
भाष्य : विधवांच्या आत्मसन्मानाचे भान
- डॉ.आशा मिरगे
महाराष्ट्राने देशाला अनेक समाजसुधारणा दिल्या. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडली गेली; परंतु, आजही महाराष्ट्राच्या अनेक भागांत काही कुप्रथांमुळे विधवांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती. उशिरा का होईना, पण विधवांचा आत्मसन्मान राखण्यासाठी काही कुप्रथा मोडण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, हे पुरोगामी महाराष्ट्राला साजेसे आहे. त्याचं सर्वांनी स्वागत करायला हवं.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांचा वारसा आपण मोठ्या अभिमानाने मिरवितो आणि या वारशामुळेच राज्याची पुरोगामी प्रतिमा निर्माण झाली, हे खरे असले तरी या विचारांना छेद देणाऱ्या काही कुप्रथा महाराष्ट्रात आजही सुरूच आहेत. त्यातील एक आहे ती विधवांना सन्मानाने जगण्याचा नाकारला जात असलेला अधिकार. एखादी बाई विधवा होते त्यात तिचा मुळीच दोष नसतो. ती त्यासाठी जबाबदारही नसते किंवा विधवापण टाळणं तिच्या हाती नसतं.
अगदी पूर्वीच्या काळात सती प्रथा प्रचलित होती. म्हणजे नवऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पार्थिवासोबत बायकोला जिवंत जाळलं जात होतं. समाजसुधारकांनी त्या विरोधात आवाज उठवला. ही प्रथा बंद केली. मी लहान असताना जेव्हा समाजातील काही भागांमध्ये केशवपन अस्तित्वात होतं, तेव्हा मला वाटायचं की, असं डोक्यावरील सर्व केस काढून, एकाच रंगाची गोणपाटासारखी साडी नेसून, घरातील कोपऱ्यात, अडगळीतील आयुष्य काय असून नसल्यासारखंच. या काळात अशा विधवांचं नवऱ्याच्या मृत्यूमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचं नुकसान होत असे. काही कुटुंबांमध्ये तर कुटुंबातीलच पुरुषांकडून तिचं लैंगिक शोषण होत असे. ऐंशीच्या दशकात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला.
माझ्या आईवर विधवा होण्याचा प्रसंग आला. आजच्यासारखं विधवा महिलेनं कुंकू लावणं तेव्हा मुळीच मान्य नव्हतं. टिकली तर अस्तित्वातच नव्हती. गोरी गोरी पान माझी आई, जी कालपर्यंत नाण्याच्या आकाराएवढं कुंकू लावून मिरवायची, अचानक तिचं जिणं भकास झालं. त्या काळात तिचं विनाकुंकवाचं कपाळ पाहणं म्हणजे आम्हाला अत्याचार वाटायचा. पण आजी, मावशी, आजोबा, आत्या एकप्रकारे दांडगाई करत. जेव्हा मी विचारले की, ‘आईने कुंकू लावले तर चालेल का?’ तर सर्वांनीच मला ‘हे काय बोलतेस?’ म्हणत फटकारलं व आईनं मला शांत राहण्यास सांगितलं. याशिवाय बाबा गेल्यानंतर आईला प्रत्येक शुभ प्रसंगात, जसे लग्न, बारसे, डोहाळे जेवण, पूजाअर्चा, हळदीकुंकू यातूनसुद्धा दूर राहण्यास सांगण्यात येत असे. चुकून काम करता करता आई त्या खोलीत गेली, तरी लगेच उरलेल्या महिलांची कुजबुज चालू होत असे. मला वाटतं, सर्वच कुटुंबांमधून, त्या काळात विधवांना अशीच वागणूक देण्यात येत असे. जसे काही मुद्दामच अन् तिनेच तिच्या नवऱ्याला मारलं. ही दुय्यम वागणूक समाजातील सर्वच स्तरांमधून, जसे शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरांमधून विधवा महिलांना देण्यात येत असे.
