esakal | ‘आप’च्या कौतुकाचे निनाद
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

‘आप’च्या कौतुकाचे निनाद

sakal_logo
By
धनंजय बिजले

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवून केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या डोळ्यासमोर अक्षरशः काजवे चमकविले. वास्तविक एखाद्या छोट्या राज्याच्या निवडणूक निकालाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर सहसा घेतली जात नाही. पण दिल्लीची निवडणूक याला अपवाद ठरली. जगभरातील महत्त्वाच्या माध्यमांनी या निकालाचे गांभीर्याने विवेचन केले आहे. २०१४ मध्ये भारतात भाजप सत्तेवर आला. त्यानंतर इतक्‍या व्यापक प्रमाणात प्रचारात ध्रुवीकरणाचा वापर करण्यात आलेली ही पहिलीची निवडणूक असल्याचे निरीक्षण ब्रिटनमधील ‘गार्डियन’ने नोंदविले आहे. व्यवस्थेविरुद्ध लढा देणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण केलेल्या ‘आम आदमी पक्षा’ने स्वतःचा वेगळा अजेंडा सतत मांडला. भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्माला आलेल्या या पक्षाने भ्रष्टाचारविरहीत राज्यकारभार करण्यात यश मिळविले. तसेच शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात कमालीची सुधारणा केली. राष्ट्रवाद तसेच हिंदुत्वाचा कार्यक्रम घेऊन प्रचारात उतरलेल्या भाजपला गेल्या वेळेपेक्षा अवघ्या पाचच जागा जास्त मिळाल्या, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आखाती देशांत प्रभाव असलेल्या ‘अल जझीरा’ वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, भाजपच्या आक्रमक प्रचाराला मतदारांनी नाकारले. भारतीय निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक द्वेषाने भारलेली कदाचित ही पहिलीच निवडणूक असेल. मात्र मतदारांनी राजकारणात द्वेषाला स्थान नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत होणाऱ्या विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुकांत भाजपला प्रचार करताना आपल्या धोरणांचा पुनर्विचार करणे भाग पडणार आहे. ‘आम आदमी पक्षा’ने गरीब व मध्यमवर्गीयांसाठी राबविलेल्या धोरणांचा अन्य पक्षांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल.‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून इंजिनिअर, त्यानंतर भारतीय महसूल सेवेत नोकरी, पुढे राजकारणात प्रवेश आणि सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा प्रवास असलेला केजरीवाल यांच्यासारखा नेता सध्या तरी भारतीय राजकारणात नाही अशा शब्दांत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केजरीवाल यांचे कौतुक केले आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून सार्वजनिक राजकारणात प्रवेश केलेल्या केजरीवाल यांनी एखाद्या कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांवर मात केली आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकदाही वैयक्तिक टीका केली नाही. विरोधकांनी त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप केला, त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही. त्याउलट पाकिस्तानविरोधी धोरणांबाबत त्यांनी वेळोवेळी मोदी यांना पाठिंबाच दिला. मोदी तसेच शहा यांनी शाहीनबागवरून वक्तव्ये केल्यावरही केजरीवाल यांनी मुरब्बीपणे त्याला उत्तर दिले नाही. त्यांच्या या धोरणाचा केजरीवाल यांना कमालीचा लाभ झाला.त्यांच्या कल्याणकारी धोरणांचाही उल्लेख या पत्राने केला आहे.

ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे, की भाजपने ध्रुवीकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; मात्र केजरीवाल यांनी त्याकडे योग्य प्रकारे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर ‘आम आदमी पक्षा’ने प्रचारात भर दिला. शाळा, आरोग्य वीज, पाणी या मुद्‌द्‌यांना दिल्लीकरांनी महत्त्व दिले. ‘विकासासाठी राजकारण’ अशी राजकारणाची नवी व्याख्या दिल्लीकरांनी देशाला दिली असल्याची केजरीवाल यांची विजयानंतरची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. देशात सध्या बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक आहे. तसेच सध्या अर्थव्यवस्थाही बेताची आहे. मात्र अशा मुद्‌द्‌यांपेक्षा राष्ट्रवादासारखा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी आणण्यात आला होता. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रचारसभेत वादग्रस्त विधाने केली होती. अशा परिस्थितीत हा दिल्लीचा निकाल सर्वार्थाने वेगळा आहे.

loading image