भाष्य : अम्हांस आम्ही पुन्हा पहावे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाष्य : अम्हांस आम्ही पुन्हा पहावे...
भाष्य : अम्हांस आम्ही पुन्हा पहावे...

भाष्य : अम्हांस आम्ही पुन्हा पहावे...

मानवजातीपुढे अनेक समस्या, पेच आहेत. त्यांना सामोरे जाताना ‘तत्त्वज्ञान’ महत्त्वाचे ठरते. कोविडसारखे संकट येते, तेव्हा प्रामुख्याने चर्चा होते ती विज्ञानाची. पण अशा आव्हानांना सामोरे जाताना तत्त्वज्ञानाचा विचार होणेही तेवढेच आवश्यक आहे. उद्याच्या ‘जागतिक तत्त्वज्ञान दिना’च्या निमित्ताने याविषयी मंथन व्हावे.

संयुक्त राष्ट्रे आणि युनेस्कोसारख्या संलग्न संस्था दर वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी ‘जागतिक तत्त्वज्ञान दिवस’ साजरा करतात. जगभरातील विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी शैक्षणिक संस्था व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा यांचे आयोजन करून या दिवशी तत्त्वज्ञानाचे महत्त्व, त्याची सद्यकालीन प्रस्तुतता याविषयी जाणीव जागृतीचे काम करतात. भारतीय तसेच पाश्चात्य परंपरेत एके काळी गौरवास्पद स्थान असणाऱ्या या ज्ञानप्रकाराबद्दलचे आजच्या समाजातील अज्ञान, अनास्था आणि गैरसमज हे अस्वस्थ करणारे वर्तमान आहे. असे असतानाही, युनेस्कोसारक्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेला तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनाची, अभ्यासाची आज गरज आहे असे वाटते ते का हे या निमित्ताने समजून घेणे उचित ठरेल.

जग चक्रावून टाकणाऱ्या संक्रमणावस्थेतून जाते आहे. कोरोना महासाथीने आपल्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो आहे. नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थिती अशी आहे की अनिश्चितता जीवनाचा स्थायीभाव झाली आहे. शतकानुशतके अनुभवलेले निसर्गचक्र डळमळू लागले आहे. तापमानवाढीमुळे होणारे परिणाम फक्त चर्चेत चघळण्याचे विषय न राहता प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेत. तंत्रज्ञानाच्या करामतींमुळे आभासी जगात स्थल-काळाचे अंतर मिटल्यासारखे वाटत असले तरी खऱ्याखुऱ्या जगात मात्र आपपरभाव तीव्र होऊन व्यक्तिसमूह एकमेकांपासून दुरावत आहेत. खऱ्या-खोट्या अस्मितांचे संघर्ष उग्र रूप धारण करत आहेत. विज्ञानाच्या अचाट प्रगतीनंतरही माणसाचे भौतिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या मार्गातले अडथळे संपत नाहीत. ज्या माध्यम क्रांतीमुळे व्यक्तीला स्वातंत्र्याची क्षितिजे खूप विस्तारल्यासारखी वाटली, त्याच माध्यमांनी माणसाच्या स्वातंत्र्यावर तंत्रज्ञानाचे चौक्या-पहारे बसवले आहेत. थोडक्यात म्हणजे, सध्याचा काळ हा अभूतपूर्व समस्यांनी घेरलेला आहे. या सगळ्या समस्यांचे आकलन होण्यासाठी आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी तात्त्विक विचारदृष्टी आवश्यक आहे.

माणूस प्राणीच असला तरी तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची प्रगत जाणीव. आपल्या गरजांची जाणीव आणि त्या भागवण्याचे प्राथमिक ज्ञान सर्वच जीवांना असते. पण माणसाला आपल्याला जाणीव आहे, याचीही जाणीव असते. आपल्या मूलभूत गरजांकडे तटस्थपणे बघू शकणे, या गरजांपलिकडे जाणे, हे सगळे या जाणि‍वेच्या जाणि‍वेमुळे शक्य होते. ही ‘जाणि‍वेची जाणीव’ हे मानवाने निर्मिलेल्या सांस्कृतिक विश्वाचे अधिष्ठान आहे आणि तिचा अधिकाधिक विकास करण्याचे, तिला परिपक्वतेकडे नेण्याचे अत्यंत मोलाचे कार्य तत्त्वज्ञानाने पूर्वीपासूनच केलेले आहे. माणसाचे निसर्गाशी, समाजाशी आणि स्वतःशी असलेले नाते हा तत्त्वज्ञानाचा एक मुख्य अभ्यास-विषय आहे. या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असे आहे की एक बाजूने ‘माणूस असणे म्हणजे नक्की काय’ याचे काही एक आकलन त्याच्या मुळाशी असते आणि या अभ्यासातून माणूसपणाचे आपले ज्ञान परिष्कृत होते.

ज्ञान म्हणजे नेमके काय?

