कोरोनाशी लढाईत विम्याचे पाठबळ

कोरोनाच्या आजारानंतर रुग्णाची होणारी ससेहोलपट आता सर्वश्रुत आहे. बाब ऑक्सिजन बेडची असो नाही तर व्हेंटिलेटर किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन संदर्भातील.
Mask
MaskSakal

कोरोनाच्या महासाथीने आरोग्यावरील संकटापासून ते अगदी उद्योग, व्यवसायात होणारे नुकसान यांचा विचार करता विविध प्रकारचे विमे उतरवणे फायद्याचे ठरू शकते. अशा उपयुक्त विम्यांविषयी...

कोरोनाच्या आजारानंतर रुग्णाची होणारी ससेहोलपट आता सर्वश्रुत आहे. बाब ऑक्सिजन बेडची असो नाही तर व्हेंटिलेटर किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन संदर्भातील. वैद्यकीय सेवा नुसती दुर्मिळच नव्हे तर अतिखर्चिकही झाली आहे. प्रत्येक नागरिकाला आपली ‘परतण्याची फाईल’ देवाने काढली तर नाही ना? अशी शंका वाटते आणि ती रास्तही आहे. सबब रुग्णाच्या आजारामुळे औषधे व सुश्रुषेवरील खर्च काही लाख रुपयांमध्ये गेला आहे. कधीही उद्भवू शकणाऱ्या या आपत्तीसाठी पैशाची तजवीज आजच आवश्यक आहे. सध्या महासाथीमुळे पैशाची व्यवस्था नसल्याने कर्ज काढून, नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन किंवा बचतीचे पैसे वापरून दहा-बारा लाख रुपये उभारून रुग्णावर उपचाराची वेळ आली आहे. अशावेळी विषाणूचा संसर्ग अन्य नातेवाईकांना होऊन संकटात भर पडू नये म्हणून कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा विचार आवश्यक आहे.

विवाहित स्त्रिया मालमत्ता सुरक्षा कायदा-१८७४

जर घरातील कर्ती व्यक्ती कर्जबाजारी असेल तर ‘विवाहित स्त्रिया मालमत्ता सुरक्षा कायदा-१८७४’ अंतर्गत विमा उतरवावा. जेणेकरून कर्त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास ते पैसे पत्नी व मुलांना मिळतील. बँका किंवा धनको त्या रक्कमेवर अधिकार सांगू शकणार नाहीत. कोणत्याही न्याय निवाड्यानुसार त्यावर टाच आणता येणार नाही. यामुळे कुटुंब सावरले जाईल.

कोरोना कवच, कोरोना रक्षक

कोरोनाच्या लाटांवर लाटा येणार हे गृहीत धरून किमान पुढील दोन वर्षामध्ये हा आजार झाल्यास होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे आर्थिक नुकसान भरून काढण्याचा प्रभावी पर्यायी मार्ग म्हणून ‘कोरोना कवच’ किंवा ‘कोरोना रक्षक’ ही विशेष आरोग्य विमा पॉलिसी आर्थिक कुवतीनुसार पंधरा लाख रुपयांपर्यंत सर्व कुटुंबियांसाठी उतरविणे आवश्यक आहे. यात खासगी विमा कंपनीपेक्षा सरकारी कंपनी अधिक सुविधा असणारी पॉलिसी कमी पैशात देऊ शकतात, हे लक्षात घ्यावे. तथापि, कोरोना झाल्यानंतर ही पॉलिसी घेणे फायदेशीर ठरणार नाही. कारण प्रत्येक विमा पॉलिसीमध्ये कंपनीच्या नियमाप्रमाणे सुरुवातीच्या १५ ते ९० दिवसांपर्यंत कोणताही ‘क्लेम’ मंजूर केला जात नाही. असा विमा उतरविल्यानंतर हा आजार झाल्यास सुरुवातीच्या काही कालावधीनंतर सर्व खर्च विमा कंपनी करते. यात रुग्णालयाचे खोलीभाडे, रुग्णवाहिका खर्च, वैद्यकीय (पॅथॉलॉजी) तपासण्या, डॉक्टरांचे तपासणी वा सल्ला शुल्क, औषधांचा खर्च इत्यादी असते. म्हणजे काहीच खर्च करावा लागत नाही, असेही नाही. विमा पॉलिसीमुळे बहुतांश खर्च कंपनीने केल्यास अनपेक्षित आर्थिक भाराचा ‘जोर का धक्का, धीरेसे’ लागत असल्याने सुसह्य होऊ शकतो, हा या पॉलिसीचा फायदा. सरकारी कंपन्यांनी गृहविलगीकरणासाठीच्या खर्चाचेही क्लेम मंजूर केले आहेत, हे लक्षात घ्यावे.

