श्रीमान मोटाभाई आणि प्रार्थनीय श्रीमान नड्डाजींचा फोन आला. ताबडतोब दिल्लीच्या रणांगणाचा ताबा घेणे, असा त्यांचा आदेश होता.