भाष्य : कोविडवर विजयाचा अव्यवहार्य मार्ग

कोविडचा पूर्णतः नायनाट होऊ शकत नाही, हे जगातील बहुतेक देशांनी आता स्वीकारले आहे.
China Covid
China CovidSakal
Summary

कोविडचा पूर्णतः नायनाट होऊ शकत नाही, हे जगातील बहुतेक देशांनी आता स्वीकारले आहे.

कोविडवर पूर्णतः नियंत्रणाचा चीनचा प्रयत्न किती तकलादू आणि तोकडा आहे, हे शांघायमध्ये लागू कराव्या लागलेल्या कडक लॉकडाऊनने दाखवून दिले आहे. उलट त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला. या घटनांमधून चिनी सरकारच्या दाव्यातील फोलपणा, धोरणातील त्रुटी आणि क्षमतांच्या मर्यादा अधिक अधोरेखित झाल्या.

कोविडचा पूर्णतः नायनाट होऊ शकत नाही, हे जगातील बहुतेक देशांनी आता स्वीकारले आहे. लस आणि उपचार पद्धतींच्या प्रभावी हस्तक्षेपाने या विषाणूसोबत जगण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना आणि देशांनी घेतला असताना चीन त्याला अपवाद ठरू पाहतोय. कोविडचा चीन सरकारने पराभव करण्याचा किंवा किमान तो पूर्णतः रोखण्याचा निर्धार केला आहे. गेल्या दोन वर्षात सामाजिक आणि सामुदायिक जाचातून चिनी जनतेला जावं लागतंय. चीनच्या राज्यांमध्ये आणि सधन शहरांमध्ये कोविडचा प्रभाव कायम असल्याने राजकीय नेतृत्वासाठी आव्हान ठरत आहे. जगातील सर्वात कठोर विषाणू निर्मूलन धोरणांचा दृढनिश्चय करूनही चीन आणि हाँगकाँगमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ कोविडच्या घटनांत वाढच दिसते. अशात चीन आपले ‘शून्य-कोविड’ ध्येय किती काळ टिकवून ठेवेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांत चीनमधील अनेकांचा असा विश्वास झाला की, लोकसंख्येवर सर्वंकष नियंत्रणामुळे चिनी राजसत्तेला महासाथीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. जगभरातील काही उत्साही आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी आणि विश्लेषकांनी या प्रचाराला गती दिली. चिनने कोविडवर नियंत्रणासाठी कडक उपाययोजना, शीघ्र लॉकडाऊन आणि आक्रमक निर्बंध राबवल्याने महासाथीच्या उद्रेकाला वेसण घालण्यात अंशतः यश मिळवले; पण त्याची मोठी किंमत मोजावी लागली.

‘शून्य कोविड’ धोरणावर दबाव

प्रथमदर्शनी आकडेवारी पाहता, चीनने केलेल्या उपाययोजना प्रभावी वाटतात. पण त्यातील सत्यता वादातीत आहे. अमेरिकेत प्रति दहा लाख लोकांमागे ३००० आणि ब्रिटनमध्ये २४०० लोकांना प्राण गमावले असताना चीनमध्ये तुलनेने प्रति दहा लाखांमागे केवळ तीन मृत्यूंची नोंद झाली. युद्धस्तरावरील लसीकरण मोहिमेमुळे ८८% लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. असे असूनही ‘कठोर शून्य-कोविड’ धोरणांचे पालन करणारा चीन हा एकच देश आहे. पण लवकरच गोष्टी बदलू लागल्या आणि आव्हाने समोर येऊ लागली. २०२१ मध्ये अधिक संसर्गजन्य डेल्टा प्रकारच्या कोविड संक्रमणामुळे अधिकाधिक लॉकडाऊन लादणे चीनला भाग पडले. तेव्हा चीनमधील बहुचर्चित शून्य-कोविड मॉडेलवर वाढणाऱ्या ताणाची चिन्हे दिसू लागली. यामुळे चीन हे धोरण किती काळ टिकवून ठेवू शकेल, याबद्दल शंका असताना ओमिक्रॉनने ती गहिरी केली.

‘शून्य-कोविड’ धोरण हे कोविड-१९ विरूद्ध सर्वात किफायतशीर आणि प्रभावी प्रतिबंध धोरण म्हणून चीनने वापरले. ही रणनीती लॉकडाऊन आणि सामूहिक चाचणीवर अवलंबून होती. सामूहिक चाचणीसोबतच कालांतराने अँटीजेन चाचणीचाही वापर सामूहिक स्तरावर शांघायमध्ये केला. कोविड विषाणूच्या अतिसंक्रमित ओमिक्रॉनच्या वाढीमध्ये शांघायने आघाडी घेतली. मार्चपर्यंत, चीनने ‘स्नॅप स्थानिक लॉकडाऊन’, सामूहिक कोविड चाचणी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील कठोर निर्बंधांसह दैनंदिन कोविड प्रकरणांवर अंकुश ठेवला. शांघायमधील लोकांचे सरासरी राहणीमान, त्यांचे राजकीय अस्तित्व आणि आर्थिक वर्ग हा अत्यंत श्रीमंत आणि भौतिकवादी प्रकारात मोडतो. बीजिंग आणि चीनमधल्या इतर शहरांशी स्पर्धा करताना या शहराने अर्थकारण, शहरीकरण, डिजिटायझेशन आणि आधुनिक दळणवळणाच्या जोरावर जगभरात नाव कमावले आहे.

