सामाजिक प्रगतीचा विज्ञानमार्ग

डॉ. अनिल लचके anil.lachke@gmail.com
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त.

मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त.

दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने भरीव कामगिरी करणं गरजेचं आहे. सत्तर वर्षांपूर्वी पारतंत्र्यात असलेले ८० देश स्वतंत्र झाले. त्यात ज्यांनी सुरवातीपासून विज्ञानाची कास धरली, ते पुढे गेले असे दिसते. भारत हा नक्कीच त्यापैकी एक देश आहे. गेल्या सात दशकांमध्ये आपली वैज्ञानिक वाटचाल चांगली झाली आहे. तथापि ‘विज्ञान दिन’ साजरा करताना या क्षेत्रात जगाच्या परिस्थितीच्या तुलनेत आपण अपेक्षित पल्ला गाठला आहे की नाही, याचं आत्मनिरीक्षण करणं औचित्यपूर्ण ठरेल. अर्थात प्रत्येक छोट्या-मोठ्या यशापयशाचा परामर्श घेता येणार नाही; पण यशाचे काही ठळक टप्पे मात्र लक्षात येतात.
देवी आणि पोलिओ रोगांचे उच्चाटन करण्यात आपण यश मिळवले. देवी हटविण्यात आल्याचे २५मे १९७५ला जाहीर करण्यात आले, तर पोलिओ नष्ट करण्यात आल्याचे १३ जानेवारी २०११ला घोषित करण्यात आले. १९४७ पूर्वीच्या काळाचा विचार करता भारतीयांचे आयुर्मान होते केवळ ३२ वर्ष. आता ते ६८ वर्षे आहे. गेली अनेक वर्षे भारत स्वस्त दरामध्ये जीवरक्षक औषधे आणि दर्जेदार लशींची निर्यात अनेक देशांना करीत आहे. कोट्यवधी रुग्णांना स्वास्थ्यपूर्ण जीवन जगता यावे म्हणून भारताने निर्यात केलेली दर्जेदार (आणि स्वस्त) औषधे उपयोगी पडत आहेत. औषधांच्या जागतिक निर्यातीमध्ये भारताचा वाटा ऐंशी टक्के आहे. येथील संशोधकांनी देशी आणि आधुनिक औषधे बनवण्याच्या अनेक पद्धती मोठ्या हिकमतीने बसवल्या.  यामुळे विकसनशील देश भारताला ‘फार्मसी ऑफ डेव्हलपिंग वर्ल्ड’  म्हणून ओळखतात. वैद्यकशास्त्रातील आपली यशस्वी वाटचाल आपले डॉक्‍टर, प्रशिक्षित पॅरा-मेडिकल वर्कर, संशोधक-तंत्रज्ञ यांच्या परिश्रमामुळे होत असते. देशात ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हवेत कार्बन डायॉक्‍सासाइडचे प्रमाण वाढते. अक्षय विकासासाठी स्वच्छ ऊर्जानिर्मिती व्हायला हवी म्हणून आपण अणुऊर्जानिर्मिती तर केलीच; पण अपारंपरिक स्रोतांसंबधी संशोधन आणि विकास करून बरीच मजल मारली आहे. बायोमासपासून ऊर्जानिर्मिती करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे; तर पवनऊर्जा-निर्मितीत भारत चौथा आहे. देशात सूर्यप्रकाश भरपूर पडतो. त्याचा वापर करून काही वर्षांपूर्वी केवळ दोन गिगावॉट सौरऊर्जानिर्मिती व्हायची. त्यात अजून नऊ गिगावॉटची भर पडत आहे. घरांच्या छपरांवर पडणाऱ्या उन्हाचा उपयोग करून ४० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे प्रयोग होत आहेत. यामुळे १८ हजार खेडेगावांमध्ये वीज खेळवली जाईल. (एक मेगावॉट म्हणजे दहा लाख वॉट. हे ‘शक्ती’चे परिमाण आहे.) पवनऊर्जेची निर्मिती सर्वात जास्त तामिळनाडू आणि महाराष्ट्रात होते आहे.  

