हिंसेच्या विरोधाचा अक्षय प्रकाश

हिंसेच्या विरोधाचा अक्षय प्रकाश

मानवी हाव किंवा लालसा नियंत्रणासाठी शासनसंस्था हे माध्यम असू शकेल, असे कार्ल मार्क्‍स यांना वाटत होते, तर गांधींजींच्या मते माणसाची सद्‌सद्‌विवेक किंवा अंतरात्म्याची प्रेरणा त्याकामी उपयोगी पडेल. तशी साद घालण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्माजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण.

भविष्यातील कोणत्याही युगात जेव्हा जेव्हा महात्मा गांधींचं नाव घेतले जाईल, तेव्हा ते ‘अहिंसेचा प्रेषित’ म्हणून घेतले जाईल. इतिहासात दिसत आलेली मानव समाजाची हिंसक वृत्ती, यांत्रिक उत्पादनांवर सर्वव्यापी अवलंबित्व वाढत गेलेल्या शतकांच्या कालखंडात वाढत गेल्याचे दिसून येते. तोपर्यंतच्या काळात कधीही इतक्‍या मोठ्या प्रमाणात ती प्रवृत्ती दिसत नाही. दारुगोळा आणि हत्यारांच्या वापरावर आधारित यंत्रचलित युद्धांपासून या हिंसक प्रवासाची सुरवात होत पुढे अणुयुद्ध आणि रासायनिक शस्त्रांच्या वापरापर्यंत हा हिंसेचा प्रवास पोचला. याच कालखंडात वसाहतवादाला सुरवात झाली. वसाहतवादामुळे माणसांची हकालपट्टी, स्थलांतर आणि स्थानिक माणसांचा वंशसंहार केला गेला. या प्रक्रियेत अल्पसंख्याकांचे समूळ उच्चाटन होत गेले. नंतर अवतरलेल्या जागतिकीकरणाने वंचित समाजांबद्दल सहानुभूती किंवा संरक्षणाची धोरणे स्वीकारण्याची शासन-क्षमताच हिरावून घेतली. मानवी समाजांवरील या बहुपदरी आक्रमणामुळे विचारप्रणाली, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले सहजीवी नाते आमूलाग्र बदलत गेले. इतकेच नाही तर माणसांच्या ‘स्वाभाविक’ प्रवृत्तीतही आमूलाग्र परिवर्तन होत गेले. माणसांचा पर्यावरणविषयक दृष्टिकोन हिंसक होत गेला. महात्मा गांधींच्या भाषेत सांगायचे, तर पर्यावरणावर प्रभुत्व गाजवणे याचा अर्थ मानवी लालसापूर्ती.

हे परिवर्तन इतके मूलभूत भासत आहे, की काही दशकांपूर्वीपर्यंत हिंसक मानल्या गेलेल्या कृती किंवा विचार आज अगदी स्वाभाविक आणि सामान्य मानले जात आहेत; आणि असे प्रत्येक दशकात घडताना दिसते. परिणामी अणुयुद्धाच्या शक्‍यतेने जो कल्पनातीत भयावह थरकाप होतो, त्यापुढे पारंपरिक युद्ध म्हणजे आवाक्‍यातील सशस्त्र संघर्ष वाटू लागतात. आज तर शासनबाह्य-दहशतवादी शक्तींचा उदय बघता पूर्वीच्या काळातील‘शीतयुद्धा’चा काळ म्हणजे निव्वळ प्रचारयुद्ध भासू लागले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित विविध प्रणालींचा वापर करत आपल्याच देशातील नागरिकांवर कठोर पाळत ठेवणाऱ्या शासनयंत्रणेने आज दहशत निर्माण केली आहे. चढत्या क्रमाने वाढत जाणारी हिंसा हे मानवी इतिहासाचे मुख्य लक्षण ठरले आहे. ज्ञात मानवी इतिहासाच्या काळापासूनच अशाप्रकारे हिंसेचे वाढते प्रमाण सुरू होते काय असा प्रश्न पडतो. माणूस असणे म्हणजे वाढत्या प्रमाणात अशी हिंसक प्रवृत्ती अंगी बाणवणे, असाच अर्थ लावावा काय, असा प्रश्न पडतो. एक नक्की की तार्किकता (विवेकवाद), ज्ञान, भांडवल संचय आणि यंत्र या घटकांचे युग प्रस्थापित होत असतानाच त्याला समांतर मानवी समाजात हिंसक प्रवृत्ती वाढत गेली. कधी या घटकांना विरोध करण्यासाठी, तर कधी या घटकांचे समर्थन करण्यासाठी हिंसेचा उद्गम होत राहिला. ‘मानवी समाजावर हिंसक वृत्तीचा पाश पडत राहिला. मानवी समाजात या घडामोडी घडत असताना स्वाभाविकपणे औद्योगिक भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या आदर्शवादी समाजाच्या कल्पना मांडणारा टीकाकार कार्ल मार्क्‍सच्या रूपात उदयाला आला, तर आधुनिक समाजातील वाढत्या हिंसेला विरोध करणाऱ्या आदर्शवादी कल्पना मांडणारे टीकाकार म्हणून गांधी. स्वाभाविकपणे अहिंसा हे गांधींच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे अपरिवर्तनीय तत्त्व बनले. गांधी एका अर्थाने अत्यंत साधी धारणा बाळगत होते, ती म्हणजे मानवी हाव नियंत्रणात ठेवता येईल ही! मार्क्‍सच्या मते मानवी हाव किंवा लालसा नियंत्रणासाठी शासन हे माध्यम असू शकेल; तर गांधींच्या मते माणसाची सद्‌सद्‌बुद्धी किंवा अंतरात्म्याची प्रेरणा त्याकामी मदतकारक ठरेल.

