बाशी दिवाळी! (ढिंग टांग)

ब्रिटीश नंदी
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 कार्तिक शु. तृतीया.
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।।

 

नमो नम: नमो नम: नमो नम:...परमश्रद्धेय नमोजी आणि आदिदेव अमितभाई ह्यांच्या कृपेने औंदा दिवाळी चांगली गेली. दोघांनाही मोबाईलवर मेसेज पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनीही "सेम टु यू' असा सेम टु सेम रिप्लाय केल्याने जीव भांड्यात पडला! सकाळी मोबाईल स्विच ऑन केला, तर आमच्या कणकवलीच्या राणेदादांचा मेसेज येऊन पडलेला!! ""दिवाळी झाली आता विस्तार कदी करतंस? शिमग्याची वाट बघूक लावू नुको. हॅप्पी दिवाळी'' असा मेसेज बघून मला घाम फुटला. आता ह्यांचे काही केले नाही, तर शिमगा ठरलेला आहे!!

मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर करू, अशी पुडी तेव्हा सोडून दिली होती. म्हटले, दिवाळी तरी बरी जावी! पण आता टेन्शन आले आहे. दिवाळीच्या पूर्वी अनेक पत्रकार पुढाऱ्यांना उगीचच भेटून जातात. भेटवस्तूंच्या यादीत आपले नाव चुकून राहू नये, म्हणून एवढी दक्षता घ्यावीच लागते. (मी फराळ तेवढा दिला!) तसेच आमचे पुढारीसुद्धा भेटून जात असतात. ह्या दिवाळीत आमच्याच पार्टीच्या इतक्‍या लोकांनी मूंहदिखाई करून घेतली की विचारता सोय नाही. परवा एक फेटेवाले पुढारी आले. आमच्याच पक्षाचे असावेत! कारण पक्षाच्या मांडवात त्यांना बघितल्यासारखे वाटत होते. आले, आणि नमस्कार करून ""हॅप्पी दिवाळी'' म्हणाले. मीही त्यांना "सेम टु यू' म्हणालो. मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा, म्हणून गडी घिरट्या घालतोय, हे मला समजत होतेच. थोडा वेळ गप्प उभे राहिल्यानंतर मी त्यांच्या खांद्यावर हात टाकला. म्हणालो, "' तुमचं नाव आहे माझ्या यादीत. डोण्ट वरी! तुमचं मंत्रिपद जवळपास नक्‍की आहे!!''

"अहो, असं काय करताय? मी ऑलरेडी तुमचा शिक्षणमंत्री आहे की! ओळखलं नाहीत का?'' त्यांनी विचारले. फेटाबिटा बांधून वेषांतर करून आलेल्या विनोदवीर तावडेजींना मी ओळखू शकलो नव्हतो, ह्यात माझा काय दोष? हल्ली त्यांना वेषांतर करूनच फिरावे लागते म्हणे!! जाऊ दे झाले.
आमच्या चंदुदादा कोल्हापूरकरांचे तत्त्वचि वेगळे. ऐन दिवाळीत मुद्द्याचा पॉइंट घेऊन आले. म्हणाले, ""साहेब, दिवाळीत फटाके उडवायला कोर्टानं मनाई केली आहे!''
""अलबत, नाहीच उडवायचे मुळी फटाके! किती प्रदूषण होतं त्यानं? मी तर शाळेतल्या मुलांना प्रदूषण करणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली आहे. तुम्हीही करू नका प्रदूषण...,'' मी ठामपणे म्हणालो. शेवटी मुख्यमंत्री मीच आहे ना?
""ते ठीक आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आम्हाला कर्जमाफीचे फटाके तरी उडवू द्यात, असं ते म्हणातायत...मग काय करायचं?'' चंदुदादांनी चष्मा पुसत सवाल टाकला.
""चेक पेमेंट करा. अकाउंटमध्ये दिवाळीनंतर पडतील सावकाश. फटाके आणायला पैसे येतील कुठून?'' मी आयडिया सांगितली. ते "ग्रेट' असे म्हणून निघून गेले. मंत्रिमंडळ विस्तारात ह्या गृहस्थाला प्रमोशन द्यावे लागणार आहे. पण आता ह्यांना प्रमोशन म्हणजे आमची गच्छंती!! काय करावे, हा प्रश्‍नच आहे.

परमश्रद्धेय नमोजी आणि आदिदेव अमितजी ह्यांचा रिप्लाय आल्यानंतर मला हुरूप आला. लागलीच आमचे बांदऱ्याचे परममित्र उधोजीसाहेबांना फोन लावला. ते बहुधा त्यांच्या नव्या बंगल्याच्या बांधकामाच्या साइटवर होते. ओरडून बोलत होते. त्यांना "हॅप्पी दिवाळी' केले.
""परवाच तर बोललो एस्टी संपाच्या वेळी? तेव्हा दिल्या होत्या की शुभेच्छा!'' ते बुचकळ्यात पडून (ओरडून) म्हणाले.
""पुन्हा दिल्या, कुठे बिघडलं! पण जरा तुमच्या विस्ताराबद्दल चर्चा करायची होती. तुम्ही आहात ना?'' मी विषय काढला.
""हो, हो, म्हंजे काय! व्हेरी मच आहे...आमचाही वाढीव एफेसाय मंजूर करून टाका म्हंजे मिळवली!'' ते ओरडून म्हणाले.
...मी विस्ताराबद्दल बोलत होतो, ते बंगल्याबद्दल! कुणाचे काय, तर कुणाचे काय! मी फोन ठेवूनच दिला.

Web Title: dhing tang by british nandy