
प्रतिजैविकांच्या घातक अशास्त्रीय वापराच्या ‘भुता’ला आवरण्यासाठी त्याच्या मूळ कारणांवर काम करावे लागेल. त्यासाठी कठोर उपायांचीच गरज आहे.
प्रतिजैविकांच्या घातक अशास्त्रीय वापराच्या ‘भुता’ला आवरण्यासाठी त्याच्या मूळ कारणांवर काम करावे लागेल. त्यासाठी कठोर उपायांचीच गरज आहे. पण भारतात त्याबाबतचा कायदा आणि धोरण दोन्हीही अपुरे आहेत.
प्रतिजैविकांचा भारतामध्ये भरमसाठ, चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्यामुळे आता अनेक जिवाणू त्यांना दाद देत नाहीत यावर ‘लॅन्सेट’या नावाजलेल्या नियतकालिकात अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाल्यावर या विषयाला पुन्हा तोंड फुटले. अशा अशास्त्रीय, घातक वापरामागे खालील कारणे आहेत-
१) प्रतिजैविकांच्या उत्पादनाबाबतचे औषध कंपन्यांचे, सरकारचे घातक धोरण - काही मोजक्या प्रतिजैविकांच्याबाबत व जिवाणूजन्य (बॅक्टेरिया-लागण) आजारांच्याबाबत असे आहे की दोन प्रतिजैविके एकत्र मिसळून एकाच गोळीमार्फत दिली तर ती अधिक गुणकारी ठरतात. अशा अपवादात्मक प्रसंगी मिश्र प्रतिजैविकांची शिफारस प्रमाणभूत शास्त्रीय ग्रंथांमध्ये केलेली असते. हे अपवाद सोडता बाकी प्रतिजैविकांची कोणतीही मिश्रणे अशी एकाच गोळीत घालून देणे हे रुग्णाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने अशी मिश्रणे बनवताच कामा नये. पण भारतामध्ये त्याबाबतचा कायदा, धोरण दोन्ही अपुरे आहेत. संबंधित यंत्रणेची अनास्था आणि ढिसाळपणा यामुळे अंमलबजावणीही नीट होत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन औषध-कंपन्या अशी अशास्त्रीय प्रतिजैविक-मिश्रणे बाजारात आणतात. या मिश्रणातील एक प्रतिजैविक एखाद्या जिवाणू-लागणीवर गुणकारी असले तरी दुसऱ्याचा त्या जिवाणूवर काहीही परिणाम होत नाही; ते वाया जाते. शिवाय त्याच्या साईड-इफेक्ट चा फटका रुग्णाला बसू शकतो. एवढेच नाही तर सर्वात वाईट म्हणजे या प्रतिजैविकाला दाद न देणा-या जिवाणूंची वाढ होते. असे होण्यामागची गुंतागुंतीची शास्त्रीय कारणमीमांसा सध्या बाजूला ठेवू. अशा अशास्त्रीय मिश्रणांमुळे निरनिराळ्या जिवाणूंच्याबाबत प्रतिजैविके निष्प्रभ होणे वाढते आहे. त्यामुळे अशा सर्व अशास्त्रीय मिश्रणांवर बंदी आणावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. पण संबंधित यंत्रणा सुस्त आणि भ्रष्टाचारी असल्याने काही प्रगती नाही.
ख्यातनाम वैद्यकीय तज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी २०१५ मध्ये आरोग्य-मंत्रालयाला पत्र लिहून प्रतिजैविकांच्या ३७ अशास्त्रीय मिश्रणांची यादी सादर केली. पण त्यांच्यावर बंदी घालण्याचे काम अजूनही रखडलेले आहे. सर्व अशास्त्रीय प्रतिजैविक मिश्रणे बंद करून यापुढे कोणत्याच अशास्त्रीय प्रतिजैविक मिश्रणाला परवानगी मिळणार नाही, अशी व्यवस्था केली तर एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल. पण हे सर्व करायला संबंधित औषध कंपन्या वेगवेगळ्या मार्गाने विरोध करतात आणि संबंधित सरकारी यंत्रणा सुस्त आणि भ्रष्टाचारी असल्याने हे काम होत नाही.
२) औषधविक्रीसाठीच्या काटेकोर आचारसंहितेचा अभाव- वैद्यकीय विज्ञान आणि नीतिमत्ता गुंडाळून ठेवून औषध कंपन्या आपली औषधे खपवत असतात. उदाहरणार्थ प्रतिजैविकांचे गुण सांगण्यावर भर देणे, कधीकधी त्याबाबत अतिशयोक्ती करणे, संभाव्य दुष्परिणाम सौम्य करून करून सांगणे, काही दडवणे तसेच दुकानदारांना आणि डॉक्टरांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने देणे यामार्फत औषध कंपन्या प्रतिजैविके बेबंदपणे खपवत असतात. विकसित देशांमध्ये औषधविक्रीबाबत नैतिक आचारसंहिता बनवून ती सर्व औषध-कंपन्यांनी पाळायचे कायदेशीर बंधन असते. भारतातही असेच व्हायला हवे. कंपन्यांनी आपणहून पाळायची आचारसंहिता आली आहे. कायदेशीररित्या बंधनकारक नसल्याने ती औषधकंपन्या अभावानेच पाळतात. हे सर्व आमूलाग्र बदलले पाहिजे, ही मागणी कित्येक वर्षे आम्ही करत आहोत. औषध-विक्री-प्रतिनिधींची (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज्) संघटना त्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात गेली आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यांच्या बाजूने निर्णय लागण्याची आशा आहे.
