भाष्य : विज्ञान साहित्याला आस समीक्षेची

साहित्याच्या क्षेत्रातील सर्वच घटकांनी विज्ञान साहित्याचे स्वागत केले आहे. बऱ्याच अंशी अपवाद दिसतो तो समीक्षकांचा. विज्ञान साहित्याची परखड, तर्कसंगत समीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे.
Science
ScienceSakal

साहित्याच्या क्षेत्रातील सर्वच घटकांनी विज्ञान साहित्याचे स्वागत केले आहे. बऱ्याच अंशी अपवाद दिसतो तो समीक्षकांचा. विज्ञान साहित्याची परखड, तर्कसंगत समीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

काव्य, शास्त्र, विनोद किंवा साहित्य, कला आणि विज्ञान हे माणसाच्या सर्जनशीलतेचे तीन आविष्कार आहेत. बौद्धिक उत्क्रांती होत इतर प्राण्यांपासून मनुष्यप्राणी उदयाला आला तेव्हापासून नवनिर्मिती हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण राहिलं आहे. माणूस ज्यावेळी अजूनही आदिमानवाच्या म्हणजेच हंटर-गॅदरर या अवस्थेत होता, त्या काळातच या गुहांच्या भिंतींवर त्याच्या कलाविष्काराचे पहिले धडे गिरवले गेले. त्याच्या खुणा अजूनही अस्तित्वात आहेत. तसंच शिकार करून मिळवलेलं मांस कच्चंच खाण्यापेक्षा भाजून खाल्लं तर अधिक चविष्ट तर लागतंच, पण सहजी पचनी पडतं याचाही अनुभव त्याला आलेला असल्यामुळं, त्यानं गरज पडेल तेव्हा अग्नी प्रज्वलित करण्याची विद्या विकसित केली. तो विज्ञानाचा पहिला आविष्कार होता.

साहित्याचा आविष्कार त्यानंतरच्या काळात केव्हा तरी झाला. याचे कारण साहित्यासाठी भाषेचा विकास होणं आवश्यक आहे. आजच्या साहित्याच्या संदर्भात विचार करायचा तर लिखित भाषेचा विकास होणं आवश्यक ठरतं. पण मौखिक वाङ्‌मयाचा विचार केला तरी किमानपक्षी व्याकरणासहित बोलीभाषेचा विकास झाल्याशिवाय साहित्यनिर्मिती अशक्य आहे. लिखित भाषेचा उगम सुमेरियन संस्कृतीच्या कालखंडात झाला, याचे पुरावे मिळाले आहेत. क्यूनिफॉर्म लिपीतले शिलालेख सापडले आहेत. त्यांचा कालखंडही ‘रेडियोडेटिंग’च्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं निश्चित करता येतो. तो चारपाच हजार वर्षांहून प्राचीन नाही, हे निश्चित करता येतं. ते प्रमाण मानलं, तर साहित्य, कला आणि विज्ञान हे मानवी प्रज्ञेचे तीन आयाम गेली पाच-सहा हजार वर्षं एकसाथ नांदताहेत. यापैकी साहित्य आणि कला यांची गाठ एकमेकांशी प्रथम जोडली गेली. कला आणि विज्ञान यांचं नातंही सहा शतकांइतकं जुनं आहे. त्या मानानं विज्ञानाशी साहित्याची नाळ जोडली जाण्यासाठी अठरावं शतक उजाडावं लागलं. म्हणजेच विज्ञानसाहित्याचं वय फार फार तर तीनशे वर्षांहून जास्ती नाही.

हे असं का व्हावं? विज्ञान आणि साहित्य यांचा मेळ होण्यासाठी इतका वेळ का लागावा? सर्वांत प्राचीन मानवी संस्कृती किमान तीन हजार वर्षे जुन्या असताना विज्ञानसाहित्याच्या जन्माला तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत का वाट पाहावी लागावी? याचं एक कारण असं संभवतं, की विज्ञान आणि विज्ञानसाहित्य यांचा प्रवास समांतर वाटांवरून झाला आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत विज्ञानाला निसर्ग तत्त्वज्ञान असंच संबोधलं जाई. गॅलिलिओ आणि न्यूटननं आधुनिक विज्ञानाचा पाया घातला, यावर आज एकमत झालेलं असलं तरी न्यूटननंही आपल्या ख्यातनाम ग्रंथाचं शीर्षक ‘प्रिन्किपिया मातेमाटिका ए फिलॉसॉफिया नातुरालिस’ असंच ठेवलं होतं. म्हणजेच तो नॅचरल फिलॉसॉफीविषयीचं तत्त्वचिंतन त्या ग्रंथात करत होता. निसर्गाचं काम कसं चालतं, विश्वाचा गाडा कोणत्या नियमांनुसार बिनबोभाट हाकला जातो, निसर्गाची कार्यपद्धती काय आहे, याची उकल करण्याचंच उद्दिष्ट संशोधकांच्या नजरेसमोर असे. त्यात गॅलिलिओचा ख्रिश्चन धर्माच्या अध्वर्यूंबरोबर झगडा झाल्यामुळं माणसाच्या आयुष्याशी या निसर्ग तत्त्वज्ञानाचा, पर्यायानं विज्ञानाचा काही अर्थाअर्थी संबंध असावा, अशी भावना जनमानसात रुजली नव्हती. साहजिकच मानवी जीवनाच्या विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या साहित्याशी विज्ञानाचा संबंध येण्याची शक्यताच उद्‌भवत नव्हती.

