भाष्य : नोबेल मानकऱ्यांचे माय-बाप

नोबेल विजेत्या वैज्ञानिकांची जडणघडण कशी झाली, हे पाहिले तर काही समान धागे निश्‍चित सापडतात. आजच्या (ता.२८) विज्ञानदिनानिमित्ताने अशा नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांच्या जडणघडणीवर टाकलेला प्रकाश.
Nobel laureate scientist hargobind khorana
Nobel laureate scientist hargobind khoranasakal

नोबेल विजेत्या वैज्ञानिकांची जडणघडण कशी झाली, हे पाहिले तर काही समान धागे निश्‍चित सापडतात. आजच्या (ता.२८) विज्ञानदिनानिमित्ताने अशा नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांच्या जडणघडणीवर टाकलेला प्रकाश.

नोबेल मानकऱ्यांचे नाव एका दिवसांत जगभर गाजते. तथापि त्यांची जडण-घडण करणाऱ्या आई-वडिलांची माहिती मिळत नाही. त्यांचे पालक अत्यंत हुशार, श्रीमंत असतील, त्यांना शिक्षकांचे खास मार्गदर्शन मिळाले असेल, अनुकूल परिस्थिती लाभल्यानेच ते नोबेल विजेते झाले, अशी समजूत होऊ शकते. ती बरोबर नसते. विज्ञानदिनाच्या निमित्ताने आपण हे समजावून घ्यायला पाहिजे.

कित्येक नोबेल मानकरी पीएच. डी.ही झालेले नव्हते. क्वचित ज्यांना ज्या विषयातील नोबेल पारितोषिक मिळालं त्यांचा तो विषयच नव्हता! अनेक मानकऱ्यांचे माय-बाप सामान्य परिस्थितीत जीवन जगत होते. काही तर अनाथ होते. कुणाला आपले आई-वडील कोण, हेही माहिती नव्हते!

सर सी.व्ही. रामन यांचे वडील तिरुचिलापल्लीमधील शाळेत गणित शिकवायचे. आई गृहकृत्यदक्ष. वडिलांचा पगार महिना दहा रुपये. त्यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. ते म्हणत, ‘आय वॉज बॉर्न विथ ए कॉपर स्पून इन माऊथ’. पदवी मिळवण्याआधीच त्यांचे दोन शोधनिबंध ब्रिटिश जर्नल ऑफ फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रकाशित झाले. पदार्थविज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर त्यांची प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली.

प्रबंध न लिहिताही प्रो. आशुतोष मुखर्जींनी त्यांना ऑनररी डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल केली. सर रामन यांना ‘रामन इफेक्ट’बद्दल नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ते पीएच.डी. नव्हते. त्यांचे कुटुंब वाचनप्रिय होतं. त्यांचे पुतणे सुब्रह्मण्यम चंद्रशेखर महान खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनाही १९८३मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचे वडील लेखापाल आणि आई लेखिका होती. हे कुटुंब मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित, सुसंस्कृत होते.

हरगोविंद खोराना १९६८मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल मानकरी झाले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नव्हते. त्यांनी प्रथिनांची जडणघडण आणि जनुकांची क्रमवारी यांचा संबंध स्पष्ट केला होता. त्यांचा जन्म रायपूरमध्ये १९२२मध्ये झाला. गावाची लोकसंख्या १०० होती.

फक्त खोराना कुटुंबीय सुशिक्षित होतं. घरची गरिबी. वडील कृषीखात्यात कारकून. घरचे सारेजण सुशिक्षित असावेत, म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले. व्यंकटरामन रामकृष्णन् यांना २००९मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले. त्यांनी पेशींमध्ये रायबोसोमवर प्रथिनांची निर्मिती कशी होते, याचा शोध घेतला. त्यांचे आई-वडील परदेशात पीएच.डी. करत होते.

भारतात आजी-आजोबांनी सांभाळ केला. रामकृष्णन् यांचे शालेय-महाविद्यालयीन शिक्षण बडोद्यात झालं. घरी पुस्तकांचा खजिना होता. नोबेल विजेते होण्यापर्यंत त्यांची जी प्रगती झाली, त्याचे बहुतांशी श्रेय ते त्यांना जीव ओतून शिकवणाऱ्या भारतीय शिक्षकांना आणि पालकांनाही देतात.

सामान्य पार्श्‍वभूमीवर मात

इंग्लंडच्या पॉल नर्स २००१मधील वैद्यकशास्त्रातील नोबेल मानकरी झाले. पेशींचे विभाजन होताना लागणारा घटक त्यांनी शोधला होता. त्यांचे नोबेल संशोधन लंडनच्या इम्पेरिकल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झाले. त्यांना अमेरिकेत संशोधनाची संधी मिळाली. त्यांनी ५७व्या वर्षी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला, तो नामंजूर झाला.

कारण अर्जामध्ये आई-वडिलांच्या नावात आणि जन्मतारखेच्या दाखल्यातील नावे वेगळीच होती. आईचे नाव वेगळेच होते. वडिलांच्या नावापुढे फुली होती. वडील कोण माहिती नव्हते! खऱ्या आई-वडिलांऐवजी त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला; त्यांचेच नाव त्यांना मिळाले. जनुकीय विषयाचे तज्ज्ञ असूनही त्यांना आपल्याला कोणाचे जीन्स मिळाले, हे माहिती नाही.