थर्ड पार्टी लायबिलीटी विमा

डॉक्टर व रुग्णालयांनी त्यांच्या विरुद्ध त्यांच्या खऱ्या-खोट्या ‘निष्काळजीपणा’संदर्भात आर्थिक दावे भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब आज नसलेल्या पण कदाचित उद्या उद्भवणाऱ्या ‘जिकिरी’संदर्भात मोठ्या रकमेचा म्हणजे काही कोटींच्या ‘थर्ड पार्टी लायबिलीटीचा विमा उतरविणे शहाणपणाचे ठरेल. विम्याच्या हप्त्याची रक्कम काही कोटींच्या विम्यासाठी त्यामानाने नाममात्र असते, हे लक्षात घ्यावे. भारतात निष्काळजीपणामुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात पाश्चात्य देशांइतकी जागरुकता नसल्याने भरपाईचे दावे कमी आहेत. त्यामुळे विमा हप्ता दर कमी असतो. हे लक्षात घेऊन जास्तीतजास्त रकमेचा विमा उतरवणे फायद्याचे ठरावे.

प्रधानमंत्री विमा योजना

केंद्र सरकारकडून मिळत असलेले बारा रुपयांत दोन लाख रुपयांचे अपघाती मृत्यू किंवा विकलांगपणा येणे यासाठी ‘प्रधान मंत्री सुरक्षा कवच विमा योजने’चा जवळ जवळ मोफत मिळणारा फायदा घ्यायला विसरू नये. तसेच ‘प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने’चा रु.३३०चा हप्ता भरून कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचा विमा घेणे फायद्याचे ठरावे. कोरोनाच्या आजारात हा निर्णय फायदेशीर ठरू शकेल.

जीवन विमा

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबियांतील प्रत्येक व्यक्तीचे ‘जीवन विमा कवच’ नसल्यास ते अशा असुरक्षित वातावरणात आर्थिक आपत्तीला आमंत्रण देणारे ठरावे. कारण ‘जीवन विमा जिंदगीके साथ व जिंदगीके बाद भी’ उपयोगी पडतो. यात ‘एलआयसी़’कडून मिळणाऱ्या पॉलिसींना भारत सरकारची सार्वभौम हमी असते, म्हणून ही रक्कम सुरक्षित मानली जाते. कुटुंबास देय कर्जाची रक्कम, अधिक रु. पन्नास लाख इतकी टर्म विम्याची किमान रक्कम असावी. साधारणपणे एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी प्रती दिन रु. सोळाचा (महिन्याचा रु.४९०) व्यक्तिनिहाय विमा हप्ता असू शकतो. वयपरत्वे, उत्पन्न व इतर निकषाअंतर्गत तो ठरत असतो. याचा अर्थ प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसाठी आदर्शवत पन्नास लाख रुपयांचे सुरक्षा कवच असावे, असे वाटते. कुवतीनुसार यात बदल होऊ शकतो. यात गृह/वाहन/इतर कर्जाचा समावेश व्हावा.

जर व्यक्ती व्यावसायिक असेल तर त्याचा यात ‘की मन इन्शुरन्स” (key man insurance) पॉलिसीचा विचार अधिक उपयुक्त ठरावा. ‘लॉस ऑफ प्रॉफिट’ तसेच ‘लॉस ऑफ प्रॉपर्टी’चा विमा अनुभवाच्या आधारे वा गत वर्षीच्या नफ्याच्या आधारावर व ताळेबंदातील रक्कमेवर आधारित करावा, जेणेकरून जर मालमत्तेचे कोरोनाच्या कोणत्याही कारणाने नुकसान झाले वा नफ्यात तुट आली तर विम्याचे सुरक्षा कवच उपयुक्त ठरावे. यामुळे जोखीमही कमी होते. व्यावसायिकाने तर सर्व सेवकांचा जनता विमा उतरवावा. या खेरीज भावी काळात असेच लॉकडाऊन राहिल्यास किंवा पुन्हा घोषित केल्यास मजूर वर्गाकडून संतापाच्या उद्रेकाची शक्यता गृहीत धरून, दंगल, असंतोष आदीसंदर्भातील विमा किमान दोन वर्षांसाठी उतरवावा. सेवकांकडून अप्रामाणिकपणा वाढून आर्थिक नुकसान संभवते, सबब ‘सेवकांच्या अप्रामाणिकपणा (Dishonesty of employees) संदर्भात’ विमा उतरवावा, असे वाटते.

(लेखक विमा व जोखीम व्यवस्थापन शास्त्राचे विशेष जाणकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com