
भारतीय जनमानसावर कर्म सिद्धांताचा मोठाच पगडा आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर; आपण जे काही स्वेच्छेने करतो, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, असे हा सिद्धांत सांगतो.
भारतीय जनमानसावर कर्म सिद्धांताचा मोठाच पगडा आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर; आपण जे काही स्वेच्छेने करतो, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, असे हा सिद्धांत सांगतो. चांगल्या कर्माचे फळ चांगले तर वाईट कर्माचे फळ वाईट असते. एवढेच नव्हे तर केलेल्या कृतीच्या भल्या-बुऱ्या परिणामांपासून कुणाचीच सुटका नसते, असेही सांगितले जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही घडते, ती आपल्याच कर्माची फळे असतात अशी लोकांची धारणा असते. म्हणूनच “भोगा आपल्या कर्माची फळे” किंवा “कर्म माझं” असे उद्गार सहजी काढले जातात. पण अनेक वेळा असे होताना दिसते की आपण जे काही करतो तेही आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्या हातून होते किंवा आपल्याला करावे लागते असा कर्म सिद्धांताचा अर्थ लावला जातो. पण असा अर्थ लावणे म्हणजे आपण जाणीवपूर्वक, स्वतंत्र बुद्धीने आपल्या कृतीची निवड करतो हे नाकारणे आहे. कारण आपण आत्ता जे करतो, ते भूतकाळातील आपल्या कृतींचा अटळ परिणाम आहे असे समजणे हा तर इच्छा स्वातंत्र्य नाकारणारा नियतवाद आहे. आपल्याला ते खरेच नाकारायचे असते का? की खरे पाहता आपण आपल्या कृत्यांच्या परिणामांची जबाबदारी नाकारत/टाळत असतो? जाणता-अजाणता असेच होत असते. कारण त्याच वेळी इतरांना आपण त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरतच असतो.
महत्त्वाचा प्रश्न हा आहे की असा नियतवाद, कर्म सिद्धांत मांडणाऱ्यांना अभिप्रेत आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. या संदर्भात लक्षात घेण्याचा पहिला मुद्दा म्हणजे कर्म सिद्धांतानुसार आपल्या वाट्याला येणारी सुख-दुःखे आपल्या पूर्वकर्माची फळे असतात. त्यांना आपणच जबाबदार असतो. कर्माचे फळ आपल्याला चुकत नाही, त्यापासून सुटका नसते. तसेच जे आपण केलेलेच नाही त्या कर्माची फळे आपल्या वाट्याला येत नाहीत. थोडक्यात म्हणजे, अटळ असते ते पूर्वकर्माचे फळ. आत्ता जे कर्म आपण करत असतो, ते नव्हे. आपण जे काही करतो त्याची जबाबदारी आपलीच असते. कारण आपण ते स्वेच्छेने करतो, हे कर्म सिद्धांतामध्ये गृहीत धरलेले आहे. त्याशिवाय त्याला अर्थच उरणार नाही. कर्मांचे निरनिराळ्या प्रकारे वर्गीकरण केले गेले आहे. त्यातील एक वर्गीकरणानुसार संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण असे कर्माचे तीन
प्रकार सांगितले जातात. कर्माची फळे आपल्याला लगेचच भोगावी लागतात असे नसते. त्यांना कमी-अधिक कालावधी लागू शकतो. जी कर्मे भूतकाळात केलेली आहेत, पण त्यांची फळे अजून भोगलेली नाहीत त्यांना ‘संचित कर्मे’ म्हटले जाते. ती फळे जणू अजून पक्व झालेली नसतात, पिकलेली नसतात पण आपल्या नावाने साठवून ठेवलेली असतात. भविष्यात ती पक्व झाल्यावर आपल्याला घ्यावीच लागतात. ‘प्रारब्ध’ म्हणजे ती कर्मे ज्यांची फळे आता पिकलेली असल्यामुळे आपल्या वाट्याला अटळपणे आलेली असतात. तर जी कर्मे आपण आत्ता, वर्तमानात करत असतो, त्यांना ‘क्रियमाण’ म्हणतात. या कर्मांची फळे अजून निश्चित झालेली नसतात, कारण कर्म पूर्ण झालेले नसते, ते केले जात असते. हे कर्म काय असावे, चांगले असावे की वाईट हे ठरवायला आपण स्वतंत्र असतो. म्हणूनच या कर्मांची जबाबदारी आपली असते आणि म्हणूनच त्याची फळे आपल्याला भोगावीच लागतात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्म सिद्धांताचा विचार भारतीय संस्कृतीच्या व्यापक संदर्भात करावा लागतो. हा सिद्धांत खरे तर कुठलेही नैतिक तत्त्व किंवा नीतिमत्तेचे निकष सांगत नाही. चांगल्या कर्माची फळे चांगली आणि वाईट कर्मांची फळे वाईट असतात या म्हणण्यात कर्म ‘चांगले’ आहे की ‘वाईट’ हे कशाच्या आधारे ठरवायचे हे सांगितलेले नाही. तरीही भारतीय नीतिविचारात कर्म सिद्धांताचे स्थान मध्यवर्ती आहे. त्याच्या खेरीज तो विचार अपुरा ठरतो. मनुष्यासाठी कुठल्या प्रकारचे जीवन योग्य किंवा चांगले असते याच्याबद्दलच्या भारतीय आकलनाशी कर्म सिद्धांत जोडला गेलेला आहे. हे नाते समजून घ्यायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.