सजग कर्तेपणासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipti Gangavane writes about human For the vigilant doer

माणसाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रुपांमधले अतिशय मध्यवर्ती रूप ‘कर्ता’ हे आहे. कर्ता असणे म्हणजे जाणीवपूर्वक, स्वेच्छेने कृती करण्याची क्षमता असणे.

सजग कर्तेपणासाठी

माणसाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रुपांमधले अतिशय मध्यवर्ती रूप ‘कर्ता’ हे आहे. कर्ता असणे म्हणजे जाणीवपूर्वक, स्वेच्छेने कृती करण्याची क्षमता असणे. कृती करताना त्या निव्वळ यांत्रिकपणे किंवा आपल्या वासना, प्रेरणा यांच्या पूर्णपणे आहारी न जाता विचारपूर्वक करणे माणसाला शक्य असते. आपण कुठल्याही परिस्थितीत काय करू शकतो, यासंबंधीच्या निरनिराळ्या पर्यायांमधून निवड करताना व्यक्ती वेगवेगळे निकष वापरतात. त्यात स्वत:च्या फायद्याचा विचार असतो, कुठली कृती यशस्वी होईल याबद्दलचा आडाखा असतो, तसेच समाज मान्यतेचाही विचार असतो. वरकरणी हे साधे-सोपे वाटले तरी यातला प्रत्येक निकष तसा गुंतागुंतीचा असतो.

उदाहरणार्थ, आपला फायदा आपल्याला सुख मिळेल ते करण्यात आहे की आपल्या हिताचे आहे ते करण्याने होईल, याचाही विचार हवा. अनेक वेळा जे सुखकारक असते, ते हितकारक असतेच असे नाही. तात्कालिक सुख देणाऱ्या कृती कित्येक वेळा नंतर दुःखदायक ठरतात. समाजात कुठल्या कृती निंदनीय समजल्या जातात, कुठल्या स्पृहणीय मानल्या जातात हे लक्षात घेतानाच सदसद्विवेकबुद्धीला त्या पटतात की नाही, याकडेही लक्ष द्यावे लागते. आपल्याला जे करावेसे वाटते, त्याची नैतिकता तपासावी लागते. तसे पाहता तुरळक अपवाद वगळता नैतिकतेची आवश्यकता सगळ्यांनाच पटते. अगदी स्वत: अनैतिक वागणाऱ्यांनाही इतरांनी नैतिकतेचे पालन करावे असे वाटत असते. वाहतुकीचे नियम बिनदिक्कतपणे मोडणाऱ्यांनाही बाकीच्यांनी ते पाळावेत असे वाटते, त्याप्रमाणेच! लहानपणापासून कुटुंब, शाळा, महाविद्यालये, इतर सामाजिक संस्था व्यक्तीच्या मनावर नैतिक संस्कार करण्याचे प्रयत्न करतात. धर्म, संस्कृती, कायदा इत्यादि यासंबंधीचे मार्गदर्शन करतात. तरीही सगळे नैतिक आचरणच करतात, असे चित्र काही दिसत नाही. याला अनेक कारणे आहेत. आपण बुद्धिशील, विचारशील असलो, तरी मुळात प्राणी आहोत. स्वत:च्या आणि स्वतःच्या जीवजातीच्या हिताला प्राधान्य देण्याची प्राण्यांची वृत्ती आपल्यामधे जन्मजात असते.

प्राण्यांपासून उत्क्रांत होताना आपली जैविक जडण-घडण विशिष्ट प्रकारे झाली आहे. माणूस म्हणून आजवर जगतानाच्या लाखो वर्षांच्या इतिहासानेही काही अमिट खुणा आपल्या जैविक स्वरुपावर उमटवलेल्या आहेत. हे निसर्गक्रमात लाभलेले आपले स्वरूप आपण मुळापासून बदलू शकत नाही. तरीही, त्याच स्वरुपात आपले विचार, वर्तन काही प्रमाणात नियंत्रित करण्याच्या, त्याची दिशा बदलण्याच्या शक्यताही अंतर्भूत आहेत. त्यामुळेच या संस्कारांचा, शिकवणुकीचा परिणाम आपल्या मनावर होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली चिकित्सक दृष्टी स्वतःकडे वळवून स्वतःच्याच आचार- विचारांकडे आपण बऱ्याच प्रमाणात तटस्थपणे बघू शकतो. आपण कसे जगावे, कशासाठी जगावे, याचा विचार करू शकतो. चांगले जीवन म्हणजे नक्की काय हे ठरवू शकतो. जी मूल्ये, तत्त्वे आपल्याला शिकवली जातात, त्यांचे मूल्यमापन आपण करू शकतो. हे मूल्यमापन कसे करावे, त्यासाठी कुठले निकष वापरावे, याची चर्चा तत्त्वज्ञानाच्या नीतिमीमांसा या शाखेत होते. पाश्चात्य नीतिमीमांसेत काय करावे, काय करू नये, कसे वागावे, कसे वागू नये यासंबंधीचा उपदेश केला जात नाही. कुठलेही आदेश दिले जात नाहीत. तर आपण नैतिक निर्णय घेताना कुठले घटक विचारात घेतले पाहिजेत, कुठले निकष उपयोगात आणले पाहिजेत, याचा साधक-बाधक विचार त्यामध्ये केला जातो.

नीति-नियमांची, मूल्यांची चिकित्सा त्यात केली जाते. त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या उपपत्ति मांडल्या जातात. समाजात प्रचलित नीति विचारांच्या आधारावर, पण त्यात अडकून न राहता स्वतंत्रपणे आपले नीतिसंबंधी निर्णय कसे घ्यावेत याचे मार्गदर्शन नीतिमीमांसेतून आपल्याला मिळू शकते. आपल्याला लाभलेले ‘कर्तेपण’ डोळसपणे, सजगपणे निभावणे त्यामुळे शक्य होते. स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेणे आणि तो अमलात आणणे म्हणजे कर्तेपण असते. कुठल्याही नियमांचे आंधळेपणे, गतानुगतिक पद्धतीने पालन करणे हे खरे कर्तेपण नाही. माणसांमधे नीतिविषयक विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता असते. तिचे पोषण करावे लागते. त्यासाठी नीतिमीमांसेचा परिचय करून घ्यायला हवा.

Web Title: Dipti Gangavane Writes About Human For The Vigilant Doer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top