 गेल्या सात दशकांच्या काळात एक सामाजिक व्यक्ती म्हणून मी उत्क्रांत होत गेलो. भारताची फाळणी आणि महात्मा गांधींच्या हत्येनंतरच्या काळात माझा जन्म झाला. त्या काळात विस्थापित झालेली माणसे आणि त्यांची संसाराची कशी राखरांगोळी झाली, याच्या कथा ऐकत मी मोठा होत होतो. १९६०च्या दशकात भारताला दोन मोठ्या लष्करी कारवायांना तोंड द्यावे लागले. राष्ट्र म्हणून नव्याने आकाराला येत असलेल्या देशाची त्या काळातील अपुरी लष्करी सज्जता लक्षात घेता ही दोन युद्धे म्हणजे देशासाठी मोठे आर्थिक आव्हान होते. तसेच देशाच्या वैचारिक धोरणासंबंधीही ते मोठे आव्हान होते. 

 सरकार आपल्याच नागरिकांविरुद्ध हिंसेचा वापर करू शकते, याचा पहिला अनुभव मला प्रथम आला तो जून १९७५ ते मार्च १९७७ या काळात. देशात लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळात. त्यापूर्वी भीषण हिंसेचे वर्णन मी वाचले होते, ते प्राचीन महाकाव्यांतून किंवा जर्मनी, रशिया, फ्रान्स आणि इजिप्तसारख्या दूरच्या देशांतील हिंसक घटनांच्या वर्णनांमध्ये. त्या काळात रशियात स्टॅलिनने शुद्धीकरणाच्या नावाखाली केलेली हिंसा आणि आफ्रिकी देशांतील चक्रम जुलमी हुकूमशहांनी आपल्याच नागरिकांवर केलेल्या अत्याचारांच्या बातम्या (उदा. सुदानचा हुकूमशहा गफार निमैरी आणि युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन). पण, तरी वृत्तपत्रांतील बातम्या म्हणजे केवळ छापील वाक्‍येच असायची. माझ्या पिढीतील अनेकांना आणीबाणीच्या अनुभवामुळे रचनागत हिंसा समाजात किती व्यापक भीती निर्माण करू शकते, याची प्रत्यक्ष कल्पना आली. १९८४ मधील शीख समाजाचा नरसंहार, १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीचे उद्‌ध्वस्तीकरण आणि त्यानंतर १९९३ मध्ये देशातील अनेक शहरांत उसळलेला धार्मिक हिंसाचार यांतून दृश्‍य स्वरूपातील हिंसेचा अनुभव शहरी भारतीयांच्या दारात येऊन पोचला. वांशिक, जातीय अस्मितेच्या राजकारणामुळे समाजात परस्पर द्वेषभाव खदखदू लागला; तर नक्षलवादाचा प्रसार आणि धार्मिक तणाव, तसेच अपयशी ठरत गेलेली ‘हरित क्रांती’ याच्या परिणामी ‘हिंसा’ देशाच्या ग्रामीण भागात आणि दुर्गम भागापर्यंत पसरत गेली. याच काळात अर्थव्यवस्था मुक्त करण्याचे धोरण स्वीकारले गेले. तसे करताना सुरवातीला मोठे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. पण, हळूहळू या धोरणामुळे देशाच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याला छेद जाऊ लागले. देशाची विविधता आणि सहिष्णुतेला धोका निर्माण झाला. जातीय, वांशिक, धार्मिक, तसेच आर्थिक संघर्षही वाढले. शिवाय पर्यावरणीय मुद्द्यांवरील तणाव वाढले. विविध मुद्द्यांवरून हिंसा दृश्‍यमान होत राहिली.  

मी १९८०पासून गुजरातेत राहत होतो आणि २००२च्या दंगलीच्या काळात मी तेथेच होतो. त्यामुळे दंगलखोरांच्या निर्घृण हत्याकांडाचा साक्षी होण्यापासून मी स्वत:ची सुटका करून घेऊ शकलो नाही. सरकार हे नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणास, जीवित व मालमत्ता रक्षणासाठी जबाबदार असते, या संकल्पनेलाच तेथे तडा गेला होता. २००२च्या दंगलींनी केवळ गुजरातच बदलला असे नाही, त्या दंगलींनी उर्वरित देशाचे राजकीय चलनवलनसुद्धा बदलले. प्रथम नोव्हेंबर २००२मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत आणि नंतर २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत उजव्या राजकीय शक्तींनी राजकीय सत्ता पूर्णपणे ताब्यात घेतली. काही वर्षांपूर्वी मी जर्मनीमधील सक्‍सहाउझन येथील यातना छावणीला भेट दिली. या यातनागृहाचे स्थळ आता माणसांना सद्‌सद्विवेकाचे स्मरण देणारे संग्रहालय म्हणून जपून ठेवण्यात आले आहे. या यातनागृहातील कामातील तंत्रिक अचूकता बघताना माझ्या लक्षात आले, की आजच्या जगात ज्ञान आणि नैतिकता यांची किती बेमालूम फारकत झाली आहे.याआधी गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वाची जितक्‍या निकडीने गरज भासत होती, त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात आजच्या जगात त्याची गरज भासू लागली आहे. सृष्टी आणि मानव यांचे महायुद्ध सुरू आहे. राज्यकर्ते आणि राज्य-करविते यांच्या कचाट्यात समाज जखडले जात आहेत. आपण मानवी लालसा मर्यादित ठेवायला शिकलो आणि निर्भयता हे मूल्य स्वीकारले, तरच हे सारे बदलणे शक्‍य होईल. महात्मा गांधींचे प्रसिद्ध वचन आहे, ‘आपल्याला जगात जो बदल घडवायचा असतो, तो आधी स्वतःमध्ये करायचा असतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com