लष्करी वर्चस्वाची आजारी लोकशाही

धनंजय बिजले
Monday, 2 November 2020

पाकिस्तानात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात तमाम विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. कोरोनाची फिकीर न करता हजारोंच्या रॅली निघत आहेत.

पाकिस्तानात सरकार कोणाचेही असो; सत्ता चालते ती लष्कराचीच. मात्र तरीही आतापर्यंत लष्करावर थेट आरोप करण्यास कोणी धजत नव्हते. आता परिस्थिती बदलत आहे. गेल्या आठवड्यात विरोधकांच्या रॅलीत लंडनहून सहभागी झालेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी थेट लष्करावर सडकून टीका केली, त्यामुळे सारेच आश्‍चर्यचकित झाले.

पाकिस्तानात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात तमाम विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. कोरोनाची फिकीर न करता हजारोंच्या रॅली निघत आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग व झरदारींचा पाकिस्तान पीपल्स पार्टी यांसह प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारविरोधात ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ नावाने नवी आघाडी स्थापली आहे. विशेष म्हणजे प्रथमच विरोधी नेत्यांनी पाकिस्तानी लष्करावर थेट नाव घेत टीका सुरू केली आहे. यावरून शेजारी देशात सारे आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसते. या घडामोडींवर जगातील तसेच पाकिस्तानातील माध्यमांनी केलेल्या भाष्याची नोंद घ्यायला हवी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्कर कमालीचे अस्वस्थ
‘टाइम’ने पाकिस्तानातील घडामोडींवर भाष्य करताना म्हटले आहे, की पाकिस्तानने कोरोनाशी मुकाबला चांगल्या प्रकारे केला; पण त्यामुळे तेथील लोकशाही तंदुरुस्त होणार नाही हे नक्की. ही लोकशाही मुळातच हायब्रिड स्वरूपाची आहे. २०१८मध्ये पंतप्रधान इम्रान खान लोकशाही पद्धतीने निवडून आले असले तर त्यांना लष्कराचा छुपा पाठिंबा होता. त्यामुळेच अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे मिळाली. सध्याचे लष्करप्रमुख बाज्वा यांना खान यांनीच तीन वर्षे मुदतवाढ दिली आहे. याआधीही अनेक पंतप्रधान लष्कराची कळसूत्री बाहुली म्हणूनच कार्यरत राहिले. कोणीच याला अपवाद नाही. मार्च २०२१मध्ये तेथे सिनेटच्या निवडणुका आहेत. सध्या तरी तेथे इम्रान यांच्या पक्षाचे बहुमत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांसाठी लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवूनच तमाम विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. अर्थात, विरोधकांनी प्रथमच लष्कराला राजकीय वादात ओढल्याने लष्कर अस्वस्थ झाले आहे. यापुढे विरोधकांना असाच प्रतिसाद वाढत राहिला तर कदाचित त्यांनाही इम्रान खान यांना पाठिंबा देणे कठीण जाणार आहे. अशा वेळी लष्कर विरोधकांशी हातमिळवणी करू शकते. त्यामुळे आगामी दोन महिने फार महत्त्वाचे ठरणार आहेत.

नवी खेळी
पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे की, विरोधकांनी अखेर रस्त्यावर ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. शरीफ यांच्या लष्करावरील थेट टीकेमुळे या लढ्याची दिशा स्पष्ट झाली आहे. यामुळे लष्कर बेचैन झाले असून, विरोधी नेते आमच्याशी कशी सातत्याने चर्चा करतात, हे लष्कराच्या प्रवक्‍त्यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली आहे. प्रथमच असे घडत आहे. विरोधकांची विश्वासार्हता कमी करण्याचे लष्करच उघडपणे बोलू लागले आहे. लष्कराची ही नवी खेळी आहे. आता खऱ्या अर्थाने राजकीय डाव-प्रतिडावांना सुरुवात झाली आहे. विरोधकांनी इम्रान खान यांच्यापेक्षा त्यांच्यामागे असलेल्या लष्कराला लक्ष्य केले आहे. मात्र लष्करावर टीका करून लोकांना रस्त्यावर आणणे आणि स्वतःची एकी कायम ठेवणे हे विरोधकांपुढील सर्वात मोठे आव्हान असेल. कारण पारंपरिक कट्टर विरोधी पक्ष एक आले आहेत. आगामी काळात देशभर रॅलीज काढण्याचा त्यांचा संकल्प असून, लष्कराला सरकारचा पाठिंबा काढण्यावर मजबूर करण्याचा त्यांचा स्पष्ट इरादा आहे. यामुळे इम्रान सरकारची कसोटी लागणार आहे.  ‘पाकिस्तान टुडे’च्या मते जोपर्यंत लष्कराचा पाठिंबा आहे, तोपर्यंत भीती नाही असे इम्रान खान यांना वाटते. त्यामुळे सध्या ते निश्‍चिंत वाटतात. पण गेली दोन वर्षे त्यांनी जो कारभार केला त्यावर लोक नाराज आहेत. त्यामुळे परिस्थीती कधीही पालटू शकते, हे त्यांना लक्षात घेतले पाहिजे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाढता हस्तक्षेप
‘अल जझीरा’ने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या इतिहासात सात दशकांत निम्मा काळ लष्करच सत्तेत होते. आजही परराष्ट्र व संरक्षण धोरणावर लष्कराचाच वरचष्मा आहे. इम्रान खान यांच्या काळात लष्कर जास्तच हस्तक्षेप करू लागले आहे. अगदी अर्थव्यवस्था चालवण्यापासून ते चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीत लष्कराचे थेट लक्ष आहे. शरीफ यांनी केलेली टीका त्यामुळेच लष्कराला झोंबणार आहे. एकूणात विरोधकांनी प्रथमच लक्ष्य केल्याने पाकिस्तानी लष्कराची कमालीची कोंडी झाली आहे. तोंडदेखल्या लोकशाही सरकारच्या नावाखाली स्वतःचीच सत्ता राबवण्याची खेळी सतत खेळत राहणे लष्कराला महागात पडू शकते. यामुळे जगातही पाकिस्तानी लोकशाहीचे हसे होते. यामुळे आगामी काळात तेथील लष्कराचीच खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay bijale write article about Pakistan Military Democratic Movement