२००४ मध्ये जेव्हा माझ्या पतीचं कॅन्सरनं निधन झालं अन् माझ्यावर विधवा होण्याचा प्रसंग आला, तेव्हा या सगळ्या प्रथा पाहून मी गर्भगळीत झाले. ‘त्या’ तेरा दिवसांत, कपाळावरचं कुंकू पुसणं, कपाळाला शेण लावणं, बांगड्या फोडणं, जोडवे काढणं इत्यादी आणि त्या वेळेला हे सगळं करत असलेल्या आपल्याच नातेवाईक महिलांची कुजबुज अन् देहबोली अशी की, मी किती पापी आहे, याचीच जाणीव मला होत होती. या सर्वांमुळे एकदा तर माझ्या मनाला या अवहेलनेपेक्षा सतिप्रथा बरी, असं वाटून गेलं. यावरूनही त्या मानसिक वेदनांची कल्पना येईल. त्यामुळे विधवा प्रथा मोडण्याच्या पुढाकाराचं महत्त्व मला प्रकर्षानं जाणवतं. विधवांना आता समाजात सन्मानानं जगता येईल, या कल्पनेनंच मला अतिशय आनंद झाला आहे.
एखाद्या शुभ प्रसंगाच्यावेळी, ‘ताई, तुम्ही जरा थांबा’ असे म्हणत विधवा महिलेला बाजूला ठेवण्यात येते. तेव्हा तिच्या मनातला कल्लोळ काय असतो, हे मी स्वतः अनेकवेळा अनुभवलं आहे. मंगळसूत्र न घालणं, कुंकू न लावणं, यामुळे जेव्हा समाजातील, काही लोचट पुरुष घाणेरड्या अर्थानं जवळ येण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा स्वतःच्याच आयुष्याचा तिटकारा येतो. उलटपक्षी, एखादा विधुर पुरुष असेल तर त्याच्याकडे पाहून कुणालाही अंदाज लावता येत नाही की त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे.
दुय्यम वागणूक
अशा प्रकारे समाजात जेव्हा दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, तेव्हा आपल्याला एक प्रकारची असुरक्षितता आल्याशिवाय राहत नाही. आपला आत्मविश्वास कमी होतो. ‘एकल पालक’ म्हणून भूमिका निभावताना आत्मविश्वास गमावला तर आर्थिक, सामाजिक, असे दोन्ही प्रकारचे नुकसानसुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत महिला डिप्रेशनमध्ये गेली तर घरात मुलांप्रती आईचेही कर्तव्य योग्यप्रकारे निभावता येत नाही. याचा मुलांच्या भविष्यावर निश्चितपणे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. या आणि अशा सर्व गोष्टींचा विचार केल्यास आज जेव्हा विधवासंदर्भातील सर्व प्रथा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, तेव्हा असंख्य विधवांच्या आयुष्यात आनंदाचा बहर आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनासुद्धा सर्वसामान्य आयुष्य जगता येईल. स्वतःला सिद्ध करता येईल. त्यांचेच नाही, तर त्यांच्या मुलांचंसुद्धा आयुष्य आणि भविष्य सुखी होईल यात तिळमात्र शंका नाही. सामाजिक सुधारणांचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर भागातील हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेत हा ठराव केला. त्याचे महाराष्ट्रभरातून स्वागत झाले. आता राज्य सरकारनेही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपण प्रत्येकानं विधवांच्या सन्मानासाठी झटलं पाहिजे. विधवांना जिथं जगण्याची, समृद्ध होण्याची संधी देता येईल, तिथं द्यावी. विधवांना आत्मसन्मानानं जगण्यासाठी बळ देणाऱ्या निर्णयावर आता राज्यातील सर्वच ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनीही ठराव घ्यावेत. राज्य सरकारनं पुढाकार घेत यासाठी आवाहन केलं, हे स्तुत्य पाऊल आहे. महाराष्ट्रानं ही भूमिका घेतल्यानं नवा आदर्श निर्माण होईल. स्त्री आणि पुरुष यांच्या प्रतिष्ठेत, अधिकारात विषमता नसावी, स्त्रीला दुय्यम लेखले जाऊ नये, या विचारांच्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. विधवांचा आत्मसन्मान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. पुढील काळात गावागावांत विधवांना सन्मानानं जगता आलं तर तो सुदिन असेल.
बाबा आमटे म्हणतात तसे आता प्रत्येक विधवा म्हणेल -
शृंखला असू दे पाई,
मी गतीचे गीत गाई
दुःख सोसण्यास आता,
आसवांना वेळ नाही.
(लेखिका राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्त्या व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)
Web Title: Dr Aasha Mirage Writes Widows Women Self Esteem
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..