अवकाश-विज्ञानात भारताने गगनभेदी झेप घेतली आहे. पन्नास वर्षांपूर्वी थुंबा येथे रॉकेटचे आणि उपग्रहांचे विविध भाग सायकलच्या कॅरिअरला लटकावून किंवा बैलगाडीतून लॉन्च-पॅडपर्यंत नेले जायचे. आता अंतराळातील बाजारपेठेत भारताने ठसा उमटवलाय. या वर्षी १५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. इस्रोने पीएसएलव्ही-सी ३७ च्या साह्याने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी एकाच उड्डाणात १०४ उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत अचूकपणे पाठवलेले आहेत. त्यात भारताचे तीन आणि परदेशांचे १०१ उपग्रह होते. या साठी गुंतागुंतीच्या गणितातला नेमकेपणा आणि तंत्रज्ञामधील नेटकेपणा गरजेचा असतो. हा जागतिक विक्रम आहे, याचे कारण या आधी अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात रशियाने २०१४मध्ये ३७ उपग्रह त्यांच्या नेमलेल्या कक्षेत पाठवले होते. गुंतागुंतीचे क्रायोजेनिक इंजिन बनवण्यात आपले तंत्रज्ञ यशस्वी झाले आहेत. चांद्रयान-१ प्रकल्पातील ‘मून इंपॅक्‍ट प्रोब’ चंद्रावर १४ नोव्हेंबर २००८रोजी धडकले. त्याच्या घनाकृती चारही बाजूंवर भारताचे निशाण होते. त्यामुळे आपला तिरंगा आपल्या संशोधकांनी चंद्रावर पोचवलाय. जगात असे फक्त चार देश आहेत. मंगळाच्या प्रांगणात २०१४मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वीपणे घेऊन जाणाऱ्या भारताची प्रशंसा जगभर झाली आहे. भारताने २०१८मध्ये पीएसएलव्हीसी ४० आणि ४३च्या मार्फत ६४ उपग्रह नियोजित कक्षेत सोडून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. अंतरिक्षात भारताचा पहिला अंतराळवीर पाठवायचा आहे. त्याची तयारी म्हणून  इस्रोच्या बेंगळुरू मुख्यालयात ‘गगनयान’ मोहिमेकरिता ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ उभारलंय.     

भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कुपोषित बालकांसाठी पोषक आहार तयार केलाय. रुग्णांच्या वैद्यकीय चिकित्सेसाठी आधुनिक उपकरणे, हलकी-फुलकी बॅंडेजेस,  आदिवासींमध्ये आढळणाऱ्या सिकल सेल ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयोग, वाया गेलेल्या (शेतकी) जैवपदार्थां(बायोमास)पासून जैव-इंधनाची निर्मिती, कृषी-उत्पन्न वाढवण्यासाठीचे जैवतंत्रज्ञान, नॅनो मटेरिअल्सचे संशोधन जोरात चालू असते. भारत १९७०पर्यंत अन्नधान्याची आयात करायचा; पण आता निर्यात करतोय! कृषिक्षेत्रात बरेच संशोधन झाले; संकरित बी-बियाण्यांचा पुरवठा होऊ लागला. आपण स्वयंपूर्ण झालो!   

भारतीय संशोधकांनी १९९७पर्यंत चीनपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले होते. तथापि २०१८मध्ये चीनने जगात सर्वांत जास्त शोधनिबंध प्रकाशित करून उच्चांक  प्रस्थापित केलाय. चीनने चार लाख सव्वीस हजार तर अमेरिकेने चार लाख नऊ हजार शोधनिबंध प्रकाशित केले. भारताने त्याकाळात एक लाख दहा हजार शोधनिबंध प्रकाशित केले. भारत गेली २५ वर्षे त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त अर्धा ते पाऊण टक्के रक्कम संशोधन आणि विकास कार्यासाठी खर्च केली. चीन आणि अमेरिका राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडीच-तीन टक्के (आपल्या सहा पट जास्त) रक्कम खर्च करतात. मर्यादित निधी वापरून दर्जेदार शोधनिबंध प्रकाशित करण्यात आपले संशोधक तरबेज आहेत. त्यांनी रशियापेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित करून जगात पाचवा क्रमांक मिळवलाय. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात, ‘आहे विज्ञान तरीही...’ अशी आपली स्थिती आहे. त्यामुळे आपण काही बाबतीत गंभीर लक्ष द्यायला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान लोकांपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून जायला हवं. याचे कारण विज्ञान चिकित्सक आणि सारासारविचार करायला शिकवते. बालमृत्यू, कुपोषण, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचऱ्याचा निचरा, हवा-पाण्याचे (आणि ध्वनी)चे प्रदूषण या समस्या पुढे आहेत. अंधश्रद्धा, बुरसटलेल्या चालीरीती, दुराभिमान, अहंकार यामुळे कालानुरूप वाटचालीत अडथळे येतात. सध्या आपले ४२ उपग्रह भ्रमण करत असूनही आपला हवामानाचा अंदाज ‘मोघम’ असतो. शेतकऱ्यांसह सर्वांनाच हवामानाचा अंदाज उपयोगी पडतो. विद्या शाखांमध्ये जगभर आदानप्रदान वाढत आहे. त्यातून तरुणांच्या नवीन कल्पनांना पंख फुटत असतात. आपल्याकडे विद्या शाखांमधील भिंती ढासळत नाहीत. त्यासाठी प्रयत्नही होत नाहीत. सर्वसामान्य माणसाचे जीवन सौख्यकारक व्हावे, यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान हवे आहे. ‘विज्ञान मानवकेंद्रित नसेल तर ते पाप आहे,’ असे महात्मा गांधी म्हणत असत. मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचे साह्य होऊ शकते. आपला देश विज्ञानाभिमुख झाला, तर आपल्या अनेक समस्या सुलभतेने सुटतील, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr anil lachke write article in editorial