‘इस्रो’च्या मोहिमांचे वरदान

dr deepti deobagkar
dr deepti deobagkar

ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत.

गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. चांद्रयान, मंगळयान आणि एकाचवेळी १०० उपग्रह प्रक्षेपित करणे, अशा अनेक गोष्टी साध्य केल्या. पण सर्वसामान्य माणसाच्या मनात एक प्रश्‍न निश्‍चितच येतो, की हे सर्व खूप छान आहे; पण याचा रोजच्या आयुष्याशी काही संबंध आहे का? सर्वसामान्य माणसाला या उपग्रहांचा आणि सर्व तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे? त्या प्रश्‍नाचे अंशतः उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

आतापर्यंत ‘इस्रो’ने १०४ उपग्रह (स्पेसक्राफ्ट मिशन्स) (१ मायक्रो सॅटेलाइट, ३ नॅनो सॅटेलाइट्‌ससह), ७३ प्रक्षेपणे (लॉन्च मिशन्स), १० विद्यार्थी उपग्रह, २ री-एंट्री मिशन्स आणि याव्यतिरिक्त ३२ देशांचे २९७ परदेशी उपग्रह अवकाशात सोडले आहेत. १९ एप्रिल १९७५ रोजी सोव्हिएत युनियनच्या मदतीने भारतातील पहिला उपग्रह आर्यभट्ट सोडला गेला. १९८०मध्ये रोहिणी हा प्रथमच भारतीय बनावटीच्या (लाँच वेहिकल्स) एसएलव्ही -३ उपग्रह प्रक्षेपकाद्वारे अवकाशात त्याच्या कक्षामध्ये सोडण्यात आलेला पहिला उपग्रह होता. त्यानंतर ‘इस्रो’ने भास्कर, कल्पना, चांद्रयान, मंगलयान, असे एकूण १००हून अधिक उपग्रह अवकाशात सोडले आहेत.

आवश्‍यक साधनसुविधा, प्रशिक्षित आणि सक्षम मनुष्यबळ, आखीव नियोजन आणि अंमलबजावणी, क्षमतानिर्माण आणि विकास, टीम वर्क, ठराविक वेळेमध्ये प्रकल्पपूर्ती या सगळ्याचा समर्पक वापर ‘इस्रो’मध्ये केला जातो. देशात टेलिव्हिजनचा वापर सुरू करणे आणि तो सर्वत्र पोचवणे यामध्ये उपग्रहांचा मोठा वाटा आहे. दूरदर्शन आणि खासगी टीव्ही चॅनेल डीटीएच सेवेद्वारे (‘डीडी डायरेक्‍ट’) कार्यरत आहेत. १७ सप्टेंबर २००९पासून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांसाठी सी-बॅंडमध्ये नियोजित १० चॅनेल डीटीएच कार्यरत आहे. एचडीटीव्ही सेवा, ऑन-डिमांड मूव्ही सर्व्हिसेस इत्यादी प्रीमियम डीटीएच सेवा लोकप्रिय होत आहेत. टेलिव्हिजन कव्हरेजच्या विस्तारासाठी इन्सॅट उपग्रह एक प्रमुख उत्प्रेरक आहे.

टेलिव्हिजन आता १०० टक्के क्षेत्र आणि १०० टक्के लोकसंख्या व्यापते. एकूण व्याप्ती भारतातील ९२ टक्के लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. उपग्रहांवरील उपकरणे आणि सेन्सर्स विविध प्रकारची माहिती संकलित करतात आणि ती माहिती पृथ्वीवर पाठवली जाते. मग अनेक प्रकारच्या कार्यप्रणाली वापरून त्याचे पृथक्‍करण केले जाते. पर्यावरण, प्रदूषण, दूरसंचार, संरक्षण, विकास अशा अनेक क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल घडवण्यात कारणीभूत ठरलेल्या या उपग्रहाधारित प्रणाली आहेत. आपले उपग्रह पृथ्वीभोवती रात्रंदिवस प्रदक्षिणा घालतात. प्रत्येकाचे काही ठराविक काम असते. काही उपग्रहसमूह पाठवत असलेली समग्र माहिती हवामानाचा अंदाज, दळणवळण, मोबाइल संपर्क, दूरचित्रवाणी, दूरसंदेश अशा अनेक गोष्टींसाठी वापरली जाते. रिमोट सेन्सिंग उपग्रह पृथ्वीकडे नजर लावून ‘आकाशातील डोळे’ असावेत, तसे पृथ्वीचे अविरत निरीक्षण करतात. उपग्रहाधारित रिमोट सेन्सिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणातील, पर्यावरणातील आणि महासागरीय प्रक्रियेचे निरीक्षण करण्यात एक मोठा बदल झाला आहे. इतर सर्व प्रदेशांबरोबर समुद्रामध्ये, दुर्गम भागात जिथे आपण सहसा जाऊ शकत नाही, तिथलीदेखील इत्थंभूत माहिती आपल्याला सहज मिळवता येते.