३) डॉक्टरांचे सुयोग्य निरंतर प्रशिक्षण न होणे - सतत नवीन प्रतिजैविके बाजारात येत असतात. ती सध्याच्या प्रतिजैविकांच्या मानाने कितपत गुणकारी आहेत, केव्हा आणि कशी वापरायची याबाबत डॉक्टरांचे निरंतर प्रशिक्षण करण्याची सुयोग्य व्यवस्था भारतात नाही. ॲलोपॅथिक डॉक्टरांनी काही प्रमाणात निरंतर प्रशिक्षण घेणे हे गेली काही वर्षे बंधनकारक केले आहे. पण त्या प्रशिक्षणाचे प्रमाणीकरण झालेले नाही. प्रतिजैविकांच्या वापराबाबत नवीन संशोधन काय सांगते याबाबत संशोधनाच्या आधारे लिखित साहित्य डॉक्टरांना पुरवण्याची नियंत्रित व्यवस्था नाही. दुसरे म्हणजे ब्रिटनसारख्या देशांमध्ये ‘स्टॅंडर्ड ट्रिटमेंट गाईडलाईन्स’ यांच्याआधारेच डॉक्टरांनी काम करावे असे बंधन आहे. भारतात ते नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे अशास्त्रीय प्रकार चालतात. कोणत्याही प्रमाणित वैद्यकीय ग्रंथात किंवा प्रमाणित वैद्यकीय नियतकालिकात शिफारस न केलेल्या व म्हणून बंदी घालायच्या लायकीच्या प्रतिजैविकांची शेकडो कोटी रुपयांची अशास्त्रीय मिश्रणे भारतात दरवर्षी खपतात,यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. या घातक अनागोंदीमागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नॉन-ॲलोपॅथिक (आयुर्वेदिक, होमिओपॅथिक इ.) डॉक्टर प्रतिजैविके व इतर ॲलोपॅथिक औषधे सर्रास वापरतात की ज्याबद्दल त्यांचे शून्य किंवा नगण्य प्रशिक्षण झालेले असते. औषध कंपन्यांचे आपमतलबी ‘मार्गदर्शन’ हा त्यांच्या कामाचा पाया असतो. या प्रकारवर कडक बंधन हवे. पण त्याचे भिजत घोंगडे कित्येक दशके पडले आहे.
४) डॉक्टरांमधील अनिर्बंध व्यावसायिक स्पर्धा- प्रतिजैविकांचा सर्वात जास्त वापर तापावरील उपचार म्हणून होतो. खरे तर बहुतांश ताप हे विषाणूजन्य (व्हायरसमुळे) असल्यामुळे ते बरे करण्यामध्ये प्रतिजैविकांचा काहीही उपयोग नसतो. पण ताप उतरून सगळ्यांना लवकरात लवकर कामावर जायचे असते. मुळे ‘भारी औषध द्या आणि लवकर बरे करा’ अशी मागणी केली जाते. शंभर-दीडशे रुपयांची रक्ताची साधी तपासणी‘(हिमोग्राम)’ करून प्रतिजैवक देण्याबाबत ठरवता येते. पण अनेक अज्ञानी आणि बेजबाबदार डॉक्टर प्रत्येक तापाच्या रुग्णाला एखाद दुसरे प्रतिजैविक देऊन दोनशे रुपये कमावणे पसंत करतात. खरे तर त्यासोबत दिलेल्या क्रोसिनसारख्या तापहारक औषधाने किंवा निसर्गतः विषाणूजन्य ताप उतरतो. पण ‘भारी औषधामुळे ताप उतरला’ असा रुग्णाचा गैरसमज करून दिला जातो. इंजेक्शन तसेच ‘भारी’ औषध दिल्याशिवाय लवकर ताप उतरत नाही,असा गैरसमजकाही लबाड डॉक्टरांनी करून दिलेला गैरसमज सार्वत्रिक झाला आहे.
‘भारी औषध’ देणारे डॉक्टर!
‘इंजेक्शन, भारी औषध’ देणारा डॉक्टर हा चांगला डॉक्टर असा गैरसमज खोलवर रुजल्याने जनरल प्रॅक्टिसमध्ये बहुतांश वेळा डॉक्टर गरज नसताना तापामध्ये प्रतिजैविक देतात. रुग्णाला खरी गोष्ट समजावून सांगून फक्त आवश्यक तेव्हाच प्रतिजैविक द्यायचे,असे फार कमी डॉक्टर करतात. कारण डॉक्टरी व्यवसायामधील अनिर्बंध व्यापारी स्पर्धा!
आज-काल सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा सर्रास अशास्त्रीयरीत्या औषधांचा मारा केला जातो. रुग्णाशी थोडा वेळ बोलून त्याला नीट समजावून सांगून शास्त्रीय पद्धतीने उपचार करणे शक्य असूनही याबाबत सोईस्कर आळशीपणा केला जातो. प्रतिजैविकांच्या घातक अशास्त्रीय वापराच्या भुताला आवरण्यासाठी वरील चारही कारणांवर कडक उपाय केले पाहिजे. पण सत्ताधारी पक्ष केवळ सत्ताकारणात गुंग आहेत!
anant.phadke@gmail.com