‘सद्‌गुण म्हणजे ज्ञान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goodness is knowledge

एखादी व्यक्ती नीतिमान आहे किंवा नाही हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो? अर्थातच ज्या प्रकारचे आयुष्य त्या व्यक्तीने व्यतीत केले आहे त्याच्या नैतिक गुणवत्तेवर आपला निष्कर्ष अवलंबून असतो.

‘सद्‌गुण म्हणजे ज्ञान’

एखादी व्यक्ती नीतिमान आहे किंवा नाही हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो? अर्थातच ज्या प्रकारचे आयुष्य त्या व्यक्तीने व्यतीत केले आहे त्याच्या नैतिक गुणवत्तेवर आपला निष्कर्ष अवलंबून असतो. आणि ही नैतिक गुणवत्ता कशी ठरवली जाते? तर ज्या प्रकारचे निर्णय व्यक्तीने जीवनात घेतले आहेत, ज्या प्रकारच्या उक्ती, कृती केलेल्या आहेत, त्या नैतिक आहेत किंवा नाही यावर तिच्या एकूण जीवनाची नैतिक योग्यता मापली जाते. थोडक्यात, व्यक्तीचे चारित्र्य, जगलेले जीवन आणि बोलणे-वागणे यांचे नैतिक मूल्य एकमेकांत गुंतलेले असते. सुस्पष्ट आणि काटेकोर अर्थाने शब्द वापरण्याच्या तत्त्वज्ञानाच्या परंपरेनुसार, इथे हे लक्षात घेऊया की चारित्र्य आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. माणसाचे दिसणे, चारचौघातले उठणे-बसणे, संवाद कौशल्य, आत्मविश्वास इत्यादी गोष्टींनी व्यक्तिमत्व तयार होते. व्यक्ती कुठली मूल्ये मानते, ती प्रत्यक्षात आचरणात आणते की नाही, तिचे इतरांशी संबंध कशा तऱ्हेचे आहेत, वर्तन कसे आहे यावर व्यक्तीचे चारित्र्य ठरते. व्यक्तिमत्व आकर्षक किंवा अनाकर्षक असते, तर चारित्र्य आदरणीय, वंदनीय असते किंवा नसते. नैतिकतेचा संदर्भ चारित्र्याशी असतो, व्यक्तिमत्वाशी नाही.

नीतिमीमांसेत मुख्यत: तीन प्रकारचे सिद्धांत असतात. त्यातील दोन सिद्धांत व्यक्तीच्या कृतीचे मूल्यमापन करण्याचे निकष सांगतात. कृतीच्या नैतिकतेचा विचार दोन बाजूंनी करता येतो. एक म्हणजे कृती करण्यामागच्या प्रेरणा, हेतु, उद्दिष्टे आणि दुसरी म्हणजे कृतीचे प्रत्यक्ष होणारे परिणाम. तिसरा सिद्धांत व्यक्तीच्या चारित्र्याला मध्यवर्ती ठेवून नीतिची चर्चा करतो. आपण आधी या तिसऱ्या सिद्धांताची ओळख करून घेणार आहोत, कारण ऐतिहासिकदृष्ट्या हा सिद्धांत ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आरंभीच्या काळातच मांडला गेला आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीतील नीतिविचारात ‘सद्गुण’ या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान होते. यासाठी ग्रीक भाषेत ‘arete’ हा शब्द उपयोगात आणला जाई. इंग्लिशमध्ये याचे भाषांतर ‘virtue’ असे केले जाते. व्यक्तीला हितकारक ठरणारे चारित्र्यामधील उत्कृष्ट गुणधर्म असा याचा अर्थ होतो. अंगभूत नैतिक सद्गुणांमुळे व्यक्ती नैतिकदृष्ट्या योग्य वागते असे मानले जाई. म्हणून चारित्र्य नीतिसंपन्न असण्यावर भर दिला जात असे. संयम, धाडस, शहाणपणा, न्याय यांना अत्यंत महत्त्वाचे सद्गुण मानले जात असत. सॉक्रेटीस यांच्यापासून सद्गुणाधारीत नीतिची पद्धतशीर मांडणी व्हायला सुरवात झाली. सॉक्रेटीस यांनी ‘सद्गुण म्हणजे ज्ञान’ असे ठाम प्रतिपादन केले. सद्गुण म्हणजे ‘चांगले’ गुण. पण जोपर्यंत ‘चांगले’/‘चांगुलपणा’ म्हणजे नक्की काय याचे निश्चित ज्ञान होत नाही, तोपर्यंत ‘चांगले’ गुण म्हणजे काय हे कसे कळणार? म्हणूनच सद्वर्तनी, चारित्र्यसंपन्न असण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. सद्गुण शिकवून अंगी बाणवता येत नाहीत असे जे मत त्या काळात प्रचलित होते, त्याचा प्रतिवाद सॉक्रेटीस यांनी केला.

सद्गुण हे जर ज्ञान असेल, तर ज्याप्रमाणे इतर कुठलेही ज्ञान शिक्षणातून मिळवता येते, त्याचप्रमाणे सद्गुणांचेही ज्ञान देता येते, असे मत त्यांनी मांडले. आताप्रमाणेच तेव्हाही असे मत प्रचलित होते की लोकांना काय चांगले, काय वाईट याचे ज्ञान असते, तरीही मोहात पडून ते गैरवर्तन करतात, अनैतिक वागतात. पण चांगुलपणाचे खरेखुरे ज्ञान ज्याला होते, तो कधीच ‘वाईट’ म्हणजे नैतिकदृष्ट्या अयोग्य किंवा चुकीचे वागणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. मोहात पडणे हे अज्ञानाचे लक्षण असते. मोह असतो तो क्षणिक सुखाचा. पण त्यामध्ये हित नाही हे कळत नसल्यामुळे चुकीचे वर्तन केले जाते. अनैतिक वागण्याने अंतरात्म्याला यातना होतात हे ज्याला पूर्ण कळते, तो तसे वागूच शकणार नाही असा त्यांना दृढ विश्वास होता. ‘कुणीही इच्छापूर्वक वाईट वागत नाही,’ हे त्यांचे या संदर्भातले वचन सुप्रसिद्ध आहे. आपल्याला वधस्तंभावर चढवले जात असताना आपल्या मारेकऱ्यांसाठी ‘हे ईश्वरा त्यांना क्षमा कर, ते काय करत आहेत ते त्यांना समजत नाही,’ अशी मागणी करणाऱ्या येशू ख्रिस्ताची इथे स्वाभाविकपणे आठवण होते.

Web Title: Dipti Gangavane Writes Goodness Is Knowledge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top