‘भुवन’ हे स्वदेशी संकलनसाठाप्रणालीचे एक उत्तम उदाहरण. रेल्वे, रहदारी, शहरामधील आणि गावामधील जमिनीचा वापर, जंगले, ग्रीन कव्हर, शहराचे नकाशे (१ मीटर रिझोल्यूशन), भूजल, नद्या, स्वच्छ गंगा प्रकल्प याबद्दल सर्व प्रकारची माहिती मिळवणे आणि तिचे संकलन व मांडणी करण्याचे काम अव्याहत करतात. पृथ्वीचे ‘भुवन’ असे समर्पक नाव आपल्या या स्वदेशीप्रणालीला (संकलनसाठ्याला) दिले आहे. हा ब्राऊझर विशेषत: शहरे, जंगले, गावे, नद्या, शेते, डोंगरदऱ्या पाहण्यासाठी वापरता येतो. नकाशे, त्रिमिती चित्र अशा स्वरूपात हे सर्वासाठी उपलब्ध असते.

अनेक प्रणाली, निरीक्षणे आणि अनुमाने यांच्या आधाराने इस्रो आणि शेतीतज्ज्ञ यांनी संशोधन करून मातीचा/ जमिनीचा कस, जमिनीतील आणि नद्यांमधील पाण्याची पातळी, तसेच हवामानाचा/ पाऊसपाण्याचा अंदाज, पेरणी, मशागतीसाठी योग्य वेळ, झाडे आणि फळांवरील रोगांचे निदान यासाठी शास्त्रोक्त पद्धत विकसित केली आहे. अनुमाने बांधण्यासाठी आवश्‍यक ती समग्र माहिती उपग्रहांच्या मदतीने मिळते. याचा वापर काही पिकांसाठी ठराविक ठिकाणी केला जात आहे. शेतीची, फळबागांची लागवड कुठे आणि किती आहे याचाही समग्र अंदाज घेता येऊ शकतो.

अनेक जणांचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी आहे. रोज मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये अनेक तास जाळे टाकून बसावे लागते. नेहमीच चांगले मासे मिळतात असे नाही. पाऊसपाणी, वादळवारा, खराब हवामान या सगळ्याला तोंड द्यावे लागते. कल्पना करा, की जर दररोज समुद्रात जास्ती मासे कुठे मिळतील, हवा कशी असेल, आज वादळ-पाऊस येईल का, याची पूर्वकल्पना देता आली तर किती छान होईल! ही कविकल्पना नसून वास्तव आहे. रोज सकाळी (पोटेन्शिअल फिशिंग झोन्स) आज मासे पकडण्यासाठी कुठे जावे, ह्याची माहिती देशभरातील किनारपट्टीलगत असलेल्या मच्छीमारांना स्थानिक भाषांमध्ये दिली जाते.

स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद (इस्रो) मधील शास्त्रज्ञांनी एक प्रणाली विकसित केली; मग ‘भारतीय कृषी अनुसंधान संस्थे’तील मत्स्य विज्ञान संस्थेबरोबर संयुक्तरीत्या काम करून तिची प्रत्यक्ष उपयुक्तता तपासली गेली. आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची (इन्कोईस) (इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मटिक्‍स) ही संस्था रोज माहिती पुरवते. किनारपट्टीतील लोकांनी तिचा वापर करावा, यासाठी स्थानिक संस्थांचा सहभाग असतो. याबद्दल कार्यशाळा घेतल्या जातात. मासे कुठे मिळतील, ठराविक प्रकारचे मासे कुठे मिळतील, आज हवा कशी असेल, त्याबरोबर पाऊस, वादळ यांबद्दल देखील सांगितले जाते. रिमोट सेंसिंगचा समर्पक वापर केला जातो. केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, बंगाल, गोवा अशा सगळ्या किनारपट्ट्यांमधील लोकांसाठी याचा उपयोग होत आहे. मच्छीमारांना यासंबंधीची माहिती देण्यासाठी फलक, डिस्प्ले बोर्डस, नकाशे, मोबाईल्स अशा अनेक पद्धतीचा वापर करून त्यासंबंधी प्रशिक्षण देण्याचे कामदेखील केले जाते. यामुळे पैशाची, इंधनाची, वेळेची बचत तर होतेच; पण आपला जीव धोक्‍यात घालून वादळ पावसामध्ये समुद्रामध्ये जाण्यापासून मच्छीमाराना रोखता येऊ शकते.

आपत्ती व्यवस्थापनासाठीही या प्रणालींचा अतिशय समर्पक वापर करता येतो. पूर, भूस्खलन, चक्रीवादळे, भूकंप, वणवा, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना काही वेळा सामोरे जावे लागते. त्याची पूर्वसूचना, त्याच्या आवाक्‍याची माहिती आधी उपग्रहांच्या साह्याने मिळवता येत असल्यामुळे तिचा वापर करता येतो. नुकतेच ओडिशामधील वादळामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. अनेक वेळा ग्रामीण वस्ती, दूरस्थ/दुर्गम भागात, सैनिकांना, नागरिकांना वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होऊ शकत नाहीत. उपग्रहांच्या माध्यमातून (टेलिमेडिसिन) तज्ज्ञ डॉक्‍टरचा वैद्यकीय सल्ला, वेळेवर मदत, सुपर स्पेशलिस्टद्वारे आरोग्यविषयक सल्ला अशी सर्व मदत मिळू शकते. हे करताना इस्रोमध्ये असलेले तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, ह्याचबरोबर चांगल्याप्रकारे काम करणारी एक कार्यक्षम कार्यपद्धत हे सर्व महत्त्वाचे दुवे आहेत. सरकारचे आर्थिक पाठबळही महत्त्वाचे ठरते आहे.  हजारो लोकांनी केलेले काम बघताना आपल्याला जाणीव होते, की हे सर्व पडद्यामागे काम करत असून, त्यातील बहुतेकांबद्दल कोणालाच माहिती नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com