ही तर नव्या शीतयुद्धाची चाहूल

धनंजय बिजले
सोमवार, 27 जुलै 2020

अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत,तसा अमेरिकेचा चीनविरोध टोकदार होत आहे.याला आता शीतयुद्धाचा वास येवू लागला आहे.अमेरिका व सोविएत युनियनमधील शीतयुद्ध जगाने अनुभवले आहे.

व्यापारयुद्ध व कोरोनामुळे आता अमेरिका व चीन एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकले असून नव्या शीतयुद्धाची नांदी झाली आहे. या शीतयुद्धाचे स्वरुप कसे असेल, यातून जगाची पुन्हा विभागणी होणार का, याची गंभीर चर्चा अमेरिकी प्रसारमाध्यमांत सुरू झाली आहे. त्याची ही झलक.   

अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, तसा अमेरिकेचा चीनविरोध टोकदार होत आहे. याला आता शीतयुद्धाचा वास येवू लागला आहे. अमेरिका व सोविएत युनियनमधील शीतयुद्ध जगाने अनुभवले आहे. हे शीतयुद्ध लोकशाही की कम्युनिस्टशाही असे सैद्धांतिक होते. त्यावेळी जग दोन महासत्तांत विभागले होते. बर्लिनची भिंत हे जणू त्याचे प्रतीक होती. १९९१ मध्ये सोविएत युनियनचे विघटन झाले आणि अमेरिका एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. गेली तीन दशके जगाचे पोलिस म्हणून वावरताना अमेरिकेला तिची किंमतही चुकवावी लागली. ट्विन टॉवरवरील हल्ला त्याचेच द्योतक होते. या काळात अमेरिकेचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून चीनने स्वतःचे स्थान भक्कम केले.

जगाची फेरमांडणी सुरू
तंत्रज्ञान व व्यापारामुळे जग खूप जवळ आले आहे. अशा गुंतागुंतीच्या व्यवहारकाळात नवे शीतयुद्ध होवू शकत नाही, असा इतिहासकारांचा होरा होता. पण त्याला छेद जात असल्याचे स्पष्ट मत `न्यूयॉर्क टाइम्स`ने व्यक्त केले. त्यांच्या मते, नवे शीतयुद्ध सैद्धांतिक नसेल तर ते तंत्रज्ञान, भूभाग वर्चस्व व प्रभुत्वासाठी असेल. दक्षिण समुद्रातील वर्चस्वाचे चिनी प्रयत्न आणि त्याला दिलेले आव्हान, हे उदाहरणही नमूद केले आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनवर एकापोठापाठ एक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. अन्य देशांच्या मदतीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनला कोंडीत पकडण्याची अमेरिकेची खेळी आहे. भारतानेही टिकटॉकसह पन्नासहून अधिक अॅपवर बंदी घातली. ब्रिटनने `५ जी` तंत्रज्ञान विकसित करण्याचे हुवेई या चीनी कंपनीचे कंत्राट रद्द केले. यातून चीनला मोठा फटका बसेल. चीनने शेजारी देशांशी सुरु केलेला वाद, इराणला देवू केलेली भरघोस आर्थिक मदत यावरून जगाची फेरमांडणी होवू लागली असल्याचे संकेत आहेत. जीनिव्हातील राष्ट्रसंघाच्या मानावाधिकार परिषदेतही याचे प्रतिबिंब उमटले. हॉंगकॉंगमधील चीनच्या नव्या कायद्यास बेलारूसपासून झिंबाब्वेपर्यंत ५३ देशांनी पाठिंबा दिला. तर केवळ २७ देशांनी विरोध केला. यात प्रामुख्याने युरोपीय देश व जपान, न्यूझीलंडचा समावेश होता. आपल्या बाजूने ओढण्यासाठी चीन अनेक देशांना सढळ हाताने आर्थिक मदत देवू करीत आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

संबंध सुरळित होणे कठीण
`वॉशिंग्टन पोस्ट`च्या मते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात आघाडी उघडली आहे. त्याला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचाही संदर्भ आहे. कोरोनाच्या हाताळणीत प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. यावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा रिपब्लिकन पक्षाचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. ट्रम्प यांनी चीनशी पूर्ण संबंध तोडण्याचा इशारा दिला आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बिडेन यांनीही चीनविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी ट्रम्प निवडून येवोत किंवा बिडेन; चीनशी संबंध सुरळित होणे कठीण आहे. आशियातील अन्य मोठे देशही विरोध करू लागल्याने चीनचा राष्ट्रवाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तंत्रज्ञान उद्योगाला खरा फटका
`इकॉनॉनिमिस्ट`च्या मते या वादाचा खऱा फटका जागतिक तंत्रज्ञान उद्योगाला बसणार आहे. गेल्या वर्षी केवळ एका दिवसात अॅपलने चीनमध्ये १० कोटी डॉलरची विक्री केली. तर अमेरिकेचा विरोध असूनही हुवेई या चिनी कंपनीने अफाट नफा मिळविला. कोरोनामुळे जगभरातील अब्जावधी लोक सध्या इंटरनेटसाठी जास्त वेळ व पैसे खर्च करीत आहेत. हा काळ अमेरिकी व चिनी तंत्रज्ञान कंपन्यांसाठी सुवर्णकाळ ठरेल. सध्या या कंपन्यांचे भागभांडवल जागतिक शेअरबाजाराच्या एक चतुर्थांश म्हणजे तब्बल वीस ट्रिलीयन डॉलरच्या आसपास गेले आहे. नेमक्या याच सुवर्णकाळात दोन्ही देशांत वाद सुरू झाला. त्याचे फटके आता बसू लागले आहेत. टिकटॉक पाश्चिमात्य देशांत लोकप्रिय होते. त्यावर आता बंदी आली आहे. तर ब्रिटन, फ्रान्सने ५ जी तंत्रज्ञानाचे हुवेईचे कंत्राट रद्द केले आहे. आता हे देश इरिक्सन किंवा नोकियाशी करार करतील. पण त्यांचे तंत्रज्ञान महाग व वेळकाढू असेल. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर या कंपन्यांनी हॉंगकॉंग प्रशासनाला सहकार्य करण्याचे थांबविले आहे. या सर्वांना प्रत्युत्तर म्हणून सेमी कंडक्टरचा चॅपियन असणाऱ्या चीनने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी अपलचा ५ जी फोन बाजारात येणार होता. त्याला आता चीनचे पाठबळ मिळणार नाही. थोडक्यात या संभाव्य शीतयुद्धामुळे तंत्रज्ञानाचे विश्व ढवळून निघणार आहे. या कंपन्यांतही नवे युद्ध छेडले जाणार असून त्याचा कोणाला किती फटका बसेल याचा सध्यातरी अंदाज येणे अशक्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay bijale writes about US and China