महाराष्ट्र माझा : जिल्हा विरुद्ध जिल्हा संघर्ष

दयानंद माने 
शुक्रवार, 17 मे 2019

नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत.

नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश मराठवाडा वसलेला आहे. या डोंगररांगानी तयार झालेल्या पठारावरून या नद्या वाहतात. त्या बारमाही नसल्याने पाणीसाठ्याच्या बाबतीत मर्यादा येत आहेत. या नद्यांवर बांधलेल्या धरणांच्या पाण्यावर व स्थानिक प्रकल्पांवर इथले समाजजीवन अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस हा इथला वीक पॉइंट आहे व तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

एकूणच पाऊस व जंगलांचे प्रमाण कमी असल्याने प्रतिकूल अशी भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या मराठवाड्याला सातत्याने शेजारच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नद्यांवरील पाण्यावर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारदरबारी विशेष प्रयत्न करू, अशा आणाभाका प्रत्येक वेळा सत्तेवर आलेली सरकारे करत असली तरी, कुणालाच त्यावर मात करता आली नाही. विकासाचा व सिंचनाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 
यंदाच्या कडक उन्हाळ्यात मराठवाड्यात भीषण अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. औरंगाबाद या प्रमुख शहरासह प्रत्येक जिल्हा ठिकाण, तालुका ठिकाणांपासून सर्व गाववस्त्या पिण्याच्या पाण्याने व्याकूळ झालेल्या आहेत. परभणीसारख्या शहराला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडू नये, यासाठी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍यात आंदोलन सुरू झाले आहे. खरे पाहता हा प्रकल्प जालन्यातील परतूर व परभणीतील सेलू या तालुक्‍यांच्या सीमेवर वसलेला आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील लोकांचा या धरणातील पाण्यावर हक्क आहे. या धरणांच्या कालव्याची कामे पूर्ण झाली नसल्याने परभणी जिल्ह्याला सिंचनाचा फायदा होत नाही. मात्र, पिण्यासाठी या धरणाचे पाणी वापरता येते. सध्या दोन्ही जिल्ह्यांत पाणीटंचाई सुरू असताना सामंजस्य ठेवून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. मात्र, काही राजकीय लोकांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी पाणी प्रश्न पेटविला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर कालव्यात वरून पाणी न सोडल्याने वैजापूर, गंगापूर तालुक्‍यात टंचाईची स्थिती आहे. सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा तलावात चर खोदून पाणी खेचले जात आहे. तालुक्‍यातील चारनेर प्रकल्पातील पाण्यावरून चारनेर व इतर तीन गावांत संघर्ष उद्‌भवला आहे. उस्मानाबाद शहरालाही दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणारे आजूबाजूचे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. उजनी धरणावर आशा असताना तेथूनही पाणीपुरवठा कमी झाला आहे. तसेच या पाइपलाइनवरून पाणीचोरीच्या घटना वाढल्या आहेत. परवाच पांगरी पोलिस ठाण्यात उस्मानाबाद नगरपालिकेने पाणीचोरीची तक्रार नोंदविली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा झालेल्या लातूर शहराला यंदा मांजरातून दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईबाबत यंदा लातूर शहर व जिल्ह्याची सुदैवाने बरी परिस्थिती आहे. तरीही साठ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

बीड जिल्ह्यात आष्टी व शिरूर कासार तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीही कसल्याही प्रकारचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या तालुक्‍यांत शेजारच्या नगर जिल्ह्यातून पाणी आणण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातही केवळ तीन टक्के पाणीसाठा उरला आहे. या शहराला विष्णुपुरीबरोबरच इसापूर प्रकल्पाच्या पाण्याचा आधार असतो. यंदा शाश्वत पाणी असणाऱ्या नांदेडकरांनाही पहिल्यांदाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिंगोली व वसमत शहराला सिद्धेश्वरच्या मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. हा जिल्हाही पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दुष्काळाला सामोरा जात आहे.

मराठवाड्यातील अनेक गावांना या दुष्काळाने ग्रासले असून, त्यांना पोटापाण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे. मुखेड (जि. नांदेड) येथील हाडोळा या गावातील अनेक ग्रामस्थांनी नुकतेच स्थलांतर केले आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसह, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा आदी प्रमुख प्रकल्प व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्‌भवलेली आहे. पावसाला आणखी महिनाभराचा अवधी शिल्लक असताना मराठवाड्यातील पाणी टंचाईची स्थिती चिंताजनक बनणार आहे. 

या पाणीबाणीमुळे गावागावांत, जिल्ह्याजिल्ह्यांत संघर्षाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. परभणी शहराच्या पाण्यावरून जालना- परभणी असा उभा राहिलेला संघर्ष मराठवाड्यातील आपापसांतील सौहार्द संपवून टाकणारा आहे. मराठवाड्यालगत नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात परवाच एका नागरिकाने आपल्या टाकीतील पाणी चोरल्याची तक्रार चक्क पोलिस ठाण्यात केली आहे. या उदाहरणावरून पाण्याला सोन्यासारखे जपावे लागणार, हे निश्‍चित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District opposite District Article Dayanand Mane