राज्यरंग : राजस्थान : फुंकले विधानसभा निवडणुकीचे बिगुल

स्वतःला जादूगार म्हणविणारे अशोक गेहलोत यांची जादू आणखी किती काळ चालणार यावर सचिन पायलट तसेच वसुंधरा राजे शिंदे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
Janaakrosh Yatra
Janaakrosh Yatrasakal
Summary

स्वतःला जादूगार म्हणविणारे अशोक गेहलोत यांची जादू आणखी किती काळ चालणार यावर सचिन पायलट तसेच वसुंधरा राजे शिंदे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

राहुल गांधी आणि भाजप यांच्या यात्रांनी राजस्थानचे राजकारण ढवळून निघाले आहे. स्वतःला जादूगार म्हणविणारे अशोक गेहलोत यांची जादू आणखी किती काळ चालणार यावर सचिन पायलट तसेच वसुंधरा राजे शिंदे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. राजस्थान विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. त्यात याचा फैसला होऊ शकतो.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या दोनशे मतदारसंघात काढलेली जनआक्रोश यात्रा यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत राजस्थानातील राजकीय वातावरण तापले आहे. सरत्या वर्षातील डिसेंबरमधील या यात्रांनी राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले. यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्याच्या प्रचाराचे रणशिंग या दोन यात्रांनी फुंकले आहे. काँग्रेसची सध्या छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान अशा तीनच राज्यांत सत्ता आहे. त्यातील राजस्थान हे सर्वांत मोठे आणि उत्तरेतील महत्त्वाचे राज्य आहे. येथील सत्तेसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.

राजस्थानात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे तरुण नेते सचिन पायलट यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. दोन्ही नेते कोणताही मुलाहिजा न बाळगता एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसतात. त्यामुळे पक्षाची कुचंबणा होते. पण त्याचे सोयरसुतक या नेत्यांना अजिबात नाही. गेहलोत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पायलट यांचा डोळा आहे, त्यांची ती तीव्र इच्छा अनेकदा समोर आली आहे. त्यांना ‘हायकमांड’चाही आशीर्वाद आहे. पण राजकारण कोळून प्यायलेले मुरब्बी राजकारणी गेहलोत आतापर्यंत सर्वांना पुरून उरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद गेहलोत यांच्याकडे सोपवून पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची ‘हायकमांड’ची इच्छा होती.

मात्र पंचाहत्तरहून जास्त आमदारांचा पाठिंबा दाखवत गेहलोत यांनी शक्तीप्रदर्शन करून जणू बंडच पुकारले. गेहलोत तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पायलट यांची ‘गद्दार' अशी जाहीर संभावना करीत पक्षनेतृत्वाला थेट आव्हान दिले. अध्यक्ष पदापेक्षा आपण मुख्यमंत्रिपदाला जास्त महत्त्व देत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. गेहलोत चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते आपण राज्यातील सर्व जात समूहाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे वारंवार दाखवून देतात. त्याउलट पायलट हे केवळ गुज्जर समाजाचे नेते असल्याचे चित्र ते उभे करतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पायलट यांना एकटे पाडण्यात गेहलोत आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. पायलट यांना ते मंत्रिमंडळात घेण्यासही तयार नाहीत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानात येण्याआधी पक्षातील वाद मिटवताना नेत्यांची दमछाक झाली. राहुल गांधी यांची यात्रा सात जिल्ह्यांत जवळपास ५१० किलोमीटर चालली. त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण यात्रा संपताच काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी दरार पडल्याचे दिसते.

भाजपमध्येही गटबाजीला ऊत

राजस्थानातील विरोधी पक्ष भाजपमध्येही सारे आलबेल नाही. तेथेही गटबाजी आहेच; पण ते सत्तेत नसल्याने त्यांच्यातील धुसफूस चर्चेत येत नाही इतकेच. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे या आजही सर्वांत लोकप्रिय नेत्या आहेत. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया स्वतःला मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजपमधील अन्य महत्त्वाचे नेते केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, अर्जुनराम मेघवाल, खासदार राजवर्धन राठोड, विरोधी उपनेते राजेंद्र राठोड, किरोडीलाल मीणा अस्वस्थ आहेत. या साऱ्या राजकारणात वसुंधराराजे सध्या तरी राज्यातील पक्षापासून चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत. राज्यातील नेत्यांना त्या फारसे महत्त्वच देत नाहीत.

त्यामुळे त्यांचे मौन पक्षातील भल्याभल्यांना बुचकाळ्यात टाकत आहे. त्या योग्य वेळेची वाट पाहात असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. त्यामुळे दोनशे मतदारसंघात जवळपास दीड लाख किलोमीटर गेलेल्या जनआक्रोश यात्रेत भाजपने वसुंधरा राजे यांना महत्त्वाचे स्थान दिले. भाजपने या यात्रेत गेहलोत सरकारच्या तक्रारींचा पाढा राज्यातील दीड कोटी मतदारांपर्यंत पोहचवण्यात यश मिळवले. पक्षातील गटबाजी संपवण्याची मोठी जबाबदारी भाजपने प्रभारी या नात्याने अरुणसिंह आणि महाराष्ट्रातील नेत्या विजया रहाटकर यांच्यावर सोपविलेली आहे. अशोक गेहलोत हे कमालीचे मुरलेले राजकारणी आहेत.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री होते. शिवाय दोनदा प्रदेशाध्यक्ष, तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी दलित, आदिवासी ब्राह्मण, राजपूत, ओबीसी अशा बिगर गुज्जर समाज घटकांना एकत्रित आणून त्या समाजाच्या आमदारांची मोट बांधली आहे. त्यामुळे पायलट यांच्यासारखे आपण केवळ गुज्जर समाजाचे नेते नसून समग्र राजस्थानींचे नेते असल्याची प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. स्वतःला जादूगार म्हणविणारे गेहलोत यांची जादू आणखी किती काळ चालणार यावर सचिन पायलट तसेच वसुंधरा राजे शिंदे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

अडचणीत आणणारे मुद्दे

  • उदयपूरमधील निर्दयी हत्त्या व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी झालेल्या तोडफोडींबाबत राज्य सरकारची असंवेदशीलता. यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाला चालना.

  • लम्पी रोगाने लाखो जनावरे मृत्यूमुखी. लम्पीवर वेगाने नियंत्रण आणण्यात गेहलोत सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे मानले जाते. राज्यात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हा मुद्दा काँग्रेसला त्रासदायक.

  • नोकरभरतीसाठी झालेल्या सोळाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. त्यामुळे ‘पेपरलीक सरकार’ अशी संभावना होते.

  • गेल्या निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन काँग्रेसने अजूनही पाळलेले नाही. राज्यातील ७५ लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com