भारताच्या राज्यघटनेचं रक्षण कसं करतात माहितीये? हे वाचा!

dr anil lachke
dr anil lachke

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

भारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट राज्यघटना असल्याचे जाणकारांनी नमूद केलंय. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ आणि कायदातज्ज्ञ होतेच; पण त्यांनी जगातील अनेक राज्यघटनांचे सखोल चिंतन केलेलं होतं. त्याचे प्रतिबिंब आपल्या देशाच्या घटनेत पडल आहे. सामाजिक-आर्थिक-राजकीय न्याय, आचार, विचार, धर्म-श्रद्धा यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अशा सर्वांगीण  मुद्द्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सदस्यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि १८ दिवस काम करून एक लाख ४५ हजार शब्दांचा मसुदा तयार केला. ही घटना जगात सर्वांत मोठी आहे. राज्यघटनेचा मसुदा राष्ट्रपतींनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आता आपली राज्यघटना प्रत्यक्षात कशी आहे? तिची मूळ प्रत कोठे आहे आणि तिचं जतन कसं केलं जातंय, हेही पाहणं महत्त्वाचंच आहे. आपल्या राज्यघटनेचा पुणे शहराशी घनिष्ट संबंध आहे. मूळ मसुदा ज्या कागदावर लिहिला आहे, तो पुण्यातील ‘हॅंडमेड पेपर रिसर्च सेंटर’मध्ये तयार झाला. राज्यघटना लिहिण्यासाठी तेरा किलोग्रॅम वजनाचे २२१ ‘हॅंडमेड’ (पार्चमेंट) कागद लागले. ते उष्ण हवेत टिकतात. राज्यघटना ५८.४ सेंटिमीटर लांब आणि ४५.७ सेंटिमीटर रुंद कागदावर इंग्रजी वळणदार लिपीमध्ये प्रत्यक्ष लिहिण्याचे (कॅलिग्राफी) कार्य प्रेमबिहारी नारायण रायझादा यांनी विनामूल्य केले. राज्यघटना सजवण्याचं कलात्मक काम शांतिनिकेतनचे नंदलाल बोस आणि बेहोअर राममनोहर सिन्हा यांनी केलं. त्यांनी मसुद्याच्या पानांवर वैदिक काळापासून मोहेंजोदडो आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंतची चित्रे रेखाटली आहेत. संविधान हिंदीमध्ये देवनागरी लिपीमध्ये वळणदार ढंगात लिहिण्याचे काम वसंतराव वैद्य यांनी केले. त्याला २५२ पाने लागली. त्याची सजावट इंग्रजी प्रतीप्रमाणे आहे. बाइंडिंग करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साहित्य वापरण्यात आलं. त्यावरील मजकूर सोनेरी अक्षरांमध्ये आहे. राज्यघटनेची मूळ इंग्रजी आणि हिंदी प्रत संसदेच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली. दोन्ही मूळ प्रतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. साहाजिकच या दोन प्रतींना ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. भारताच्या घटनेच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या (सीएसआयआर) नवी दिल्लीतील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या (एनपीएल) तंत्रज्ञांनी त्यात पुढाकार घेतला. अमेरिकेच्या गेटी कॉन्झर्वेशन इन्स्टिट्यूटबरोबर सल्लामसलत करून एक हवाबंद (हरम्याटिकली सील्ड) काचेची पेटी राज्यघटना ठेवण्यासाठी तयार केली. काचपेटीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे ७०, ५५ आणि २५ सेंटिमीटर आहे. पेटीचे घनफळ ९६,२५० घन सेंटिमीटर आहे. मूळ कागदांवर प्राणवायूमुळे ऑक्‍सिडेशनचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. यासाठी काचपेटीमध्ये दीर्घकाळ निष्क्रिय राहणारा हेलियम वायू भरला होता. आता नायट्रोजन वायू भरण्यात आलाय. साहजिकच सूक्ष्मजीवजंतू आणि प्रदूषित हवा यांचा परिणाम राज्यघटनेच्या मूळ प्रतींवर होत नाही. इथे नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी (लखनौ) या संस्थेची मदत झाली. दरवर्षी मूळचा नायट्रोजन वायू बाहेर काढून नवीन नायट्रोजन वायुपेटीत भरला जातो. तरीही काचपेटीतील प्राणवायूचे प्रमाण बाहेरूनच ‘ऑक्‍सिजन ॲनलायझर’ने (किंवा लेसर स्पेक्‍ट्रोस्कोपीने) मोजण्याची सोय आहे. एक हजार नायट्रोजनच्या रेणूमध्ये एखादा प्राणवायूचा रेणू चालेल, असं मानलंय. काचपेटीवर आजूबाजूच्या वातावरणाच्या दाब, प्रकाश, तापमान आणि आर्द्रतेचाही परिणाम होतो. त्याचा विचार केलाय. काचपेटीची यांत्रिक क्षमता (मेकॅनिकल स्ट्रेंथ) मजबूत असावी म्हणून पेटीला जोड असणाऱ्या पट्ट्या विशिष्ट मिश्रधातूच्या असणं गरजेचं असतं. जोड देण्यासाठी सेंद्रिय पदार्थाच्या ‘ओ - रिंग’ वापरलेल्या आहेत. सध्या चांदी आणि शिसं वापरून  तयार केलेल्या मिश्रधातूचे जोड यांचा उपयोग केला गेलाय.

पॅरिसमधील लुव्र संग्रहालय, सेंट गोबेन कंपनी अशा प्रकारे दस्तऐवज सांभाळतात. त्यांचा सल्लादेखील काचपेटीसाठी मानला जातो. मूळ संविधानाची हिंदी आणि इंग्रजी प्रत वेगवेगळ्या काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दालनाचे तापमान २० अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राखण्यात येते. काचपेटी स्टेनलेस स्टीलच्या स्टॅंडवर आहे. त्यावरील (वॉर्निश्‍ड) सागवान लाकडाच्या कॅबिनेटवर काचपेटी आहे. त्यावर तंत्रज्ञांची देखरेख असते. भारताच्या संविधानाच्या मूळ हिंदी आणि इंग्रजी प्रती अजून जशाच्या तशा जतन झालेल्या आहेत, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या अशाच चिरकाल टिकतील याची खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com