भाष्य : उद्योगांच्या मदतीने बदलतील खेडी

‘ग्रामीण विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही स्वयंसेवी संस्था चालविताना गेल्या चार दशकांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे समाज परिवर्तनातील उद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका.
Sowing Machine
Sowing MachineSakal
Summary

‘ग्रामीण विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही स्वयंसेवी संस्था चालविताना गेल्या चार दशकांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे समाज परिवर्तनातील उद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका.

- डॉ. अनिल राजवंशी

समाज परिवर्तनात उद्योगक्षेत्राचा सहभाग जर आपण मोठ्या प्रमाणात मिळवू शकलो, तर ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल. ग्रामीण विकासासाठी स्थानिक पातळीवर हुशार, समर्पित लोकांची फळी अत्यावश्यक आहे.

‘ग्रामीण विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही स्वयंसेवी संस्था चालविताना गेल्या चार दशकांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे समाज परिवर्तनातील उद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका. शहरी व ग्रामीण भागांत राहणाऱ्या लोकांच्या आकांक्षांत मोठे साम्य दिसून येते. कॉर्पोरेट क्षेत्रही परवडणाऱ्या दरामध्ये वस्तू-सेवांचा पुरवठा करून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करू शकते. ग्रामीण समस्यांचा विचार करता त्यासाठी ‘संशोधन-विकास’ हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.

ग्रामीण विकासासाठी स्थानिक पातळीवर हुशार, समर्पित लोकांची फळी गरजेची आहे. स्थानिक साधनसंपत्ती, वस्तू नि मनुष्यबळ यांचा योग्य वापर करून ग्रामीण भारताच्या तंत्रज्ञानविषयक समस्यांच्या निराकरणासाठी हुशार संशोधक आणि अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यांना ग्रामीण समस्यांत रस वाटायला हवा, हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे. आता हेच पहा ना... आमच्याकडील फार कमी हुशार विद्यार्थी कृषी क्षेत्रात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात. अभियांत्रिकी, औषधनिर्माण या क्षेत्रांची दारे बंद झाल्यानंतर ही मंडळी कृषी क्षेत्राकडे वळतात. हे पाहता शेतीला ‘ग्लॅमर’ कसं मिळेल आणि त्यात व्यावसायिक संधी कशा निर्माण होतील, असा प्रयत्न करायला हवा. शेतीतूनच अन्न मिळू शकते आणि त्यावर आपलं अस्तित्व टिकून आहे. नट किंवा बोल्ट अथवा सॉफ्टवेअर खाऊन भूक भागत नाही. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये राहता तेव्हाच प्रश्न समजतात. म्हणूनच ग्रामीण भागाशी निगडित तंत्रज्ञानावर काम करणारी तरुण संशोधकांची फळी उभारावी लागेल. उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना खेड्यांतून काम करण्यासाठी आकर्षक फेलोशिप दिली जावी. इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी या मंडळींना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओंशी जोडता येईल. यामुळे त्यांना केवळ ग्रामीण भागांतील समस्यांची समजणार नाहीत, तर अनेक कंपन्यांना नवे उद्योग उभारता येतील. रोजगारसंधीही मिळतील. ग्रामीण प्रकल्पांसाठी अशा प्रकारची तरुण मंडळी ‘तंत्रज्ञान व्यवस्थापक’ म्हणून तयार करावी लागतील.

ग्रामीण भागांतील गरिबी पाहून याच मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. हुशार मंडळींमध्ये आव्हानाला सामोरे जाण्याची ठिणगी असते. तिला फुंकर घालायला हवी. ग्रामीण भागांत काम करण्याची जिद्द तरुणाईच्या ‘डीएनए’मध्ये निर्माण झाल्यास आपल्याला वेगळी उद्योग (कॉर्पोरेट) संस्कृती दिसेल. उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीचा हा सर्वोत्तम वापर आहे. ग्रामीण समस्यांचे स्वरूप वेगळे असते. त्यांवरील उपायही स्थानिकच हवेत. वस्तू, सेवांची निर्मिती ही ग्रामीण बाजारपेठेजवळ करावी लागेल. मोठी किंमत मोजून हजारो किलोमीटरपर्यंत त्यांची वाहतूक सोयीस्कर नाही. यासाठी स्थानिक पातळीवरील विकेंद्रित अशा सौर ऊर्जा, वायू आणि बायोमास या स्रोतांचा नावीन्यपूर्ण वापर करावा लागेल. परिपूर्ण उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधने वापरावी लागतील. या सगळ्यात ३-डी प्रिटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही तंत्रज्ञाने महत्त्वाची ठरतील. सध्या ग्रामीण, शहरी अशा दोन्ही भागांतील लोकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम उद्योग करतात. आता त्यामुळे येणारे नवे तंत्रज्ञान व पर्याय हे उद्योग जगताकडून येतात. भारत सरकार या प्रक्रियेत बऱ्याचदा मदत करू शकते.

ग्रामीण भागातील सर्वांत मोठे आव्हान शेती व्यवस्थेतील सुधारणांचे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. आजही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. देशाच्या संपत्तीची निर्मिती जमिनीतून होते आणि त्यातून उत्पादित होणारी सर्वांत महत्त्वाची वस्तू ही अन्न. उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढवू शकतो. फक्त आपल्याला असे तंत्रज्ञान आधी निश्चित करावे लागेल. तंत्रज्ञानात अनुरूप बदलही करावे लागतील. मुख्य म्हणजे त्याची संभाव्य वापर आणि उत्पादने आदींशी संगती साधावी लागेल. अर्थात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी हे मोठे आव्हान असेल.

शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान आपण अमेरिका-युरोपातून आणू शकत नाही. कारण ते तेथील विस्तीर्ण अशी शेती डोळ्यासमोर ठेवून विकसित केलेले आहे. देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपण आपल्याकडील गुणवत्तेला प्राधान्य देऊ शकतो. स्थानिक अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून नवे तांत्रिक पर्याय द्यावे लागतील. ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. पेरणी, कोळपणी, फवारणी, पिकांची काढणी आणि अन्नधान्यातून कचरा वेगळा करण्यासाठी आपल्याला लहान पण परिणामकारक यंत्रांची निर्मिती करावी लागेल. ड्रोन व स्वयंचलित यंत्रांचा वापरही परिणामकारक ठरू शकतो. ही यंत्रे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असतील. मुख्य म्हणजे ती विजेवर चालणारी असतील. या सगळ्या घटकांसाठी आपल्याला सर्वोत्तम अशा विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित घटकांची गरज भासेल. परवडणाऱ्या किमतीत त्यामुळे दीर्घकालीन पर्याय उपलब्ध होऊ शकतील. हे सगळं पारंपरिक जुगाडापेक्षा वेगळं आहे. आम्ही ‘नारी’ संस्थेत अशाप्रकारे अनेक नवीन तंत्रज्ञाने तयार केली आहेत. त्यात ‘बायोमास गॅसीफायर’चा समावेश होतो. तालुका ऊर्जा धोरणाच्या माध्यमातून सीरप आणि इथेनॉलच्या निर्मितीसाठी गोड ज्वारीचा वापर करण्यात आला असून कमी प्रतीच्या इथेनॉलच्या घरगुती कामांसाठी वापर होतो.

साधारणपणे नव्वदच्या दशकामध्ये ‘नारी’ने ई-रिक्षाच्या निर्मितीचे तंत्रज्ञान तयार केले. सध्या भारतातील रस्त्यांवर अशा लाखो रिक्षा धावताना दिसतात. गरिबांना माफक किमतीमध्ये खाद्यपदार्थ मिळतील, अशा ग्रामीण रेस्टॉरंटची संकल्पनाही मांडली होती. २०१२मध्ये तमिळनाडूमध्ये अम्मा उनावागम आणि महाराष्ट्रात ती शिवभोजन थाळीच्या रूपाने प्रत्यक्षात आली. आता कॉर्पोरेट कंपन्यादेखील जिथे त्यांचे उद्योग आहेत अशा ठिकाणी ही संकल्पना राबवू शकतात. एफईसीबी जनुके आणि कृत्रिम गर्भधारणा तंत्राच्या माध्यमातून जुळ्या मेंढ्यांचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सध्या कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशात या तंत्राचा वापर होताना दिसतो. याचा जवळपास दहा हजार मेंढपाळांना लाभ होतो आहे. ‘नारी’ने हे सगळे प्रयोग फार कमी साधनांमध्ये केले आहेत. संशोधन-विकासात चांगले काम करण्यासाठी फार पैसा लागत नाही. सखोल चिंतन आणि समस्येच्या निराकरणासाठी लागणारी कळकळ हे दोन घटक खूप महत्त्वाचे. ग्रामीण भागाला नवे तांत्रिक पर्याय उपलब्ध करून देताना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एनजीओ, संशोधन आणि विकासामध्ये कार्यरत संस्था यांची तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून भागिदारी झाल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकेल.

तिसरा धडा म्हणजे जाहिरात आणि उत्पादनांच्या विक्रीमध्ये स्टार्टअप खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यामुळे भांडवलाचा प्रवाह कंपन्यांकडे वळेलच; पण त्याचबरोबर तळागाळातील विज्ञान संशोधन आणि इनक्युबेशन प्रोग्रॅमही त्यात विकसित होऊ शकतील. त्यामुळे कंपन्यांची संस्कृती बदलेल. देशात सध्या अॅग्री-टेक स्टार्टअपसाठी कमी भांडवल पुरवठा होतो. अशा प्रकारचा निधी उभारावा लागेल.

हाव कमी करावी लागेल

चौथा नि महत्त्वाचा धडा म्हणजे स्वतःची हाव कमी करावी लागेल आणि वैयक्तिक जीवनात स्थायी चिरंतन विकासाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी कंपन्या तंत्रज्ञान तयार करत असतील तर त्यांना यासाठीच्या वस्तू आणि सेवांवरील नफा कमी करावा लागेल. हेच खऱ्या अर्थाने उद्योगांचे सामाजिक दायित्व आहे. नफा हा महत्त्वाचा असला तरीसुद्धा त्यातून काही चांगले करण्याची, समाजाला परत देण्याची इच्छा हवी. यामुळेच उद्योगांत काम करणाऱ्या मंडळींना त्यांची नफ्याची हाव कमी करावी लागेल. महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे हा बदल स्वतःपासून करायला हवा. ती कमी करण्यासाठी मदतीला येईल तो अध्यात्माचा मार्ग. स्थायी जीवनशैलीकडे त्यातूनच आपण जाऊ शकतो. अध्यात्माच्या मार्गदर्शनावर चालणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आनंद आणि स्थायी गोष्टींची निर्मिती करता येऊ शकते.

(लेखक `नारी’ संस्थेचे संचालक आहेत.)

(अनुवाद - गोपाळ कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com