पण याच एकट्या शांघायमध्ये मार्च-एप्रिलमध्ये देशाच्या ८० टक्के कोविड रुग्णांची नोंद झाली. अडीच कोटी लोकसंख्येच्या शांघायमध्ये काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन झाले. कोविड संक्रमणाच्या आणीबाणीत मूलभूत वस्तूंच्या साठेबाजीला मनुष्य, मग जरी तो चिनी असला तरी, अपवाद नाही. त्यामुळे वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. पण अतिश्रीमंतीत जगणाऱ्या नव-चिनी लोकांना सरकारने केलेल्या उपाययोजनांचा जाच वाटला. सरकारी नियंत्रणे आणि जनतेचा विरोध यात चीनच्या शून्य-कोविड नीतीचा कस लागणे स्वाभाविक होते. त्यातच कोविड-पॉझिटिव्ह बाळांना आणि निगेटिव्ह चाचणी येणाऱ्या पालकांपासून मुलांना वेगळे करण्याचा निर्णय हा शांघायमधील रहिवाशांना व्यथित करणारा होता. शांघायच्या अधिकाऱ्यांनी हे कबूल केले की, शांघाय सारखे आर्थिक केंद्रही कोविड संक्रमणाच्या उद्रेकाविरुद्ध सामना करण्यासाठी सज्ज नव्हते. यामुळे गंभीर आर्थिक रूप धारण केले.

भूतकाळात महासाथीच्या संक्रमणावेळी चिनी नेत्यांकडून अशाच प्रकारे नियमन केले गेले. शून्य-सहिष्णुतेने प्रेरित अनेक निर्णय ‘सार्स’च्या काळात महासाथ रोखण्यासाठी अंमलात आणले. त्याची परिणामकारकता विवादित आहे. पण अर्थकारणावर परिणाम होऊ न देता अर्थकारणाची गाडी रुळावर ठेवण्यातसाठी नेते प्रचंड दबावाखाली होते. १९९८ मध्ये, पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी साथीच्या नियंत्रणासाठीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की, ‘लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा, एकूणच सुधारणा, विकास व स्थिरता आणि चीनचे राष्ट्रीय हित व आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात आहे.’ त्यानंतरच्या आठवड्यात, चीन सरकारने सार्स विरुद्ध अस्तित्वाची लढाई लढली. अवघ्या ४-६ महिन्यांत रोग प्रभावीपणे नियंत्रणात आणला. कोविडचा असाच बिमोड करू, या स्वप्नात असणाऱ्या चिनी नेत्यांना अकल्पित सत्याला सामोरे जावे लागले.

नियंत्रण आणि कडक नियमांचे प्रतिसाद हे विवादित असल्याचे दिसून येते. एप्रिलच्या मध्यात दररोज पंचवीस-तीस हजार रुग्ण आढळत असताना आणि सुमारे सव्वा लाखांवर संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी फक्त एक व्यक्ती गंभीर स्थितीत असताना कडक लॉकडाऊनची सर्वंकष अंमलबजावणी शासनाने चालूच ठेवली. त्यामुळे लॉकडाऊनची आवश्यकता हा वादाचा विषय बनला. सगळ्याच रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा आदेश, घरी विलगीकरणाला मान्यता न देणे, स्थानिक आणि गरजेनुसार मूलभूत वस्तूंचा पुरवठा सरकारी यंत्रणांनीच करावा हा अट्टाहास करणं, परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करणे आणि त्यांच्यावर नजरबंदी लादणे असे मार्शल कायदे सर्रास वापरात आले. याउपर नासलेल्या आणि कालबाह्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा लक्षात येऊनही चालूच ठेवला. त्याबद्दल सोशल मीडियावर शांघाय रहिवाशांनी केलेल्या तक्रारींचा पाऊस पडला.

अशा परिस्थितीत शून्य-कोविड निर्बंध सैल केले तर मृत्यूची संख्या वाढू शकते. ज्यामुळे सामाजिक दहशत निर्माण होईल, असे चिनी साम्यवादी पक्षाला आणि सरकारला वाटते. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राजकीय स्थित्यंतराच्या धामधुमीत चीनच्या कोविड धोरणात काही बदल होतील, याबाबत शंकाच आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा साम्यवादी पक्षाच्या येऊ घातलेल्या विसाव्या नॅशनल काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर शून्य-कोविड निर्बंध शिथिल होण्याची शाश्वती नाही. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी याबाबतीत सूतोवाच करतानाच कोविड विरुद्धचे प्रयत्न देश युद्धपातळीवर चालू ठेवेल, हेही ठासून सांगितले. चीनने किती बढाया मारल्या, आणि कोविडला शह देण्याचा आव आणला तरी महासाथीवर अंतिम विजय आणि देशाला शांततेकडे नेण्याचा कोणताही व्यवहार्य मार्ग सध्या दिसत नाही. सध्याची सार्वजनिक आरोग्याविषयी साम्यवादी पक्षाची धोरणे लक्षात घेतली तर पक्षाच्या आणि देशाच्या वैचारिक तंदुरुस्तीची क्षमता स्पष्टपणे अधोरेखित होते. ती फार आशावादी नाही.

(लेखक पेकिंग विद्यापीठात एचएसबीसी बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com