ही नाती नक्की कशी आहेत, ती कशी असावीत याबद्दलच्या संभ्रमात कळत-नकळत आज आपण गुरफटले गेलो आहोत. खरे तर माणसाची जैविक आणि सामाजिक पातळीवरची जडणघडण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत कशी झाली आहे, हे आज विज्ञानाने बऱ्याच प्रमाणात स्पष्ट केले आहे. तरीही काही जुने प्रश्न अनुत्तरित आहेत आणि काही नव्याने निर्माण झाले आहेत. माणसाने नेहमीच स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा नुसते वेगळेच नाही तर श्रेष्ठ मानले आहे. त्याच श्रेष्ठत्व गंड बाळगणाऱ्या माणसाला एका अतिसूक्ष्म विषाणूने जेरीला आणले आहे. दुसऱ्या बाजूने, तंत्रज्ञानाच्या आधारे ज्या यंत्रांची निर्मिती करून त्यांच्यावर हुकूमत गाजवली, त्याच यंत्रांनी ‘आज माणूस स्वतःच एक यंत्र आहे का?’ ‘भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी यंत्रे मानवावर मात करतील का?’ अशा अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांना जन्म दिला आहे.

माणसाच्या स्वरूपासंबंधीचे वैज्ञानिक ज्ञान सूक्ष्मतम पातळीवर पोचू पाहत असतानाच, आजचा माणूस ‘आपण नक्की कोण आहोत?’ या पेचात नव्याने अडकला आहे. साहजिकच वर उल्लेखिलेल्या नात्यांबद्दलची, माणूसपणाची आपली जाण पुन्हा एकदा तपासून बघायला लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तत्त्वज्ञानाकडे वळावे लागणार आहे. तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी या विद्याशाखेचे उद्दिष्ट ज्ञानाची, सत्याची प्राप्ती करून घेणे हे असते. फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ ‘शहाणपणाचे प्रेम’ असा आहे. ‘शहाणपण’ म्हणजे निव्वळ ज्ञान किंवा बुद्धिमत्ता नाही. शहाणपण ज्ञानावर आधारित, नैतिकतेचे भान बाळगणाऱ्या कृतीकडे नेणारे असते. मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण जाणिवेची जोपासना केल्याखेरीज असे शहाणपण मिळवता येत नाही. ते मिळवण्यासाठी तत्त्वज्ञानाने मुख्यतः अस्तित्वविषयक, ज्ञानविषयक, आणि नीतिविषयक मूलभूत प्रश्न आरंभापासूनच उपस्थित केले आहेत.

आज विश्वात काय काय आहे आणि जे आहे त्याचे स्वरूप काय आहे या संबंधीचे ज्ञान विज्ञानाच्या अभ्यासाने मिळते. आपले निर्णय, कृती, व्यवहार हे सगळे अशा ज्ञानावर आधारित असतात, निदान असावेत. तरच आपण भविष्याबद्दल काही आशा बाळगू शकतो. परंतु, त्यासाठी आधी ज्ञान नक्की कशाला म्हणावे हे माहिती असावे लागते. माहितीच्या महापुरात श्वास गुदमरून जाण्याच्या या काळात ज्ञान कशाला म्हणावे आणि विदा, माहिती, समजुती, विश्वास इत्यादींना ज्ञानाचा दर्जा का देता येत नाही, हे समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे. वस्तुस्थितीचा भक्कम आधार असलेल्या, तर्कशुद्ध युक्तिवादांपेक्षा अतार्किक पण भावनांना हात घालणाऱ्या भाषेला भुलणारा, समाज माध्यमांचा अतोनात प्रभाव असणारा हा ‘सत्योत्तरी’ काळ आहे. अशा काळात तर्काधिष्ठित, अनुभवावर आधारित, वस्तुनिष्ठ सत्याचा आग्रह धरणाऱ्या; ‘ज्ञान’ ‘सत्य’ अशा संकल्पनांचे मूलग्राही विश्लेषण करणाऱ्या तत्त्वज्ञानासारख्या विषयाचे महत्त्व असाधारण आहे.

सध्याच्या काळातले अनेक प्रश्न हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नैतिकतेशी संबंधित आहेत. आजच्या जगातले पर्यावरणसंबंधी प्रश्न असोत, विषमता, अन्याय, शोषण असे सामाजिक प्रश्न असोत किंवा व्यक्तिसमूह आणि राज्यसंस्था यांमधले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणारे संघर्ष असे राजकीय प्रश्न असोत; या सगळ्यांचे एक महत्त्वाचे कारण नैतिकतेची वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात झालेली पिछेहाट हे आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नैतिक नियमांची जंत्री देण्यात तत्त्वज्ञानाला रस नसतो. पण नैतिक मूल्यांची सांगोपांग चर्चा करून कृतींच्या नैतिक मूल्यमापनासाठी योग्य निकष सुचवणे, नीतिसंबंधी विवेकी विचार करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हे तत्त्वज्ञानाचेच कार्य असते आणि त्याचीच आज नितांत गरज आहे. मान्यताप्राप्त संकल्पना, विचार आणि व्यवहार यासंबंधी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून चिकित्सक विचारांच्या प्रकाशात जगण्याच्या नव्या, श्रेयस्कर वाटा शोधणे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने शक्य होते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच सध्याच्या कठीण काळात तत्त्वज्ञानाकडे वळण्याची गरज आहे असे युनेस्कोचे मत आहे. तत्त्वज्ञान दिनाच्या निमित्ताने याचा गंभीरपणे विचार व्हावा.

(लेखिका तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक आहेत.)

loading image
go to top