राज्यरंग - पंजाब : उद्रेकामागची दहशत

पंजाबमधील कोणतीही समस्या ही केवळ त्या राज्यापुरती सीमित नसते. त्याचे परिणाम थेट देशाच्या सुरक्षिततेशी निगडित असतात. त्यामुळे पोलिस चौकीवरील हल्ल्याच्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
Amrutpalsingh
Amrutpalsinghsakal
Summary

पंजाबमधील कोणतीही समस्या ही केवळ त्या राज्यापुरती सीमित नसते. त्याचे परिणाम थेट देशाच्या सुरक्षिततेशी निगडित असतात. त्यामुळे पोलिस चौकीवरील हल्ल्याच्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

पंजाबमधील कोणतीही समस्या ही केवळ त्या राज्यापुरती सीमित नसते. त्याचे परिणाम थेट देशाच्या सुरक्षिततेशी निगडित असतात. त्यामुळे पोलिस चौकीवरील हल्ल्याच्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

पाकिस्तान सीमेला अगदी लागून असलेल्या संवेदनशील अमृतसर जिल्ह्यातील अंजाला पोलिस ठाण्यावर गेल्या आठवड्यात ‘वारिस पंजाब दे’च्या शेकडो सशस्त्र समर्थकांनी थेट हल्ला चढविला. या सशस्त्र जमावापुढे पंजाबचे पोलिसांचेही काही चालले नाही. विशेष म्हणजे उघड उघड खलिस्तानवादी भूमिका घेणाऱ्या अमृतपाल सिंग यांना मानणाऱ्या जमावाने हे कृत्य केल्याने नागरिकांच्या मनात अक्षरशः धडकी भरली नसती तरच नवल. पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी अमृतपालचा सहकारी लवप्रितसिंग याला अटक केली होती. त्याच्या सुटकेसाठी जमावाने पोलिस ठाण्यावर धडक दिली. यात काही पोलिस जखमी झाले.

या घटनेने अनेकांना जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांनी घडविलेल्या हिंसाचाराची आठवण झाली. ८० च्या दशकात सारा पंजाब दहशतवादाच्या घटनांनी पोळला गेला. यात हजारो निरपराध्यांचे प्राण गेले. गेल्या दोन दशकांत हिसेंच्या व्रणाच्या या जखमा भरून पंजाब पुन्हा शांततेच्या मार्गाने निघाला असतानाच या ताज्या हल्ल्यामुळे पंजाब सरकारबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांपुढेही नवे आव्हान निर्माण केले आहे.

कोण आहे अमृतपाल?

राज्यात सध्या अमृतपाल नावाचे प्रस्थ अचानक वेगाने वाढू लागले आहे. अमृतसरच्या जल्लापूर खेड्याचा रहिवासी असलेला अमृतपाल बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडून काही वर्षे व्यवसायासाठी दुबईत गेला. तेथेच त्याने भिंद्रनवालेचे सारे व्हीडीओ पाहिले, साहित्य वाचले. आता तो स्वतःला भिंद्रनवालेचा अनुयायी मानतो. काही काळ राहिल्यानंतर कुटुंबीयांकडून चालविण्यात येणारा वाहतुकीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तो भारतात परतला. गेल्या वर्षी दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याने स्थापन केलेल्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची सूत्रे अमृतपालकडे आली. त्यांनतर त्याचा बोलबाला खऱ्या अर्थाने सुरु झाला.

काही दिवसांपूर्वीच त्याने बालपणीची मैत्रीण व ब्रिटनमधील एनआरआय किरणदीप कौरशी विवाह केला. आता अमृतपाल भिंद्रनवालेसारखीच वेशभूषा धारण करतो. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत अमृतपालची मजल गेली होती. तरीही त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता तर तो उघड उघड खलिस्तानची मागणी करू लागला आहे.

अशांत पंजाब न परवडणारा

पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने देशाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील राज्य. गेल्या वर्षी शेतकरी कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनावेळी याचा अनुभव आलेला आहे. पंजाबातील शीख समुदाय अत्यंत दृढ व ताकदवान मानला जातो. शेतकऱ्यांचा मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारने ठामपणे ठरविले होते. मात्र अखेर आंदोलकांपुढे शक्तिशाली मोदी सरकारलाही नमते घ्यावे लागले होते. पंजाब जास्त काळ अशांत ठेवणे परवडण्यासारखे नाही, त्यामुळे केंद्र सरकारने नमते घेतल्याचे त्यावेळी सांगितले गेले.

आता पंजाबची राजकीय परिस्थिती बदलली आहे. अनेक दशके सत्तेत राहिलेल्या अकाली दल व कॉंग्रेस या पक्षांना सध्या जनाधार नाही. पंजाबची राजकीय, सामाजिक तसेच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असलेल्या प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मतदारांनी बाजूला सारून ‘आम आदमी पक्षा’कडे सत्ता सोपविली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे अननुभवी आहेत. हल्ल्याच्या घटनेने त्यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. सध्या राज्यातील तरुणाईच्या हाताला काम नाही. यातून तत्काळ मार्ग न निघाल्यास ही तरुणाई अमृतपालच्या मागे जाण्याचा मोठा धोका असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. गेल्या काही वर्षांत अमली पदार्थाने पंजाबमधील तरुणाईला घेरले आहे. अमली पदार्थाचा चोरटा व्यापार ही पंजाबसाठी मोठी डोकेदुखी बनलेली आहे. त्यातच हा नवा पेच निर्माण झाला आहे.

पंजाबमधील कोणतीही समस्या ही केवळ त्या राज्यापुरती सीमित नसते. त्याचे परिणाम थेट देशाच्या सुरक्षिततेशी निगडित असतात. केंद्रात सत्तेत असलेला भाजप व आप यांचा दिल्लीतील सत्तासंघर्ष वाढतच चालला आहे. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षात सुसंवाद असेल असे वाटत नाही. पण पंजाबमधील ताज्या घटनेने आता केंदातील मोदी सरकारनेही गंभीर दखल घेण्याची वेळ आलेली आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आता भाजप व आपच्या सरकारांनी एकत्रितपणे या नव्याने उद्भवलेल्या आव्हानावर त्वरित दूरगामी मार्ग काढला पाहिजे. या प्रश्नावरून पंजाब पुन्हा धुमसणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. पंजाब अशांत ठेवणे देशाला नक्कीच परवडणारे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com