
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे. कदाचित म्हणण्याचे कारण असे की आपल्याला अजूनही मानवेतर प्राण्यांबद्दल तशी फार कमी माहिती आहे.
तो माणूस आहे म्हणूनी...
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे. कदाचित म्हणण्याचे कारण असे की आपल्याला अजूनही मानवेतर प्राण्यांबद्दल तशी फार कमी माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे आज तरी प्राणी नैतिकतेचा विचार करू शकतात असे वाटत नाही. प्राण्यांना बुद्धी असली, तरी ती जास्त करून जीवन संघर्षात तगून राहण्याच्या कामी येईल एवढी असते. प्राण्यांची ‘भाषा’ किंवा संवाद पद्धती माणसाएवढी सक्षम आणि विकसित नसते. प्राणी काही प्रमाणात आपल्या प्रजातींच्या सभासदांशी तसेच एक अर्थी इतर प्रजातींच्या जीवांशीही संवाद साधतात हे खरे असले तरी त्या संवादाच्या भाषेत अमूर्त संकल्पना, तत्त्वे, मूल्ये यांचा वेध घेण्याची क्षमता नसते.
विचारांचे आदान-प्रदान करणे, जतन करणे, संप्रेक्षण करणे शक्य नसते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राण्यांचे वर्तन निसर्गतः त्यांना लाभलेल्या मूलभूत प्रेरणांद्वारे नियंत्रित होत असते. माणसांच्या वर्तनावर मूलभूत प्रेरणांप्रमाणेच त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाचा परिणाम होत असतो. त्याच्या विचारशक्तीमुळे त्याला कृती करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. यामुळे काय करावे आणि काय करू नये याची निवड त्याला सतत करावी लागते. ही निवड करणे सोपे नसते. कधी कधी आपल्या इच्छा परस्पर विसंगत असतात. त्याहीपेक्षा कठीण पेच असतो तो वेगवेगळ्या नैतिक मूल्यांमध्ये कधी-कधी जो संघर्ष होतो, त्यातून मार्ग काढण्याचा. जर खोटे बोलून एखाद्याचा जीव वाचवता येत असेल, तर सत्य आणि अहिंसा या दोन मूल्यांमधले कुठले निवडायचे आणि कशाच्या आधारावर?
माणसाची सामाजिकताही वैशिष्ट्यपूर्ण असते. प्राण्यांच्या सामाजिकतेचे काही स्तर मानले गेले आहेत. काही प्रकारचे जीव फक्त जोडीदाराशी मिलन आणि पुनरुत्पादन यासाठी एकत्र येतात. काही प्राणी अंड्याचे, पिल्लाचे संगोपन करण्यापुरते एकत्र येतात. माणसाची सामाजिकता एवढी मर्यादित नसली तरी तो मुंग्या किंवा मधमाशांसारखा अतिसामाजिक प्राणीही नाही. मुंग्या किंवा मधमाशांचे वर्तन त्यांच्या जैविक जडण घडणीनुसार ठराविक पद्धतीनेच होते. त्यांच्या सामाजिक संरचनेत कामांची विभागणी अतिशय काटेकोरपणे केलेली असते. राणी मुंगी किंवा राणी माशी या फक्त प्रजननाचे काम करतात. इतर कामे बाकी सभासदांमध्ये वाटलेली असतात. आपण करतो आहोत ते बरोबर आहे का, ते चांगले आहे की वाईट याचा विचार करण्याची आवश्यकताच यांपैकी कुणालाही नसते.
साहजिकच ते नैतिक पेचात सापडण्याची शक्यता नसते. माणसाची गोष्ट मात्र वेगळी असते. त्याने निर्माण केलेल्या समाजाची वीण कायम एकसारखी नसते. माणसाची जसजशी प्रगती होत जाईल, त्याच्या क्षमतांचा जसजसा विकास होत जाईल, तसा-तसा सामाजिक रचनेत बदल होत जातो. केवळ जैविक गरजांच्या खूप पलीकडच्या ज्या गरजा माणसांमध्ये निर्माण झालेल्या असतात, त्या पूर्ण करण्याचे नवनवे मार्ग तो शोधून काढतो. त्यासाठी जुन्या रचना बदलाव्या, मोडाव्या लागतात. नव्या युगाच्या नव्या आशा-आकांक्षांची पूर्ति करण्यासाठी जुने नियम मोडून नवे नियम तयार करावे लागतात. जुन्या मूल्यांना नवीन आशय द्यावा लागतो, कधी नवी मूल्ये स्वीकारावी लागतात. आपल्या नैसर्गिक आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात बदल निरंतर घडत असतो. त्यानुसार जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात चुकाही होतात. या चुका सुधारण्यासाठी नव्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया असते. ज्या गुणांमुळे माणूस स्वत:ला श्रेष्ठ समजतो, त्यांमुळेच त्याला वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरच्या नैतिक पेचांना तोंड द्यावे लागते हे लक्षणीयच
Web Title: Dipti Gangavane Write Man Is A Big Characteristic Animal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..