पण अठराव्या शतकात वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. त्या पाठोपाठ युरोपात औद्योगिक क्रांती अवतरली. तिनं तिथल्या सामाजिक जीवनाची चौकटच बदलून टाकली. कौटुंबिक जीवनाचा पायाही त्यापायी हादरून गेला. विज्ञानातील नित्यनूतन आविष्कार हे केवळ तत्त्वचिंतनापुरते मर्यादित न राहता त्यांचे माणसाच्या आयुष्यावर, जीवनशैलीवर भलेबुरे परिणाम होतात, आणि होत राहतील, याची जाणीव झाली. विज्ञान आणि साहित्य हे समांतर प्रवाह नसून एका तिठ्यावर ते एकमेकांशी भिडतात हे उमजलं. त्या आकलनाचं प्रतिबिंब विज्ञानसाहित्यात पडलं नसतं, तरच नवल!

परिभाषेच्या चौकटीबाहेर

त्या मानानं मराठी, खरं तर कोणत्याही भारतीय भाषांच्या, साहित्यात या प्रवाहाची भर पडायला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत वाट पाहावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आर्थिक प्रगती आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरण्याचं धोरण त्या काळच्या नेत्यांनी अंगीकारल्यामुळं समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज भासू लागली. तसंच विज्ञान साक्षरतेचा प्रसार करण्याचीही आवश्यकता भासू लागली. वैज्ञानिक संशोधन त्यापूर्वीही होत होतं. ते दर्जेदार होतं हे जगदीशचंद्र बोसांपासून ते सी. व्ही. रामन, होमी भाभांपर्यंत अनेक नामवंत वैज्ञानिकांच्या योगदानातून सिद्ध झालं आहे. परंतु त्यांच्या संशोधनाविषयीची माहिती शोधनियतकालिकांपुरती सीमित राहिली होती. वैज्ञानिक संशोधनातील प्रयोग आणि निष्कर्ष याबाबत कोणतीही संदिग्धता निर्माण होऊ नये यासाठी शोधनिबंधांचं लेखन विशिष्ट परिभाषा आणि काटेकोर शैलीच्या चौकटीतून केल जातं. त्यामुळं ते सर्वसामान्यांना कळेल अशा स्वरूपात असतंच असं नाही.परंतु विज्ञानातील नित्यनूतन आविष्कार आणि त्यांचा प्रभाव प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नसतात. त्यांचा सामान्यजनांच्या आयुष्यावर कळत-नकळत परिणाम होतच असतो. अलीकडच्या काळात तर तो अधिक प्रकर्षानं जाणवत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना आकलन होईल, तसंच त्यांना आकर्षित करेल, अशा सुबोध आणि प्रासादिक शैलीतील विज्ञानविषयक लेखनाची गरज भासू लागली होतीच. ती अधिक प्रभावी आणि वेगवान होण्यासाठी मातृभाषेचं माध्यम स्वीकारणं अगत्याचं झालं.

त्यातूनच मराठीसहित इतर भारतीय भाषांमधील विज्ञानसाहित्याचा जन्म झाला. दर्जेदार साहित्याचं मुख्य उद्दिष्ट मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचं असावं. समाजाच्या अपेक्षा, आकांक्षा, समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांचं प्रतिबिंब त्यात पडावं आणि त्या दृष्टीनं काही प्रमाणात मार्गदर्शनही व्हावं, हे अभिजात साहित्याचे मापदंड मानायला हरकत नसावी. विज्ञानसाहित्य हे निकष सहजी पार करतं. कारण समाजघटकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक आणि मुख्य म्हणजे भावनिक आयुष्यावर विज्ञानातील नित्यनूतन आविष्कारांचे जे प्रभाव पडतात किंवा भविष्यात पडण्याची दाट शक्यता असते, त्याविषयीचं चिंतन मराठी विज्ञानसाहित्यात, वैचारिक आणि ललित, दोन्ही प्रवाहात जोमदारपणे उमटलेलं आहे.

आपण आता विज्ञानयुगात प्रस्थापित होत आहोत. तिथं समर्थपणे वावरण्याची क्षमता विज्ञानसाहित्यातून प्राप्त होते. वाचकांनी आणि त्यांचे विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या नियतकालिकांच्या संपादकांनी या सत्याची बूज राखली आहे. त्यामुळं विज्ञानसाहित्याला त्यांनी योग्य ते स्थान दिलं आहे. वाचकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. प्रकाशकांनीही याची जाणीवठेवली आहे. साहित्य दरबारात विज्ञानसाहित्यानं आता मानाचं स्थान पटकावलेलं आहे.

वाचनसंस्कृतीचा ते एक अविभाज्य भाग तर होतंच. पण तिच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी आता त्यानं उचलली आहे. दुर्दैवानं समीक्षकांनी मात्र सातत्यानं याची उपेक्षाच केली आहे. एक विज्ञानसाहित्यिक संमेलनाध्यक्ष असताना विज्ञानसाहित्याला संमेलनाच्या कार्यक्रमात काहीही स्थान मिळू नये, हे या विदारक सत्याचीच प्रचिती देतं. समीक्षकांच्या या उदासीन वृत्तीपायी विज्ञान साहित्याच्याच नव्हे, तर एकंदरीत साहित्याच्या उत्क्रांती प्रवाहात बाधा येत आहे, याचं भान येऊन यानंतर तरी विज्ञानसाहित्याची तर्कसंगत आणि परखड समीक्षा व्हावी.

(लेखक विज्ञानाचे अभ्यासक व साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com