(एकतर्फी) पत्रमैत्री (ढिंग टांग)

British Nandi
बुधवार, 6 जुलै 2016

वर्षभरातील पाचवी बातमी थेट कचराकुंडीत गेल्याचे अस्मादिकांना दिसले. सुख एवढेच, की ही क.कुं. कोण्या ऐऱ्यागैऱ्या उपसंपादकाच्या टेबलाजवळची नव्हती. ती थेट संपादकांच्या (वातानुकूलित) दालनातली होती! तरीही जिवाला गाऽऽरगाऽऽर वाटले नाही; संताप संताप झाला!

वर्षभरातील पाचवी बातमी थेट कचराकुंडीत गेल्याचे अस्मादिकांना दिसले. सुख एवढेच, की ही क.कुं. कोण्या ऐऱ्यागैऱ्या उपसंपादकाच्या टेबलाजवळची नव्हती. ती थेट संपादकांच्या (वातानुकूलित) दालनातली होती! तरीही जिवाला गाऽऽरगाऽऽर वाटले नाही; संताप संताप झाला!

थेट संपादकांकडे दिल्यावर बातमी प्रसिद्ध होणारच, अशी खात्री होती. (रामदास आठवल्यांना केंद्रीय मंत्रिपदाची होती तेवढीच.) फाऽऽर तर नाव कटलं जाईल...पण संपादक महोदयांनी बातमीच क.कुं.मध्ये टाकल्यानं नाकच कटलं गेलं! "दोन दिवसांत खणखणीत बातमी आण. बायलाइनसह हेडलाइन घे. दोनच दिवसांत. नाही तर तुझा तू वाढवी राजा...‘ संपादकांनी "डेडलाइन‘च सांगितली. आम्ही स्वतःचा "अस्मादिक‘ असा आदरपूर्वक उल्लेख करीत असलो, तरी संपादक "तू, तुला‘ असे म्हणत थेट "अरे-कारे‘वरच उतरतात. त्याचा आम्हाला मनःस्ताप होतो.

प्रश्‍न बायलाइनपेक्षाही पोटाचा असल्यामुळे "खणखणीत‘ म्हणविली जाणारी "सनसनाटी‘ बातमी शोधणे भागच होते. तशी ती श्रीक्षेत्र राळेगणसिद्धी येथे मिळतेच मिळते, अशी टीप ज्येष्ठांनी पूर्वीच देऊन ठेवलेली होती. त्यामुळे तेथील वारी करून श्री श्री अण्णा यांची मुलाखत घ्यावी व नाव कमवावे, असे आम्ही ठरविले. तेथे ओळख वगैरे लागत नाही, पूर्वी भेटलेले असणेही आवश्‍यक नसते, असेही कळाले होते. माध्यमवीरांपुढे श्री श्री मन मोकळे करतातच, असा लौकिक. ते असो!

"आधुनिक प्रति महात्माजी‘ अशीच अण्णांची प्रतिमा. (आपले हे एक बरे आहे. आपण मूळ माणसाऐवजी प्रती माणसालाच अधिक मानतो. या "प्रती‘च्या प्रतींचा शोध अविरत सुरू असतो.) तेथे त्यांना "अण्णासाहेब‘ म्हणून संबोधावे, की हल्लीच्या प्रथेनुसार "अन्नाजी‘ असेच म्हणावे, असा संभ्रम होता. या प्राचीन वाटणाऱ्या अर्वाचीन प्रथेचे शेपूट दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत जाते. त्याची वेगळीच जंतरमंतर कथा! आमचा एक अंतःस्थ हेतूही होता. या श्रीक्षेत्री साधना केली, की "प्लेसमेंट‘ नि "पॅकेज‘ही चांगले मिळते, अशी ख्याती आहे. बातमीऐवजी अशी प्लेसमेंट मिळाली तरी भले! त्यासाठी गळ्यात मफलर अडकवावा, की नाव "किरण‘ सांगावे?

आधी लगीन बातमीचे, मग प्लेसमेंटचे असा विचार करून मंदिरात गेलो. अन्नाजींनी आमच्या नमस्काराला "हूं...‘ असा प्रतिसाद दिला. नोटपॅड काढून पेन सरसावले. अन्नाजींनी प्रधानसेवकांना ताजेताजेच पत्र लिहिलेले. "तुम्ही खरे की (सोनिया नव्हे; महात्मा!) गांधी खरे?‘ असा रोकडा सवाल त्यात होता. ते "शहराकडे चला‘ म्हणताहेत नि अन्नाजी सांगतात, "गड्या आपुला गाव बरा.‘

"पत्राला दिल्लीहून काही उत्तर आले की नाही? की तुमच्या सांगण्याप्रमाणे प्रधानसेवकच ("स्मार्ट सिटी‘ सोडून) गावाकडे येत आहेत..?‘ या साध्या प्रश्‍नाने अन्नाजी गंभीर झाले. "माझी पत्रे क.कुं.मध्ये टाकत ते "अच्छे दिन‘चे स्वप्न दिवसाढवळ्या पाहत आहेत...‘ "पण पत्रे कचराकुंडीत टाकून ते "स्वच्छ भारत अभियान‘ चालवीत आहेत, असे तुम्हाला नाही का वाटत?‘ का कुणास ठाऊक अहिंसक अन्नाजी आमच्याकडे जळजळीत नजेरेने पाहत असल्याचा भास झाला. थोडे मागेच सरलो.

"अन्नाजी, एकाही पत्राला ते उत्तर देत नाहीत, असे तुम्ही म्हणता. असे असताना अजून किती दिवस लिहिणार? ही एकतर्फी पत्रमैत्री किती दिवस चालणार?‘ असा (काडी घालू) प्रश्‍न विचारला. खर्जातला आवाज लावत अन्नाजी म्हणाले, "मी फकीर माणूस... कोणाला काही मागत नाही. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून देतच आलो. मरणालाही भिलो नाही; आता या वयात कोणाला भिणार? माझे सारे काही समाजासाठी. म्हणूनच लिहीतच राहणार. उत्तर मिळो किंवा न मिळो. आजवर पाच पत्रे लिहिली. येत्या तीन वर्षांत तेवढीच लिहिणार. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, काळा पैसा, भ्रष्टाचारमुक्त देश, माहितीच्या अधिकारात राजकीय पक्ष, पक्षविरहित निवडणुका...‘

अण्णांच्या पत्रांत नि पत्रकांतही नेहमीच असणारा हा मसाला आम्हाला पाठ झालेला आहे. चवीला जंतरमंतर, लष्कर नि विवेकानंदही. सबब या मुलाखतीने सनसनाटीच काय, साधी बातमीही पदरी पडणार नाही, हे निश्‍चित झाले.

तूर्तास आम्ही संपादकांची "डेडलाइन‘ संपण्याची वाट पाहत, कपाळी श्री क्षेत्रीचा बुक्का लावून शवासन करीत आहोत! 

Web Title: dhing tang, british nandy