बरा होऊ शकतो गर्भाशय मुखाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसरा मोठा कर्करोगाचा प्रकार असला, तरी तो बरा होऊ शकतो.
Cancer
Cancersakal
Summary

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसरा मोठा कर्करोगाचा प्रकार असला, तरी तो बरा होऊ शकतो.

- डॉ. गौतम वानखेडे

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या समस्येला आळा घालण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिना हा ‘जागृती महिना’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसरा मोठा कर्करोगाचा प्रकार असला, तरी तो बरा होऊ शकतो. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कॅन्सरचे निदान होते व त्यातील ७५ हजार जणींचा मृत्यू होतो. यातील बहुतांश, म्हणजे ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे (एचपीव्ही) हा कर्करोग होतो.

१) ह्यूमन पापिलोमाव्हायरस हा लैंगिक संबंधांमुळे संक्रमित होणारा (एसटीआय) संसर्गजन्य आजार आहे. एचपीव्ही एका त्वचेचा दुसऱ्या त्वचेशी संपर्क आला, तरी संक्रमित होतो. त्यामुळे संभोगामुळे हा संसर्ग होतो, असे मानणे चुकीचे आहे.

२) लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांना कोणतीही लक्षणे नसताना त्यांच्या आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर हा संसर्ग होतो. मात्र, एचपीव्ही झालेल्या १०पैकी ९ महिलांना संसर्ग झाला, तरी तो कोणत्याही उपचारांविना बरा होतो व त्यामुळे कर्करोगाची होण्याची शक्यता खूपच कमी होते.

३) एचपीव्हीचे २००पेक्षा अधिक प्रकार आहेत, त्यातील १४ प्रकार अतिधोकादायक समजले जातात व त्यांमुळे कर्करोग होऊ शकतो.

४) एचपीव्ही १६ किंवा १८मुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता ८३ टक्के असतो आणि संसर्ग झाल्यानंतर कर्करोग होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागतो. भारतात निदान होणाऱ्या पाचपैकी चार गर्भाशय मुखाचा कर्करोग हे एचपीव्ही १६ किंवा १८ या प्रकारच्या संसर्गाच्या माध्यमातून होतात.

५) गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्याची प्रभावी प्रतिबंध धोरण महिलांची नियमित तपासणी व त्याच्या जोडीला उपचार, त्याचबरोबर एचपीव्हीचे लसीकरण हेच आहे.

६) पॅप-स्मिअर, ॲसिटिक ॲसिडद्वारे केलेली तपासणी, एचपीव्ही डीएनए टेस्टिंट या स्क्रिनिंग पद्धतींद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या वेळेत निदान करून उपचार करता येतात.

७) एचपीव्हीसाठी डीएनए आधारित चाचणी इतर सर्व पद्धतींपेक्षा सर्वाधिक प्रभावी मानली जाते. या चाचणीमध्ये, योनी आणि गर्भाशय मुखाच्या पेशी पॉलिमर चेन रिॲक्शन (पीसीआर) या पद्धतीद्वारे तपासल्या जातात. (हीच पद्धत कोव्हिड आणि टीबीच्या रुग्णांसाठीही वापरली जाते.) या पद्धतीतून एचपीव्हीचा डीएनए तपासला जातो. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास गर्भाशयाच्या कर्करोगाच्या पुढील तपासण्या केल्या जातात, मात्र चाचणी निगेटिव्ह आल्यास कर्करोग असण्याची शक्यता जवळपास शून्य असते. अधिक महत्त्वाचे म्हणजे, पुढील पाच वर्षांत गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची शक्यताही जवळपास राहात नाही.

८) सध्या अशा अनेक लशी उपलब्ध आहेत, ज्यांद्वारे एचपीव्हीचा धोका कमी होतो, मात्र आधीच संसर्ग झालेल्या रुग्णांमधील विषाणू या लशी निकामी करू शकत नाहीत.

९) लसीकरण कॅन्सर स्क्रिनिंगला पर्याय ठरू शकत नाही. तुम्ही एचपीव्ही लस घेतली असली, तरी गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठीची चाचणी (स्क्रिनिंग) आवश्‍यक ठरते.

१०) सर्व २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षांनी पॅप-स्मिअर तपासणी करून घ्यावी. एखाद्या महिलेची एचपीव्ही डीएनए चाचणी झालेली असल्यास हा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

( लेखक ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ च्या मेडिकल अफेअर्स विभागाचे अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com