ते गमतीने म्हणतात- माझे भाऊ एका दिवसांत माझे काका झाले; बहिणी मावश्या आणि आई-वडील आजी-आजोबा झाले! त्यांच्या आजीचा आणि आजोबांचा विज्ञानाशी संबंध नव्हता. आजी सफाई कामगार आणि आजोबा मेकॅनिक होते. मात्र दोघांनीही खस्ता खाल्ल्या; आणि पॉलच्या शिक्षणासाठी खर्च केला. यामुळे सामान्य परिस्थितीतील पॉल नर्स नोबेलचे मानकरी झाले.

दैनंदिन जीवनात फिरताना आपल्याला नकाशाची किंवा जीपीएसची गरज वाटत नाही. कार्यालय, घर, हॉटेल, दुकानं अशा ठिकाणी सहजतेने जातो. असंख्य जागा आपला मेंदू कशा, कुठे लक्षात ठेवतो, या संबंधीचे विज्ञान उलगडून दाखवणारे जॉन ओक्लिफ, मे-ब्रिट मोझर आणि एडवर्ड मोझर यांना २०१४मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळाले. एडवर्ड मोझर नॉर्वेच्या हॅरीड बेटावर राहात. त्यांच्या पालकांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं नव्हतं.

वडील ऑर्गन दुरुस्ती करायचे. आई घरकाम करायची. दोघांनी एडवर्डच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. मे-ब्रिटचा जन्म नॉर्वेच्या खेड्यात झाला. त्यांचे वडील सुतारकाम करायचे. आई शेतावर राबायची. एडवर्ड आणि मे-ब्रिट यांनी मानसशास्त्रातील पदवी मिळवली. न्युरोफिजिओलॉजी विषयात पीएच.डी. मिळवून ते विवाहबद्ध झाले.

आपला मेंदू निरनिराळ्या ‘जागा’ मेंदूच्या हिप्पोकॅंपस भागातील पेशी कशा लक्षात ठेवतात, त्याचा शोध लावला. त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक जॉन ओकिफ यांचे वडील बसदुरुस्ती करायचे, आई वेल्डिंगची कामे करायची. तिघांनींही थेट वैद्यकक्षेत्रात कार्य केले नव्हते. कुणाचेच पालक खूप शिकलेले नव्हते.

जाठरव्रण (पेप्टिक अल्सर) झाल्यावर पोटात वेदना होतात. मानसिक ताणतणावामुळे ही व्याधी जडते, अशी समजूत होती. परंतु बॅरी मार्शल आणि जे. रॉबिन वॉरन या ऑस्ट्रेलियातील दोन डॉक्टरांनी ही व्याधी जठरातील हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूंमुळे जडते, हे सिद्ध केले. यामुळे योग्य अँटिबायोटिक्सच्या उपचाराने रुग्ण व्याधीमुक्त झाले. या शोधामुळे मार्शल आणि वॉरन २००५मध्ये नोबेल विजेते झाले.

परंतु दोघांच्या घरची परिस्थिती यथातथाच होती. बॅरी मार्शलचे वडील टर्नर-फिटर आणि आई नर्स होती. वॉरन यांचे मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्यांना लहानापासून फिट्स येत. हेलिकोबॅक्टर पायलोरीमुळे जाठरव्रण होतो, हे सिद्ध करण्यासाठी बॅरीने जंतूंनी भरलेले पाणी पिऊन स्वतःवर प्रयोग केले होते. अर्थात हे कृत्य योग्य नव्हते; पण शेवट गोड झाला!

जर्मनीचे टेड हेंच यांचे वडील कृषीयंत्र विक्रेते होते. त्यांच्या बालपणी दुसऱ्या महायुद्धातील विषण्ण वातावरण होते. तरीही टेड रानावनात भटकंती करायचे. व्यायामशाळेत जायचे, पुस्तके वाचायचे. वडिलांनी त्यांना अनेक म्युझियममध्ये आणि संशोधकांकडे नेले. विज्ञानाची आवड निर्माण झाली. प्रतिकूल वातावरणातही त्यांनी क्वांटम आणि ऑप्टिक्स या विषयांचे संशोधन करून २००५मध्ये नोबेल पारितोषिक मिळवले.

अनेक नोबेल विजेत्यांची पूर्वपीठिका लक्षात घेतली की, काही ढोबळ निष्कर्ष काढता येतात. त्यांच्या आई-वडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांना वाचन, मनन आणि चिंतन करण्याची आवड लावली. कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि सुसंवादामुळे त्यांचे भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक जीवन समृद्ध झाले. पालकांनी आपल्या इच्छा किंवा कल्पना त्यांच्यावर लादल्या नाहीत. त्यांच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. त्याला मेहनतीची जोड मिळाली आणि नोबेलसारख्या पारितोषिकांनी आपण होऊन त्यांचा स्वीकार केला!

(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com