चर्चा, चिकित्सा अमेरिकी लोकशाहीची

white-house
white-house

अमेरिकेतील निवडणुकीच्या निमित्ताने माध्यमे तिथल्या लोकशाहीविषयी भाष्य करीत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका ज्यांच्याकडे संशयाने पाहते त्या चीन, रशिया व इराणमधील माध्यमेदेखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी आपापल्या दृष्टिकोनांतून टिप्पणी करीत आहेत. या देशांना कोण अध्यक्ष हवाय, याचेही प्रतिबिंब त्या वार्तांकनात उमटलेले दिसते.

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होणार की डेमोक्रॅटिक जो बायडेन बाजी मारणार, याची जगभर उत्सुकता आहे. जगावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निवडणुकीत परदेशी सत्ताधीशही बारीक लक्ष ठेवून असतात. रशिया ट्रम्प यांच्यासाठी; तर चीन, इराण बायडेन यांच्यासाठी सक्रिय असल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थानी सूचित केले आहे.  

जगातील यच्चयावत माध्यमांत या निवडणुकीवर रकानेच्या रकाने भरून लिहिले जात आहे. मात्र, अमेरिका ज्यांच्याकडे संशयाने पाहते; त्या चीन, रशिया व इराणमधील माध्यमे या निवडणुकीचे कसे वार्तांकन करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘ट्रम्प चीनवर हल्लाही करतील’
अवघा चीन सध्या ट्रम्प यांना शत्रू मानत आहे. त्याचे प्रतिबिंब चिनी माध्यमांत रोज उमटते. ‘ग्लोबल टाइम्स’च्या मते ट्रम्प यांनी कोरोना झाल्यानंतर त्याचे रूपांतर राजकीय स्टंटमध्ये केले. कशाचेही गांभीर्य न बाळगता ते याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. रुग्णालयातूनही चीनवर टीका करण्याचे त्यांनी सोडले नाही. कोरोनाच्या प्रसारावरून ट्रम्प आधीपासून चीनवर आगपाखड करीत आहेत. पण, ट्रम्प यांनी लक्षात घेतले पाहिजे, की यामुळे कोरोना जाणार नाही.

आता तर ट्रम्प यांनी टीकेची धार आणखी वाढविली आहे. मात्र मतदारांना त्यांच्या क्‍लृप्त्या लक्षात येतात. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ते चीनची ढाल पुढे करीत आहेत. ही निवडणूक त्यांच्यासाठी जुगारच आहे. यंदा पराभव झाला तर त्यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. प्राप्तिकराविषयीचे प्रकरण ट्रम्प कुटुंबाला भोवण्याची त्यांना भीती वाटते. कदाचित मतदानाआधी काही दिवस ट्रम्प केवळ टीकेत समाधान न मानता चीनविरोधात लष्करी आगळीकही करू शकतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकशाही आहेच कोठे?
मुळात लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या अमेरिकेत सध्या लोकशाही राहिली आहे का, असा सवाल करीत इराणच्या ‘तेहरान टाइम्स’ने आगपाखड केली आहे. ब्रिटनमधील प्रख्यात अर्थतज्ञ व लेखक रोडनी शेक्‍सपियर यांनी संपादकीय पानावरील विशेष लेखात म्हटले आहे की, सर्व अमेरिकी नागरिकांना चांगले जीवन, स्वातंत्र्य आणि समान संपत्ती हे स्वप्न अमेरिकेच्या संस्थांपकांचे होते. पण त्यांनीही ते कधी पूर्ण केले नाही. आता तर त्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत. अमेरिकेतील मध्यमवर्गाचे उत्पन्न २५वर्षे मागे गेले आहे. प्रत्येक जण कर्जाच्या खाईत लोटला गेला असून कोरोनाआधीच बेरोजगारीचा दर २३ टक्‍क्‍यांवर पोहोचला होता. कृष्णवर्णीयांची दयनीय अवस्था आहे. अमेरिकेत खऱ्या अर्थाने कोणतीच लोकशाही शिल्लक नाही. बेमुर्वतखोर लोकांच्या हाती सत्ता असून कदाचित निवडणुकीचे निकालही ते धुडकावून लावण्याची भीती आहे. धनाढ्य, अब्जाधीश आणि भल्यामोठ्या कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून निवडणुकीत अमाप खर्च करतात. त्यामुळे या तथाकथित निवडणूक प्रक्रियेतून अमेरिकेला कधीच खरी लोकशाही  गवसणार नाही.

२०१६च्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी रशियाचे हॅकर्स मतदारांवर प्रभाव पाडण्याची भीती अमेरिकेत वर्तविली जात आहे. मात्र रशियातील माध्यमे याचा खरपूस समाचार घेताना दिसतात. ‘मॉस्को टाइम्स’ने म्हटले आहे की, अमेरिकेतील निवडणुकीत रशियाचे हॅकर्स हस्तक्षेप करतात हा ‘एफबीआय’च्या संचालकांचा दावा खुद्द ट्रम्प यांनीच फेटाळला आहे. त्यामुळे यातील हवा निघून गेली आहे. पण असे आरोप पाश्‍चिमात्य देश वर्षानुवर्षे करीत आहेत. त्यात काडीचेही तथ्य नाही. जागतिक कराराचे पुतीन प्रशासन कायमच पालन करीत आला आहे. त्यानुसार अन्य देशांच्या निवडणुकीत अशा प्रकारचा हस्तक्षेप रशिया कधीच करीत नाही. आंतरराष्ट्रीय माहितीच्या सुरक्षेसंदर्भात रशिया व अमेरिकेदरम्यानची चर्चा जवळपास थांबलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्याची  गरज आहे.

चीन, रशिया, इराणचे सर्वाधिक लक्ष
या निवडणुकीकडे चीन, रशिया, इराणची सर्वाधिक नजर असल्याचे निरीक्षण ‘बीबीसी’ने नोंदविले आहे. ‘नॅशनल काउंटरइंटेलिजन्स सिक्‍युरिटी सेंटर’चे प्रमुख विल्यम इव्हानिया यांच्या हवाल्याने ‘बीबीसी’ने तीन देश या निवडणुकीकडे कसे पाहतात हे मांडले आहे. या प्रत्येक देशाची मते वेगवेगळी आहेत. ट्रम्प यांच्या बाजूने मते फिरवण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थांना वाटते. रशियाला ट्रम्प पुन्हा हवेत की नको, हे जरी कळत नसले तरी अमेरिकी मतदारांत गोंधळ उडविण्याचा त्यांचा इरादा आहे. पण बायडेन यांना रशियाचे फारसे समर्थन नाही. यावर्षी रशियापेक्षा चीनकडून मोठी भीती असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनातील महत्त्वाचे लोक करतात. चीनला  बायडेन निवडून यावेत, असेच वाटते यात कोणाचेही दुमत नाही. यासाठी चीन हरप्रकारे प्रयत्न करीत आहे. इराणवर ट्रम्प व बायडेन दोघेही टीका करीत आहेत. पण तरीही इराणला ट्रम्प पुन्हा निवडून येवू नयेत असेच वाटते. त्यामुळे त्यांच्याबाबत मतदारांत शक्‍य तितके गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न इराणी हॅकर्स करण्याचा धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com