अडलंय खेटर! (ढिंग टांग!)

British Nandi
मंगळवार, 21 जून 2016

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. 

वेळ : निर्णायक! 

प्रसंग : निर्णायकच! 

पात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि...सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई. 

.............................. 

नेहमीप्रमाणे दागिन्यांनी मढलेल्या कमळाबाई गवाक्षाशी फुरंगटून उभ्या आहेत. नेहमीप्रमाणे उधोजीराजे त्वेषाने ताडताड चालत येऊन नेमके सतरंजीत अंगठा अडकून धडपडतात. नेहमीप्रमाणे ते हर हर महादेव असे ओरडतात. नेहमीप्रमाणे कमळाबाई त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. नेहमीप्रमाणे संवाद सुरू होतो. अब आगे...) 

उधोजीराजे : (गोरेमोरे होत) एक्‍माणूस आमची वाटत पाहात होतं वाटतं...हहह! 

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. 

वेळ : निर्णायक! 

प्रसंग : निर्णायकच! 

पात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि...सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई. 

.............................. 

नेहमीप्रमाणे दागिन्यांनी मढलेल्या कमळाबाई गवाक्षाशी फुरंगटून उभ्या आहेत. नेहमीप्रमाणे उधोजीराजे त्वेषाने ताडताड चालत येऊन नेमके सतरंजीत अंगठा अडकून धडपडतात. नेहमीप्रमाणे ते हर हर महादेव असे ओरडतात. नेहमीप्रमाणे कमळाबाई त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. नेहमीप्रमाणे संवाद सुरू होतो. अब आगे...) 

उधोजीराजे : (गोरेमोरे होत) एक्‍माणूस आमची वाटत पाहात होतं वाटतं...हहह! 

कमळाबाई : (पदर दोन खांद्यावर आवळत) अडलंय आमचं खेटर! हुं:!! 

उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) एक्‍माणूस रागावलंय वाटतं...हहह! 

कमळाबाई : (पदर आणखी ओढत) थटलंय आमचं घोडं! हुं:!! 

उधोजीराजे : (लाडीगोडीने) इतकं सजून धजून एक्‍माणूस गेलं तरी कुठं होतं, म्हणायचं?..हहह!! 

कमळाबाई : (फणकाऱ्याने) मसणात! हुं:!! 

उधोजीराजे : (लाडात येत) बाप रे! नाकाचा शेंडा नुसता निवडुंगाच्या बोंडासारखा लालेलाल झालेला दिसतोय रागानं! हहह!! 

कमळाबाई : (नाक मुरडत) इतकी नकोत नावं ठेवायला? निवडुंगाचं बोंड म्हणे! ही काय उपमा आहे? शी:!! एवढं होतं तर आणायची होती एखादी चाफेकळी नाकाची!! 

उधोजीराजे : (गंभीर होत) आता एखाद्या माण्साचा राग कसा काढायचा बरं? आम्हाला तर बोआ काही कळत नाही ह्यातलं! आम्ही रांगडे शिपाईगडी!! एखाद्याची खांडोळी करणं हा आमच्या डाव्या हातचा मळ, पण मनधरणी काही आमच्या स्वभावात बसत नाही!! 

कमळाबाई : (मनातल्या मनात धुमसत) हवीये कुणाला इथं तुमची मनधरणी? जो तो आपल्या कर्मानं जातो! मी होत्ये, म्हणून पंचवीस वरसं सौंसार केला!! पंचवीस वरसांनंतर सासुरवासाचे भोग वाट्याला येतील असं वाटलं नव्हतं! माझंच मेलं नशीब फुटकं!! 

उधोजीराजे : (अचंब्यानं) अहो, येवढं झालं तरी काय? 

कमळाबाई : (स्फुंदत स्फुंदत) येवढी नकोशी झाल्ये, तर काडीमोड का घेऊन टाकत नाही? गळ्यात धोंड बांधून विहिरीत तरी ढकलून द्या! पण ही असली बोलणी नकोत आता!! 

उधोजीराजे : (खांद्याला स्पर्श करत) येवढं काय बोललो आम्ही? 

कमळाबाई : (झपाट्यानं दूर होत) ‘‘युती हवीच असेल तर वेडीवाकडी नको, आम्ही लाचार होणार नाही‘ असं चार्चौघात कोण बोललं? 

 

उधोजीराजे : (ताडताड पावलं टाकत बाणेदारपणाने) काय गलत बोललो? सौंसार करायचा तर टुकीनं करू! एकमेकांची उणीदुणी काढत कशापायी एकत्र राहायचं‘ एवढंच तर आम्ही बोललो! हे तर काय वर्तमानपत्रातल्या स्त्रीविषयक लेखांमध्येही लिहिलेलं असतं!! 

कमळाबाई : (हिणवत) आहाहाहा!! कळतात बरं आम्हाला ही बोलणी! इथं कुणी काही इतकं ‘हे‘ नाहीए!! लाटेत ओंडके तरंगतात म्हणालात! ओं-ड-के!! आम्हाला ओंडके म्हणालात? काही तुमच्या घरचं खाऊन लठ्‌ठ नाही झाले! माहेर सुखवस्तू होतं, म्हणून बाळगत्येय अंगावर हे बाळसं! इतकं काही कुणी बोलायला नको!! 

उधोजीराजे : (खोल आवाजात) अहो, तुम्हाला ओंडके म्हणायला आमची काय लाकडं वर आली आहेत? आणि तुम्हीही म्हणालात ना की निजामाचा बाप काढणाऱ्याशी संगत नको म्हणून! मग झालं तर!! 

कमळाबाई : (सारवासारव करत) आम्ही आमच्या लोकांना समजावण्यासाठी तसं बोललो होतो! ह्याचा अर्थ आम्हाला वेगळं व्हायचंय असा नाही होत! येवढंसुद्धा समजत नसेल तर- 

उधोजीराजे : (तोच मुद्‌दा पकडत) जरा कान इकडे करा!! आम्हीही आमच्या लोकांना बरं वाटावं म्हणूनच बोललो, असं समजा की!! अहो, चार लोकात वावरताना अशी मखलाशी करावी लागतेच! 

कमळाबाई : (संशयानं) तुमच्या मनात नेमकं काय आहे, हेच बै कळत्त नाही!! 

उधोजीराजे : (गोग्गोड हसत) हडळीला नाही नवरा नि झोटिंगाला नाही बायको! अहो, तुमच्याशिवाय आम्हाला जिवाभावाचं आहेच कोण? मग? गेला ना आता राग? कीऽऽऽ... 

कमळाबाई : (खोडकरपणाने) इश्‍श! चहाटळ मेले!! अडलंय आमचं खेटर!! हुहुहु!!

Web Title: Dhing Tang, British Nandi

टॅग्स