निराशेच्या वातावरणात आधार योगाचा 

निराशेच्या वातावरणात आधार योगाचा 

सध्या कोरोनाचे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर नवीन तयार होणार्या लशी , औषधे निरनिराळ्या थेरेपी याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. ते तयार होईपर्यंत जी असुरक्षितता निर्माण झाली आहे, ती पाहता जेवढे या आजारापासून दूर राहता येईल तेवढे अधिक चांगले, असे प्रत्येकाला वाटते. प्रतिकारशक्ती सुधारणाऱ्या व्यायामाची महती म्हणूनच जाणून घेतली पाहिजे. एरवी सर्व प्रकारचा व्यायाम आपल्याला करता येतो. मात्र घरातच थांबण्याची वेळ येते, तेव्हा सूर्यनमस्कार आणि योग याकडे वळणे उत्तम  योग, आयुर्वेद या भारतीय प्राचीन शास्त्रांत वैयक्तिक प्रतिकारशक्ती कशी वाढेल, यावर भर दिला असल्याने या गोष्टी फायदेशीर ठरतात. 

सध्याच्या वातावरणात मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता आहे. काळजी वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत अष्टांग योगाचा खूप उपयोग होईल. यम, नियम या अष्टांग योगामध्ये सांगितलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक नियमांमध्ये स्वच्छता या गोष्टीला महत्त्व आहे. सूर्यनमस्कार हा सर्वश्रेष्ठ व्यायामप्रकार म्हणता येईल. एका नमस्कारामध्ये अनेक आसनांचा समावेश होतो. अश्या व्यायामाने सुरुवात करून इतर आसने जसे उभ्या स्थितीतील, बैठ्या स्थितीतील, पाठीवर आणि पोटावर निजून अशा विविध आसनस्थितीतील निरनिराळी आसने करणे खूप फायदेशीर आहे. 

उभ्या स्थितीतील आसने - पोटावरील अवयवांवर योग्य तो दाब येणारे हस्तपादासनासारखे आसन. शरीराचा तोल सुधारणारे वृक्षासन, ताडासन. 

बैठ्या स्थितीतील आसने – पोटावर; विशेषतः यकृत आणि स्वादुपिंड यावर योग्य दाब येणारी अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन यासारखी आसने करावीत. 

निद्रास्थिती- झोपलेल्या स्थितीतील पोटावर योग्य ताण येणारी भुजंगासन, धनुरासन इत्यादी आसने, तसेच तणावरहित होण्यासाठी विपरीत करणी, मकरासन, शवासन यासारखी आसने नियमित अभ्यासली पाहिजेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या आसनांचे फायदे पुढीलप्रमाणे दिसून येतात. कार्यक्षमता वाढते, शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, शरीरातील नकारात्मक शक्ती कमी व्हायला मदत होते. आंतरस्त्रावी ग्रंथी तसेच हृदय फुप्फुसे यावर योग्य दाब आल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते . शरीरातील अति ताणामुळे निर्माण झालेली रासायनिक क्रिया कमी व्हायला मदत होते. याशिवाय या सर्व आसनांमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे शरीर आणि मनाला एकत्र बांधण्याचे काम करणार्या श्वासाच्या नियंत्रणामुळे शरीर मनाची आवश्यक अशी एकरूपता साधली जाते . 

आसनांनातर अष्टांग योगांतील पुढील पायरी म्हणजे प्राणायाम. यामध्ये श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम येतात. सुरवातीला मार्गदर्शनाखाली हे प्रकार शिकणे आवश्यक असते; परंतु त्यापूर्वी सहज जमतील असे खोल श्वसन करावे, ज्यामध्ये फुप्फुसांची क्षमता वाढते आणि छाती आणि पोटाच्या स्नायूंना पण झालेल्या हालचालींमुळे योग्य तो ताण येतो, जो फायदेशीर असतो. अश्या श्वसनप्रकारात विशिष्ट नस दाबली गेल्याने ताण , विषाद कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. जसे जमेल तसे रोज काही वेळ नुसते ध्यानस्थ मुद्रेत बसावे. सुखासन, स्वस्तिकासन, पद्मासन किंवा यामध्ये बसून मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. एकदा स्थिरता अली की हळूहळू श्वसन , नाकाचे पुढचे टोक यावर मनाने स्थिरीकरण करावे. सर्वात शेवटी जेव्हा पूर्ण लक्ष केंद्रित होईल तेव्हा जेवढा वेळ ध्यानावस्थेत बसता येईल, तेवढा वेळ बसावे. ध्यानाचा अभ्यास वाढवावा. यामध्यें visualization हे पण तंत्र आहे. `आपले शरीर निरोगी आहे आणि स्वस्थ आहे`, असा मनात विचार आणून त्याचे दृश्य डोळ्यासमोर , मनासमोर आणावे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे. या तंत्राचा फायदा निरोगी राहण्यासाठी खूप दिसून येतो. या सर्व क्रियांमध्ये मनाची सकारात्मकता वाढते आणि मनाचे स्थिरीकरण होण्यास मदत होते . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com